Home मनोरंजन मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

0

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले, त्यापैकीच एक म्हणजे विजय चव्हाण. हौशी रंगभूमीवरून त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश मिळणे अवघड नव्हते; परंतु संधी येणे महत्त्वाचे होते. कारण, मुळात विनोदी नट. त्यात तो काळ राजा गोसावी, अशोक सराफ यांनी धुमाकूळ घातलेला. लक्ष्मीकांत बेर्डे यांची १९८०च्या दशकात एन्ट्री झाली होती. अशावेळी आगमन होऊन स्वत:ची वेगळी ओळख जपणारा कलाकार म्हणजे विजय चव्हाण. मोरूच्या मावशीने वेगळी ओळख मिळालेल्या आणि जगभर हिंडलेल्या विजयमामांनी आपले साधेपण जपले होते. यशाच्या शिखरावर पोहोचलेला कलाकार असूनही डोक्यात हवा गेलेली नव्हती. त्यामुळेच त्यांचे निधन चटका लावून गेले.

विजय चव्हाण यांना यावर्षीच राज्य सरकारकडून व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी देण्यात आलेले मानपत्र.

श्री. विजय चव्हाण,
आपणास महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. चित्रपटसृष्टीतील आपल्या दीर्घकालीन मेहनत व अभिनय बांधिलकी यासाठी आपणास हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराची बातमी आपणास कळताच, आपण विलक्षण भावुक झालात. आपल्या वडिलांनाही अभिनयाची खूप आवड होती. तेव्हा आपण परेल- लालबागच्या गिरणगावात राहत. चित्रपती व्ही. शांताराम यांचा राजकमल कलामंदिर स्टुडिओ याच परिसरात. आपल्या वडिलांनी सदर स्टुडिओत जाऊन ‘स्क्रीन टेस्ट’ दिली. पण, गाऊ शकत नसल्याने त्यांना संधी मिळू शकली नाही. ही खंत वा सल आपल्या मनात कायम होती. पण, चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावे असणारा मानाचा पुरस्कार आपणास जाहीर होताच, तुमचे मन ‘फ्लॅशबॅक’मध्ये गेले आणि विलक्षण हळवे होत तुम्ही ही आठवण सांगितली. यावरून आपणास या पुरस्काराचा झालेला आनंद शब्दात मांडता न येण्यासारखा आहे.

आपणावर दिग्दर्शका विजया मेहता यांचा खूप प्रभाव आहे. इतका की, तो तुम्हाला आयुष्यभर पुरतोय. त्यांचे देणे म्हणजे आपली कारकिर्दीभरची उत्तम ठेवण आहे, असे तुम्ही मानता. त्यांच्या ‘हयवदन’ या नाटकात आपण भूमिका साकारलीय. विजया मेहता यांच्या नाटकाच्या तालमीसाठी वेळेवर हजर राहण्याची शिस्त तुमच्या कायमच अंगवळणी पडलीच, पण ती अतिशय गरजेची व उपयुक्त आहे, असेच मानत तुम्ही मराठी रंगभूमी, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमांतून यशस्वी वाटचाल केली. बराच काळ आपणही गिरणी कामगार म्हणून नोकरी केलीत. गिरणीतील आपल्या दिवस व रात्रपाळी सांभाळून आपण नाटकाचे दौरे, असंख्य प्रयोग केलेत. एक ध्यास म्हणून आपण अभिनय कारकिर्दीकडे पाहता. म्हणूनच तर दिवसभर चित्रपटाचे चित्रीकरण केल्यावर न थकता, न कंटाळता आपण रात्री त्याच उत्साहाने नाटकाचा प्रयोग रंगवला. ‘मोरूची मावशी’ हे तुमच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण नाटक होय. त्याच्या यशाने आपला आत्मविश्वास वाढलाच, पण तुम्ही ‘स्टार’ म्हणून ओळखले गेलात. तुम्हाला माहित आहे, त्या काळात नाटकासाठी वेगळा नृत्य दिग्दर्शक नसे. व्यक्तिरेखेनुसार कलाकाराने सर्व गोष्टी समरसून करायला हव्यात. हीदेखील विजया मेहता यांची शिकवण असे, आपण नम्रतापूर्वक मानता. मोरूची ‘मावशी’ साकारताना आपणास ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे व त्यासह नृत्य साकारायचे होते. ते तुमच्या स्वयंस्फूर्तीतून आले आणि आपण त्याच्यातही कमालीचे एकरूप झालात. इतके एकरूप झालात की, अनेक प्रयोगांमध्ये त्यासाठी ‘वन्समोअर’ मिळू लागला.

संवेदनशील कलाकाराला असा प्रतिसाद हुरूप वाढवणारा ठरतो. त्यातही केसाचा कोंबडा व रेशमी साडी सांभाळत पिंगा घालणे, आपण प्रत्येक प्रयोगात उत्स्फूर्तपणे साकारले. इतरही नाटकातून आपला प्रवास खुलला, विनोदाचे टायमिंग साधणे, ही एक कला असून त्यासाठी स्वभावात थोडासा हजरजबाबीपणा लागतो. तो तुमच्यात आहेच, पण आपल्या विनोदाने कोणीही कळत नकळत दुखावले जाऊ नये, याचेही आपणाकडे भान आहे. विनोद हा सहकुटुंब आनंद घेता येण्याजोगा निखळ आणि नितळ असावा, हे आपले मत. प्रेक्षकांना तशाच स्वच्छ विनोदातून आनंद देण्याचा वसा तुम्ही जपलात. मराठी चित्रपटातूनही आपली ही घौडदौड सुरू राहिलीय. ‘घोळात घोळ’, ‘पटली रे पटली’, ‘फटफजिती’, ‘बंडलबाज’, ‘शेम टू शेम’, ‘माहेरची साडी’, ‘खुळय़ांचा बाजार’, ‘झपाटलेला’ अशा अनेक मराठी चित्रपटातून आपण भूमिका साकारलीय. आपण मांसाहाराचे बरेच शौकीन आहात. चित्रपट किंवा नाटकात काम करण्यासाठीची ऊर्जा भरपूर मासे खाऊन मिळते, अशीच आपली भावना आहे. आपला मुलगा वरद हादेखील आता अभिनय क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरतोय. आपणही नवीन चित्रपटाच्या भूमिकेत कसा रंग भरता येईल, याचा विचार करताय. आपल्या या एकूणच दीर्घकालीन मेहनत व अभिनय याचे कौतुक करत हा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आपणास प्रदान करण्यात येत आहे.


आयुष्यात कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही
आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळत नसते. अगदी मलाही कोणतीच गोष्ट सहज मिळाली नव्हती. सुरुवातीला मीही खूप खस्ता खाल्ल्या. मगच माझ्या वाटय़ाला हे यश आले. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर विजू मामांची ही पहिली प्रतिक्रिया होती.

विजय चव्हाण आणि छबिलदासचा वडा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. उमेदीच्या काळात अभिनयाचे धडे गिरवतानाचा अंधुकसा लक्षात राहिलेला छबिलदास येथील वडय़ाबाबतचा किस्सा ते अनेकदा सांगतात. सुरुवातीच्या काळात छबिलदासमध्ये आम्ही एकांकिका करायचो. त्यावेळी छबिलदासच्या गल्लीत मिळणारे बटाटेवडे खूपच प्रसिद्ध होते. भूक लागली की, ते खाण्याचा मोह अनेकदा व्हायचा. पण, खिशात तेव्हा पैसे नसायचे. मग नाटकाच्या सरावासाठी येणा-या इतर मंडळींच्या खिशात जितके पैसे असतील, ते एकत्र करून वडे घ्यायचो. दहा पैसे, चार आणे गोळा करून वडापाव खात पोट भरायचो. पण, पोटाला चिमटा काढून जीव ओतून साकारलेल्या त्या कामातही वेगळीच मज्जा होती, असे विजय चव्हाण यांनी सांगितले होते.

आवड नसतानाही अभिनय क्षेत्रात..
अभिनयाची आवड नसताना, बदली कलाकार म्हणून महाविद्यालयात एका नाटकात काम केले. तिथे पहिला हशा, टाळय़ा घेतल्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारही मिळविला. तिथून माझा अभिनय प्रवास सुरू झाला आणि आजही तो संपलेला नाही, असे विजय चव्हाण म्हणाले होते.

विजूमामा मोबाईल वापरत नव्हते!
सध्या मोबाईल ही गरज बनली आहे. मात्र, विजूमामा या यंत्राच्या मोहात कधीच पडले नाहीत. ‘मला फोन वापरायला अजिबात आवडत नाही’, असे काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात ते म्हणाले होते. मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या मायाजालात अडकण्यापेक्षा त्यापासून लांब राहण्यात ते धन्यता मानत.

रंगभूमीवर परतण्यासह मुलाचे लग्न पाहण्याची इच्छा अपूर्णच
विजय चव्हाण यांची आजारावर मात करून पुन्हा रंगभूमीवर काम करण्याची, तसेच लाडका मुलगा वरद याचे लग्न पाहायची इच्छा होती. बोहल्यावर चढलेल्या वरदला सुखी संसारासाठी भरभरून आशीर्वाद त्यांना द्यायचे होते. मात्र, त्यांच्या दोन्ही इच्छा अपूर्ण राहिल्या. राज्य सरकारतर्फे दिला गेलेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतामध्ये त्यांनी रंगभूमीवर परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. रंगभूमीवर काम करण्यासह ‘जीवनगौरव मिळाला असला तरी माझा प्रवास संपला नाही. प्रवास सुरूच राहणार,’ अशी भावना विजय चव्हाण यांनी व्यक्त केली होती. माझे लग्न पाहण्याची बाबांची शेवटची इच्छा होती, असे वरद चव्हाण याने सांगितले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रात आलेल्या वरदचे येत्या डिसेंबरमध्ये लग्न ठरले आहे. वरद हा सध्या अनेक मालिकांमधून काम करत आहे.


लालबाग ते रंगभूमी
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीमध्ये लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांचे महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये सहभागी असलेला स्पर्धक ऐन वेळी काही कारणास्तव येऊ शकला नाही. त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते.
ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील, असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. ‘मोरूची मावशी’ हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी ‘मोरूची मावशी’ अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण, हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यामुळे व्यावसायिक नाटकातील भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी निर्मात्यांना सांगितले.


नाटके
कशात काय लफडय़ात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. ५, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टूरटूर, देखणी बायको दुस-याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदरपंत.

मालिका
असे पाहुणे येती, माहेरची साडी, येऊ का घरात, रानफूल, लाईफ मेंबर.

काही गाजलेले चित्रपट  
वहिनीची माया, घोळात घोळ, धुमाकूळ, शेम टू शेम, माहेरची साडी, बलिदान, शुभमंगल सावधान, एक होता विदूषक, माझा छकुला, चिकट नवरा, धांगडधिंगा, पछाडलेला, अगंबाई अरेच्चा, जत्रा, चष्मे बहाद्दूर, इश्श, जबरदस्त, बकुळा नामदेव घोटाळे, वन रूम किचन, श्रीमंत दामोदर पंत, झपाटलेला.
‘हलाल’ हा अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट बहुधा त्यांचा शेवटचा चित्रपट असावा. यात त्यांनी मुस्लीम व्यक्तिरेखा साकारली होती.


गुणी व अष्टपैलू अभिनेता गमावला
विजय चव्हाण यांना एक ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांनी गंभीर आशयाच्या भूमिकाही समर्थपणे साकारल्या. ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘टूरटूर’, ‘हयवदन’ यांसारखी अनेक नाटके त्यांच्या कसदार अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांना विनोदाचं उत्तम टायमिंग होते. चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. मराठी सिनेसृष्टीच्या अलीकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात चव्हाण यांनी बहुमूल्य योगदानही दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे.
– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

नाटक, चित्रपट क्षेत्राची मोठी हानी
विजय चव्हाण यांच्या निधनाने चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला. या कसदार अभिनयाच्या अष्टपैलू कलाकाराच्या निधनाने नाटक, चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– विनोद तावडे (सांस्कृतिक कार्यमंत्री)

उत्तम कलाकार आणि माणूस
विजय चव्हाण यांनी रंगभूमी आणि रुपेरी पडदा सारख्याच ताकदीने गाजवला. भूमिका कोणतीही असो, हा कलाकार त्याचे सोने करीत असे. ‘मोरूची मावशी’ मधील ‘मावशी’ हे पात्र माझ्या सदैव लक्षात राहील.
– जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी)

स्वत:ला नशीबवान समजतो
विजय चव्हाण यांच्यासोबत काम करायला मिळाल्याबद्दल स्वत:ला नशीबवान समजतो. त्याला त्यांच्यातल्या कलाकारासोबत भावले ते त्यांच्यातील माणूसपण. ते मला वडीलबंधू स्थानी होते. कोणाच्याही बाबतीत कलाविश्वात कधीही वेडेवाकडे बोलणे नाही किंवा मग कोणाच्या अध्यात-मध्यातही नाही, असे आयुष्य जगलेल्या विजय चव्हाण यांच्याविषयी बोलावे तितके कमीच आहे. त्यांच्याविषयी विशेष आत्मीयता असण्याचे कारण म्हणजे गिरणगावाशी जोडलेली त्यांची नाळ. नाटकाच्या वेळी एकदा मी हसलो होतो, तेव्हा त्यांनी एक सुरेख कानमंत्र मला दिला. ‘आपण हसायचे नाही, आपण रसिकांना हसवायचे.’
– भरत जाधव (अभिनेता)

चांगला मित्र गेल्याचे दु:ख अधिक
मराठी चित्रपटसृष्टीने एक चांगला अभिनेता गमावला असेल. पण, मी माझा एक चांगला मित्र गमावल्याचे दु:ख अधिक आहे. आम्ही नाटकांमध्ये एकत्र काम केले नाही. मात्र, अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. विजय चव्हाण याची अभिनय करण्याची वेगळी शैली होती. कोणत्याही भूमिकेत चपखल बसत होते. आजच्या नव्या कलाकारांनी त्यांच्याकडून हे कौशल्य शिकायला हवे. विजय चव्हाण यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी झाली आहे. ‘मोरूची मावशी’ या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. मावशी हे पात्र विशेष लक्षात राहते. मोरूची मावशी हे पात्र विजय चव्हाण यांनी अजरामर केले.
– अशोक सराफ (अभिनेता)

असा नट पुन्हा होणे नाही
‘मोरूची मावशी’ या नाटकामध्ये आम्ही एकत्र काम करताना तब्बल दीड हजार प्रयोग एकत्र केले होते. असा माणूस व नट पुन्हा होणे नाही. ते खूप प्रेमळ स्वभावाचे होते. कधीच कोणाशी भांडले नाहीत. सगळय़ांशी मिळून मिसळून राहायचे. सगळय़ांना सांभाळून घ्यायचे. त्यांच्याबद्दल जेवढे बोलेन तितके कमीच आहे. चांगला नट व हरहुन्नरी कलाकार आज हरपला आहे. त्याहीपेक्षा चांगला मित्र मी गमावला आहे. त्यांची पोकळी भरून निघणे शक्य नाही. असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही.
– प्रदीप पटवर्धन (अभिनेता)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version