Home महामुंबई ठाणे मुख्य आरोपी चेंबूरमधील शेकापचा नेता?

मुख्य आरोपी चेंबूरमधील शेकापचा नेता?

0

कर्जत तालुक्यातील नारळेवाडी येथील राजू फार्ममधून ताब्यात घेतलेले १० टन रक्तचंदन तस्करी प्रकरणी अकबर हुसेन आणि समीम खान पठाण या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

नेरळ- कर्जत तालुक्यातील नारळेवाडी येथील राजू फार्ममधून ताब्यात घेतलेले १० टन रक्तचंदन तस्करी प्रकरणी अकबर हुसेन आणि समीम खान पठाण या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. यातील फार्महाऊसचे मालक असलेले अकबर हुसेन हे आरोपी अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तर त्यांच्या पत्नी शेकापच्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका आहेत. पोलीस व वनविभागाने छापा टाकला तेव्हा अकबर हुसेन यांच्या देखरेखीखाली कंटेनरमध्ये रक्तचंदन भरले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जेएनपीटी बंदरामध्ये येणाऱ्या मोठय़ा कंटेनर्समधून राज्यात वाहतुकीस बंदी असलेल्या रक्तचंदनाची तस्करी होत असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यात प्रामुख्याने चंदनाची झाडे आहेत. तेथील रक्तचंदनाची तस्करी करून तो माल जेएनपीटी बंदरातून राज्यात विविध भागांत नेला जात असल्याचा संशय आहे.

कर्जत-मुरबाड रस्त्याने ही तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याच रस्त्यावर साळोख गावाच्या हद्दीत नारळेवाडी भागात मुंबईच्या चेंबूर भागातील उद्योजक अकबर हुसेन ऊर्फ राजूभाई यांचा राजू फार्महाऊस आहे. या ठिकाणी रक्तचंदनाचा मोठा साठा कंटेनरमध्ये भरला जात असताना पोलीस व वनविभागाने छापा टाकला होता.

यावेळी आरोपी अकबर हुसेन आणि शब्बीर खान पठाण पळून गेले. या छाप्यात पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेले रक्तचंदन खूप जुने असल्याची शक्यता वनअधिकारी आर.बी. घाडगे यांनी व्यक्त केली.

राजू फार्मचे मालक अकबर हुसेन यांच्या पत्नी खैरुनिसा अकबर हुसेन या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका आहेत. तर फार्मचे मालक अकबर हुसेन हे अखिल भारतीय शेकापचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष असल्याची नोंद असलेला बॅनर फार्ममधील गोदामातून पोलिसांना सापडला. तर या बॅनरवर अखिल भारतीय शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांची छायाचित्रे आहेत.

मात्र, अकबर हुसेन हे पक्षाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष आहेत किंवा नाही, याची कुठलीही माहिती  सोमवारी सायंकाळपर्यंत पक्षाकडून दिली गेलेली नाही. या प्रकरणी पोलिसांचे पथक चेंबूरमध्ये दाखल झाले होते. छापा टाकला त्या ठिकाणी पोलिसांना पाच मोबाईल फोन सापडले. त्यातूनही माहिती घेणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  मात्र, या प्रकरणातील आरोपींचा अखिल भारतीय शेकापशी खरोखरच काही संबंध आहे का, याची माहिती आरोपींना पकडल्यानंतरच उघड होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version