Home महामुंबई मुंबईत आता प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहीम

मुंबईत आता प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहीम

0

मुंबईत दरदिवशी रस्ते साफ करून कचरा उचलला जात असला, तरी यापुढे दर शनिवारी प्रत्येक विभागात प्रभागनिहाय  स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

मुंबई- मुंबईत दरदिवशी रस्ते साफ करून कचरा उचलला जात असला, तरी यापुढे दर शनिवारी प्रत्येक विभागात प्रभागनिहाय  स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबई महानगर कायमस्वरूपी स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे याकरता स्वयंसेवी संस्थांच्या श्रमदानातून ही मोहीम राबवण्यात येणार असून यात सर्वच नागरिकांनी सहभागी होत सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या शाळा, रुग्णालये, मंडया, प्रशासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी महापालिका आयुक्त कुंटे भेट देत आहे. यासंदर्भात कुंटे यांनी अतिरिक्त आयुक्त विकास खारगे आणि संबंधित सहायक आयुक्त व खातेप्रमुखांची बैठक घेतली होती. स्वच्छ आणि सुंदर मुंबई साकारण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत महापालिका मुख्यालयासह सर्व आस्थापनांची कार्यालये, विविध विभाग कार्यालये व सर्व खात्यांमधील अधिकारी व कर्मचारी यांनीही आपल्या कार्यालयांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवणे आवश्यक असून, दर शुक्रवारी सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर दोन तास म्हणजेच साडेपाच ते साडेसात या वेळेत कार्यालयांमध्ये आणि तेथील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही कुंटे यांनी स्पष्ट केले.

माध्यमांना पालिकेचे आवाहन

महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेंतर्गत सातत्यपूर्ण विशेष कार्यक्रम राबवण्यात येतात. त्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर रोजी जनसंपर्क कार्यालयात जाहिरात व्यवस्थापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी प्रतिसाद दिला. ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानास’ वृत्तपत्रांकडून या मोहिमेबाबत कशाप्रकारे प्रसिद्धीसाठी सहकार्य मिळेल याविषयी लेखी कळवावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले. स्वच्छता मोहिमेंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम आणि मोहिमेचे माध्यम प्रायोजक होणे तसेच सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version