Home टॉप स्टोरी ‘मोदी सरकारमुळेच मल्ल्या पळाला’

‘मोदी सरकारमुळेच मल्ल्या पळाला’

0

 बॅँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणा-या मद्यसम्राट विजय मल्ल्या हा मोदी सरकारच्या आशीर्वादामुळेच पळाला, असा घणाघाती आरोप कॉँग्रेसने गुरुवारी केला. 

नवी दिल्ली – बॅँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणा-या मद्यसम्राट विजय मल्ल्या हा मोदी सरकारच्या आशीर्वादामुळेच पळाला, असा घणाघाती आरोप कॉँग्रेसने गुरुवारी केला. राज्यसभेत शून्य प्रहाराच्या तासात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मल्ल्या याच्या परदेश पलायनाच्या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले.

आझाद म्हणाले की, सरकारच्या विविध संस्था मल्ल्या याची चौकशी करत असताना त्याला अटक करून त्याचा पासपोर्ट जप्त का केला नाही. मल्ल्या देशाबाहेर पळणार हे सर्वाना माहीत होते. त्यामुळे त्याचा पासपोर्ट जप्त करून त्याच्या हालचालींवर मर्यादा का आणल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मल्ल्या हा परदेशात पळालाच कसा? सीबीआयने त्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस का बजावली नाही. त्याला भारतातून पळून जाण्यात सरकारनेच मदत केली आहे. या प्रकरणात सरकारला प्रतिवादी बनवावे तसेच त्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी. सरकारच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय मल्ल्या परदेशी जाऊच शकत नाही, असा आरोप त्यांनी केला. विजय मल्ल्या हा दुसरा ललित मोदी होऊ नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सध्याचे सरकार ललित मोदीला मायदेशी आणू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

कॉँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सरकारवर तोफ डागताना सांगितले की, २८ फेब्रुवारी रोजी बँकेचे अधिकारी वकिलांना भेटले. त्यानंतर वकिलांनी २९ फेब्रुवारी बँकांना न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यातील गोम म्हणजे बॅँकांनी ५ मार्चपर्यंत याचिकाच दाखल केली नाही. पण २ मार्च रोजीच मल्ल्या फरार झाला होता. बँकांनी न्यायालयात जाण्यास विलंब का लावला ? असा सवाल त्यांनी केला.

मोदी, जेटलींनी उत्तर द्यावे मल्ल्या यांच्यासारख्या व्यक्तींना देश सोडण्यास सरकारने का मदत केली, असा प्रश्न देशातून विचारला जात आहे. गरीब माणसाने चोरी केल्यास त्याला मारहाण करून तुरुंगात डांबले जाते. मात्र, नऊ हजार कोटी रुपयांचा डल्ला मारणा-या उद्योगपतीला अत्यंत सहजपणे परदेशात जाण्याची परवानगी दिली जाते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, या प्रकरणी किंगफिशर एअरलाईन्स व आयडीबीआय बँकेच्या अधिका-यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version