Home शिकू आनंदे मुलांना शिकवण्याची अनोखी पद्धत

मुलांना शिकवण्याची अनोखी पद्धत

0

शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक घरात पालकांची मुलांचा अभ्यास घेण्यासाठी धावपळ सुरू होते. त्याने चांगले मार्क मिळवावे असे तर सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठीच सगळा अट्टहास घरी चालू असतो. चांगल्यातला चांगला क्लास शोधला जातो. तर काही पालक आपल्या मुलांचा अभ्यास घरीच घेतात. आता तासन्तास अभ्यास करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नसेल, त्यांचा नानाविध तऱ्हेने अभ्यास घेऊन कंटाळा आला असेल, तर या समस्येवरचा एकमेव उपाय आता तुम्हाला नक्की सापडेल.

प्रत्येक मूल हे वेगळे असते. प्रत्येकाची आकलन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही गोष्ट आधी ध्यानात घ्यायला हवी. अशा वेळी गरज आहे ती आपल्या पाल्याची योग्य अध्ययन शैली ओळखण्याची. जर मूल तुम्ही शिकवलेल्या पद्धतीने शिकत नसेल तर तुम्ही मुलाची शिकण्याची शैली ओळखून त्या पद्धतीने शिकवा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

अध्ययन शैली म्हणजे काय?
मानवी बुद्धीची स्मरणशक्ती सराव केल्याने वाढते, हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. असे जरी असले तरी देखील अध्ययन शैलीचा त्यात महत्त्वाचा हातभार असतो. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जर मुलांची अध्ययनशैली ओळखून त्यांना शिकवले तर त्यांची ६० टक्क्य़ांहून अधिक प्रगती होऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक मुलाची आकलन करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे काही मुले एखादी संकल्पना वाचून पटकन लक्षात ठेवू शकतात तर काहीना ती संकल्पना प्रत्यक्ष करून पहिल्याशिवाय कळतच नाही. आपल्याला जर आपल्या पाल्याची अध्ययनशैली माहीत असेल तर आपण त्याला माहिती, विविध संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतो आणि त्याच्याही त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहू शकतात.

अध्ययन शैली कशी ओळखायची?
सर्वात आधी आपल्याला अध्ययनशैलींचे प्रकार ठाऊक असायला हवेत. तरच आपल्या पाल्यासाठी कोणती शैली उत्तम प्रकारे कामी येईल हे आपण ओळखू शकतो. मुख्यत: तीन प्रकारच्या अध्ययन शैली असतात.
१. गोष्टी पाहून लक्षात राहतात असे :
या प्रकारची मुले माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. या मुलांना एखाद्या व्यक्तीचा चेहरा लक्षात राहतो; पण नाव विसरतात. त्यांचा अभ्यास घेताना संकल्पना जर चित्रासोबत समजावून सांगितली तर लवकर लक्षात राहते. तुमचे मूल या प्रकाराचे वर्तन करत असेल तर त्याचा अभ्यास घेताना माहिती सांगण्यासाठी चिन्हे, चित्रे आणि आकृती वापरा. आवर्जून लक्षात ठेवण्यासारख्या माहितीला अधोरेखित करा. शिकवताना पॉवर-पॉइंट प्रेझेन्टेशन, चित्रपट, व्हीडिओ, नकाशे, चार्ट्स, पोस्टर्सचा वापर करा.

२. गोष्टी ऐकून लक्षात राहतात असे :
जी मुले ऐकून चांगल्या प्रकारे शिकू शकतात, अशा मुलांची श्रवणक्षमता खूप चांगली असते. दिलेल्या सूचना त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहतात. ही मुले नावे लक्षात ठेवतात, पण चेहरे विसरतात. अशा मुलांना मोठय़ाने वाचण्याची सवय लावा किंवा तुम्ही त्यांना वाचून दाखवा. म्हणजे ते त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहील. त्यांना प्रश्न  विचारून उत्तरावर चर्चा करा. प्रमुख मुद्दे पुन्हा पुन्हा सांगा. तसेच ऑडिओ असलेल्या पुस्तकांचा खास वापर करा. पुस्तक, माहिती, नवीन संकल्पना वाचताना आपल्या स्वत:च्या किंवा आपल्या मुलाच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करा आणि तेच रेकॉर्डिंग त्याला डोळे मिटून शांतपणे ऐकायला सांगा. मुलांना सामूहिक चर्चेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. अभ्यास करत असताना एखादे गाणे लावा. ज्यामुळे मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होईल.

 ३. प्रत्यक्षिक लक्षात राहतात असे :
काही मुलांना प्रत्यक्ष कृती करून पाहणे, त्या गोष्टीला स्पर्श करणे, हाताळणे यात अधिक रस असतो. त्यामुळे त्यांचे आकलन चांगले होते. अशा मुलांना वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे शिकवले तर ते त्यांना पटकन समजेल. एखादी संकल्पना समजावून प्रत्यक्ष कृती करून दाखवा. त्यांचा सलग २० मिनिटे अभ्यास न घेता अभ्यासादरम्यान साधारण ५ मिनिटांची तरी विश्रांती घ्या. त्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी अभिनय, मुलाखत, स्कीट यांचा कल्पकतेने वापर करून त्यांचा अभ्यास घ्या.
या तीन महत्त्वाच्या शैलीचा अभ्यास पालकांनी अगोदर करून आपल्या पाल्याच्या मूळ समस्याचे निराकरण करावे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच भर पडेल.

– वैशाली गव्हाणकर,
संचालिका, ज्ञानमुद्रा एज्युकेशन

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version