Home टॉप स्टोरी राहुल यांनी घेतली मोदी सरकारची झाडाझडती

राहुल यांनी घेतली मोदी सरकारची झाडाझडती

0

‘काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोदी सरकारने ‘फेअर अँड लव्हली योजना आणली आहे’ अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारची खिल्ली उडवली.

नवी दिल्ली- काळा पैसा स्वच्छ करण्याची ‘फेअर अँड लव्हली’ योजना, जेएनयू प्रकरणी सरकारची अडेलतट्ट भूमिका, नागा शांतता करारात गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय, पाकिस्तानला अचानक भेट देऊन यूपीए सरकारने केलेल्या कामावर पाणी फेरण्याचे पातक आदी विविध मुद्दय़ांवर मोदी सरकारला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अक्षरश: झोडपून काढले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी अध्र्या तासांच्या भाषणात मोदी सरकारच्या प्रत्येक योजना व घोषणांचा समाचार घेतला.

पंतप्रधान मोदींवर संघाचे एकचालुकानवर्तित्वचे संस्कार आहेत. त्यात इतरांच्या मताला काडीचीही किंमत द्यायची नाही, याची शिकवण त्यांच्या शिक्षकांनी दिली आहे. पंतप्रधान मोदीजी स्वत:च्या मताने देश चालवला जाऊ शकत नाही. देश म्हणजे पंतप्रधान आणि पंतप्रधान म्हणजे देश नव्हे, अशा शब्दांत गांधी यांनी मोदींचे वाभाडे काढले.

भारत-पाकिस्तान संदर्भात मोदींच्या धोरणावर टीका करताना ते म्हणाले की, यूपीए सरकारने अत्यंत कठोर मेहनत घेऊन पाकिस्तानला आरोपीच्या पिंज-यात उभे केले होते. त्याला आंतरराष्ट्रीय स्थरावर एकटे पाडले होते. तो जागतिक स्थरावर दहशतवादाचा पुरस्कार करणार देश असल्याचे दाखवून दिले होते.

पण पंतप्रधान मोदी हे कोणताही विचार न करता पंतप्रधान शरीफ यांच्या घरी चहा प्यायला गेले. त्यांनी यूपीए सरकारच्या सर्व कामावर पाणी टाकले. तर नागा करार करतानाही त्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही.

गुप्तचर अधिकारी व राजनैतिक अधिका-यांना खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांना याबाबत अंधारात ठेवले. ते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही बोलत नाहीत. यूपीए सरकारने केलेल्या सहा वर्षाच्या कामावर त्यांनी पाणी फेरले आहे, असे गांधी म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढायला ‘फेअर अ‍ॅँड लव्हली’ योजना सुरू केली, असे सांगून गांधी म्हणाले की, काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेत भ्रष्टाचार करून कमावलेला काळा पैसा कोणीही पांढरा करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
जेएनयूप्रकरणी कन्हैया कुमारचे भाषण आपण ऐकले असून त्याने देशाविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. जेएनयूत शिकणा-या ४० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सहा हजारांपेक्षा कमी आहे. ते गरीब असल्याने तुम्ही त्यांच्या मागे लागत आहात? असा आरोप त्यांनी केला.

जेएनयू प्रकरणी न्यायालयात पत्रकार व शिक्षकांवर हल्ला होत होता असताना पंतप्रधान मोदी यांनी चक्क मौन बाळगले होते. मोदी यांची कामाची पद्धत एककल्ली असून त्यात दुस-या व्यक्तीला विचार मांडायला परवानगी नाही. मोदी हे दुराग्रही असून ते दुस-याचे ऐकूनच घेत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांशी चर्चा करावी. आमचेही म्हणणे ऐकावे. आम्ही तुमचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा द्वेष करत नाही, असे गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना सुनावले.

देशातील दोन कोटी तरुणांना नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते. ते का पूर्ण झाले नाही, असा सवाल त्यांनी केला. यूपीए सरकारची मनरेगा योजना अत्यंत खराब असल्याचे मोदी म्हणत होते. तर त्यांचे अर्थमंत्री अरुण जेटली ही योजना चांगली असल्याचे मला सांगत होते. मी त्यांना म्हणालो, तुमच्या बॉसलाही हे जाऊन सांगा. आता या खराब योजनेसाठी मोदी सरकारने एवढी मोठी तरतूद का केली ते ही सांगावे, असा सवाल गांधी यांनी केला.

‘फेअर अ‍ॅँड लव्हली’ योजना

काळा पैसा राजरोसपणे पांढरा करण्यासाठी सरकारने ‘फेअर अ‍ॅँड लव्हली’ योजना सुरू केली.

जेएनयूप्रकरणी पंतप्रधान गप्प का?

जेएनयूप्रकरणी कन्हैया कुमारने देशाविघातक वक्तव्य केलेले नाही. जेएनयूतील बहुतांशी विद्यार्थी गरीब आहेत. त्यामुळे मोदी सरकार त्यांच्या मागे लागत आहेत. या प्रकरणी न्यायालयात पत्रकार व शिक्षकांवर हल्ला होत असताना पंतप्रधान मोदी यांनी चक्क मौन बाळगले होते.

मोदी यांची कार्यशैली दुराग्रही

मोदी यांची कामाची पद्धत एककल्ली आहे. ते दुराग्रही असून त्यांच्या लेखी दुस-याच्या मताला कस्पटाची किंमत नाही. देश म्हणजे पंतप्रधान आणि पंतप्रधान म्हणजे देश नव्हे. पंतप्रधानांच्या मताने देश चालवला जाऊ शकत नाही.

पाकिस्तानबाबतचे धोरण

यूपीए सरकारने पाकिस्तानला आरोपीच्या पिंज-यात उभे केले होते. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडले होते. पण मोदी हे कोणताही विचार न करताना पंतप्रधान शरीफ यांच्या घरी चहा प्यायला गेले. त्यांनी यूपीए सरकारच्या सर्व कामावर पाणी टाकले.

नागा कराराच्या वेळी राजनाथ यांना अंधारात ठेवले

नागा करार करतानाही त्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. गुप्तचर अधिकारी व राजनैतिक अधिका-यांना खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांना याबाबत अंधारात ठेवले. ते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही बोलत नाहीत.

मोदीजी विरोधक शत्रू नाहीत

देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांशी चर्चा करावी. आमचेही म्हणणे ऐकावे. आम्ही तुमचे शत्रू नाही. आम्हाला तुमचा द्वेष करायचा नाही.

मनरेगा खराब तर निधी का वाढवला ?

मनरेगा योजनेइतकी खराब कोणतीही योजना नसल्याचे मोदींचे मत होते. यूपीएची चुकीची योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता या खराब योजनेसाठी ३८,५०० कोटींची तरतूद का केली ?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version