Home Uncategorized मोटारींची मागणी थंडच

मोटारींची मागणी थंडच

0

वर्षाच्या पहिल्याच महिन्यात फोर्ड, होंडा वगळता मारुती, ह्युंदाय, टोयोटा, महिंद्रा आणि टाटा यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या मोटार विक्रीत घट झाली. त्यामुळे शुक्रवारपासून येथे सुरू होणा-या ‘ऑटो एक्स्पो’वर मोटार उत्पादकांची भिस्त असणार आहे. 
नवी दिल्ली– गेले वर्षभर महागाई आणि मंदीशी झगडणा-या वाहन उद्योगाची नव्या वर्षातही सुटका झालेली नाही. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात फोर्ड, होंडा वगळता मारुती, ह्युंदाय, टोयोटा, महिंद्रा आणि टाटा यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या मोटार विक्रीत घट झाली. त्यामुळे शुक्रवारपासून येथे सुरू होणा-या ‘ऑटो एक्स्पो’वर मोटार उत्पादकांची भिस्त असणार आहे. यात नव्या तंत्रज्ञानातल्या मोटारी सादर करून ग्राहकांना पुन्हा खरेदीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न वाहन कंपन्यांकडून केला जाईल.

देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक मारुती सुझुकीच्या विक्रीत गेल्या महिन्यात ६.३ टक्क्यांची घट झाली. जानेवारीत मारुतीने ९५,५६९ मोटारींची विक्री केली. यात हॅचबॅक श्रेणीतील मोटारींना मंदीची झळ बसली. या मोटारींच्या विक्रीत १७ टक्क्यांची घट झाली असून अल्टो, एम ८०० प्रकारातील ३८,५६५ मोटारींची विक्री करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर बहुउद्देशीय मोटारींच्या विक्रीतही २२ टक्क्यांची घट झाली. त्याचबरोबर ह्युंदाय मोटारच्या विक्रीतही २.६ टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्युंदायने जानेवारीत ३३,४०५ मोटारींची विक्री केली. टाटा मोटर्सचीही विक्री वाढवण्याची धडपड सुरूच आहे. गेल्या महिन्यात टाटांनी ४०,४८१ मोटारींची विक्री केली असून जानेवारी २०१३ च्या तुलनेत यात ३४ टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ६१,६६० मोटारींची विक्री केली होती. प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ८,४६३ नॅनोंची विक्री केली.

महिंद्रा अँड महिंद्रासाठीही जानेवारी महिना निराशाजनक ठरला. कंपनीच्या वाहन विक्रीत गेल्या महिन्यात १४ टक्क्यांची घट झाली. या महिन्यात कंपनीने ४२,६८५ वाहनांची विक्री केली. यात स्थानिक बाजारात ४०,३२४ वाहनांची विक्री झाली. झायलो, बोलेरो यांसारख्या १९,७९२ प्रवासी वाहनांची विक्री झाली असून यात गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांची घट झाली. मात्र जागतिक बाजारातून मागणी चांगली आहे. ज्यामुळे गेल्या महिन्यात निर्यातीत २५ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शहा यांनी सांगितले. ट्रॅक्टरच्या विक्रीत मात्र १५ टक्क्यांची वाढ झाली. खरीपपाठोपाठ रब्बी पिकांचेही चांगले उत्पादन होण्याची शक्यता असून ट्रॅक्टरची मागणी कायम असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

टोयोटाच्या विक्रीमध्येही जानेवारीत १८.१४ टक्क्यांची घट झाली. या महिन्यात १०,९१० मोटारींची विक्री केली. तर १,५३० मोटारींची निर्यात केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १३,३२९ मोटारींची विक्री केली होती. मंदीने दिवसागणिक बाजाराची स्थिती बिकट झाली आहे, ज्यामुळे सर्वच प्रमुख कंपन्या संघर्ष करत असल्याचे टोयोटा किर्लोस्करचे विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एन. राजा यांनी सांगितले.

फोर्ड इंडियाने मात्र वर्षाची सुरुवात तेजीने केली. जानेवारीत कंपनीच्या विक्रीत ४९ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या महिन्यात कंपनीने १०,६३४ मोटारींची विक्री केली. यात ३,९२८ मोटारींची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यांमध्ये ७,११५ मोटारींची विक्री केली होती. पहिल्याच महिन्यात विक्रीत वाढ झाल्याने फोर्डने नववर्षाची सुरुवात दणक्यात केली. तर ऑटो एक्स्पोमध्ये नव्या तंत्रज्ञानावरील मोटारी सादर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मोटारसायकलींची मागणी मात्र कायम असून यामाहा, टीव्हीएस यांसारख्या सर्वच मोटारींच्या विक्रीमध्ये वाढ झाली. यामाहाची विक्री १७.४ टक्क्यांनी वाढली. जानेवारीत ४२,५९५ मोटारसायकलींची विक्री करण्यात आली. स्थानिक बाजारपेठेत विक्री ६.५ टक्क्यांनी वाढली. तर १०,८७४ मोटारसायकलींची निर्यात करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या स्कूटर्सप्रमाणेच इतर मोटारसायकलींची मागणीही कायम आहे, ज्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचे यामाहा मोटार इंडियाचे उपाध्यक्ष रॉय कुरियन यांनी सांगितले.

टीव्हीएसच्या विक्रीतही सहा टक्क्यांची वाढ झाली असून जानेवारीत कंपनीने एकूण १,८६,३१३ मोटारसायकली आणि तीनचाकी वाहनांची विक्री केली. मोटारसायकलींच्या विक्रीत ४.७० टक्क्यांची वाढ झाली. ६५,४४९ मोटारसायकलींची विक्री झाली तर निर्यातीतही ३९.३ टक्क्यांची वृद्धी झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मरगळलेल्या वाहन क्षेत्राला ‘ऑटो एक्स्पो’च्या निमित्ताने तरतरी येईल. या सादर होणा-या नव्या मोटारी आणि विविध तंत्रज्ञान ग्राहकांना आकर्षित करतील. – प्रवीण शहा, मुख्य कार्यकारी, महिंद्रा अँड महिंद्रा

होंडाचा विक्रीत ‘टॉप गिअर’

होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत जानेवारीत तीनपटीने वाढ झाली. गेल्या महिन्यात कंपनीने १५,७१४ मोटारींची विक्री केली. जानेवारीत २०१३ मध्ये ५,४५१ मोटारींची विक्री केली होती. तर गेल्या महिन्यात कंपनीने १,०१५ ब्रिओ मोटारींची विक्री केली. तर ७,३९८ अमेझ आणि ७,१८४ सिटी मोटारींची विक्री झाली. नवीन सिटीबरोबरच अमेझची जादू अजुनही कायम असल्याचे विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version