Home टॉप स्टोरी मुंबई-गोवा महामार्गाविषयी विचारताच गडकरींनी हात जोडले

मुंबई-गोवा महामार्गाविषयी विचारताच गडकरींनी हात जोडले

0

आधीच महामार्गाचे काम रखडलेले त्यात खड्ड्यांची भर पडल्याने, या अवघड प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी हात जोडत निघून जाणे पसंत केले.

पेण- केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पेणमध्ये आले होते. ही नामी संधी सोडायची नाही असा विचार करुन पत्रकारांनी गडकरींना गाठले. सोबत पालकमंत्री रविंद्र चव्हाणही होते. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांची चाळण झाल्याकडे पत्रकारांनी दोन्ही मंत्र्यांचे लक्ष वेधले. आधीच महामार्गाचे काम रखडलेले त्यात खड्ड्यांची भर. या अवघड प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा गडकरींनी हात जोडत निघून जाणे पसंत केले.

त्याचे झाले असे की, मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम गेल्या आठ वर्षांपासून सुरु आहे. त्यातच दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची दुरावस्था होत असून या महामार्गाची पुरती चाळण होऊन जाते. यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे होत आहे. या कालावधीत या मार्गावरील प्रवासच नको असे प्रत्येक प्रवासी व वाहन चालक म्हणत असतो. रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या महामार्गाची गेल्या दोन महिन्यात पावसामुळे ‘चाळण’ झालेली आहे. यामुळे सतत या महामार्गावर वाहनकोंडी होते. त्यात अपघातांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ झाली आहे.

या विषयी पत्रकारांनी विचारले असता कामाचा धडाका लावण्यात हातखंडा असलेले गडकरीही मुंबई-गोवा महामार्गावर बोलण्यास हतबल झाले. रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. मंत्री म्हणून मलाच त्याची लाज वाटते आहे. मात्र, हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचे आहे. नव्याने कंत्राटदार नेमला असून तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिल्याचे यावेळी गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच अधिक बोलण्यास नकार देत गडकरी यांनी हात जोडत निघून जाणे पसंत केले. या विषयावर रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही ‘मुंबई-गोवा नको’ म्हणत या विषयावर बोलणे टाळले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ला भेट देत विविध योजनांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी आपल्या खात्यातील विविध योजनांची माहिती दिली. या वेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. या महामार्गावरील पळस्पे ते इंदापूरदरम्यानचे काम रखडले आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून लोकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मला स्वत:ला ४ किलोमीटरचे अंतर कापायला अर्धा तास लागला. मंत्री म्हणून मला हा रस्ता पाहून खरोखर लाज वाटते. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या चुकांमुळे या रस्त्याचे का खोळंबळे आहे. हे आघाडी सरकारचे पाप आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा मार्गी लागावा यासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त केला आहे. हा पहिला टप्पा वगळता मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. मार्चपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version