Home टॉप स्टोरी मुंबई महापालिका निवडणूक- उपनगरांतील नगरसेवक वाढणार!

मुंबई महापालिका निवडणूक- उपनगरांतील नगरसेवक वाढणार!

0

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये होणा-या निवडणुकीत मुंबईतील २२७ मतदारसंघांची मतदारनिहाय फेररचना होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये होणा-या निवडणुकीत मुंबईतील २२७ मतदारसंघांची मतदारनिहाय फेररचना होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका २०१७ मध्ये होणार आहेत. या निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेने मतदार नोंदणी अहवाल तयार केले आहे. मुंबईत एकूण २२७ वॉर्ड असून त्यात वाढ होण्याची शक्यता नाही. मात्र २०११ मध्ये केलेल्या मतदारनिहाय जनगणनेनुसार उपनगरांमधील वॉर्डातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून शहरातील मतदारांमध्ये घट झाल्याचे आढळते. या चार वर्षातही नविन मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने मुंबईतील २२७ मतदारसंघात फेररचना होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उपनगरांमधील नगरसेवक वाढणार असून शहरातील लोकसंख्या कमी झाल्याने येथील नगरसेवकांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका अधिका-यांनी २०१७ मध्ये होणा-या महापालिका निवडणुकीची तयारी केली असून २०११ मध्ये केलेल्या मतदार जनगणनेनुसार अहवाल तयार केला आहे. हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेने पाठवला आहे. या अहवालानुसार मुंबईची लोकसंख्या वाढल्याने मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. मात्र याप्रकरणी निवडणूक आयुक्त पुढील निर्णय घेणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त आपला निर्णय राज्य सरकारकडे पाठवतील आणि शेवटी राज्य सरकार यावर मुंबई महापालिका कायद्यान्वये अखेरचा निर्णय घेईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दीड वर्ष उरले असून महापालिकेने या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार नोंदणीचे अहवाल तयार केले आहे. प्रत्येक वॉर्डाची भौगोलिक आणि मतदारनिहाय जनगणनेची नोंद करण्यात आली आहे. यात अनेक शहरी मतदार हे उपनगरांमध्ये वास्तव्याला गेल्याचे आढळून आले आहे. यात प्रामुख्याने पश्चिम उपनगरांमधील मतदारांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येते. तसेच काही मतदार हे दहिसरपुढील मिरारोड ते विरार-पालघर या पट्ट्यातही वास्तव्याला गेल्याचे निष्पण्ण झाले आहे.

यापूर्वी २००२ मध्ये मुंबईतील मतदार संघांची संख्या प्रभागनिहाय सरासरी ५० हजार मतदारांचे प्रमाण ठरवून २२१ वरुन २२७ पर्यंत वाढवण्यात आली. मात्र त्यावेळीच पश्चिम आणि पूर्व उपनगरातील मतदारांचे प्रभागनिहाय सरासरी प्रमाण हे ५४ हजार किंवा त्याहून अधिक होते.

२०११ च्या जनगननेनुसार मुंबईची लोकसंख्या १,२४,३२,८३० इतकी आहे. यात मुंबई शहर (दक्षिण मुंबई ते सायन आणि माहिमपर्यंची) लोकसंख्या ३१,०६,५१४ इतकी आहे. तर उपनगरांमध्ये ९३,२६, ३१६ (पश्चिम उपनगर- ५५,०९,८८८ आणि पूर्व उपनगर ३८,१६,४२८) मतदार आहेत. यापूर्वीच उपनगरातील वॉर्डांची संख्या सर्वाधिक आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार त्यात वाढ झाल्यास मुंबई महापालिकेचा सर्वाधिक फंड या उपनगरांमध्ये जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेसाठी एक हजारांहून अधिक केंद्र उघडण्यात येणार आहेत. येथे नव्याने नाव नोंदणी, तपासणी, नावात दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी पालिकेने २,१५० कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. १६ जानेवारी २०१६ पर्यंत अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे. यासाठी पालिकेने मुंबईतील राजकीय प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि शेकडो महिला स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

यानुसार, एक जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण असणा-या तरुण-तरुणींना आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. या मोहिमेत नवीन मतदार नोंदणी, नाव रद्द करणे, निवासी पत्त्यातील बदल, दुबार, मृत, स्थलांतरितांसह मतदार नोंदणीशी संबंधित कामे केली जाणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version