Home महामुंबई ठाणे मिनीट्रेन बंदच्या विरोधात माथेरानकर उतरले रुळांवर

मिनीट्रेन बंदच्या विरोधात माथेरानकर उतरले रुळांवर

0

माथेरान मिनीट्रेन ८ मेपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून यामुळे ऐन मोसमात माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

नेरळ- माथेरान मिनीट्रेन ८ मेपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून यामुळे ऐन मोसमात माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने मिनीट्रेन सुरू करावी, अशी मागणी करत माथेरानकर बुधवारी रुळांवर उतरले.

यावेळी माथेरानमधील बाजारपेठही बंद करण्यात आली होती. माथेरान स्थानकातून नेरळ लोकोशेडमध्ये नेण्यात येणार असलेली मिनीट्रेनही माथेरानकरांनी सायंकाळपर्यंत रोखून धरली होती. यानंतर येत्या १४ मे रोजी नेरळ रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माथेरानकरांनी केली आहे.

१ मे आणि ८ मे अशा दोन दिवशी माथेरानकडे निघालेली मिनीट्रेन रुळावरुन घसरली होती. याला खराब झालेले रुळ कारणीभूत असल्याने डागडुजीचे काम करण्यासाठी रेल्वेने मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या निर्णयाचा माथेरानला जाणा-या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होणार असून त्याचा केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरानच्या अर्थव्यवस्थेला थेट फटका बसणार आहे. त्यामुळे मिनीट्रेन सुरू करण्याची मागणी माथेरानकरांनी केली आहे.

दरम्यान, ८ मे रोजी सकाळी मिनीट्रेनचा अपघात होण्यापूर्वी एक मिनीट्रेन माथेरान स्थानकात उभी होती. ती अजूनही तिथेच असून सेवा बंद केल्याने ती बुधवारी नेरळ येथील लोकोशेडमध्ये आणण्यात येणार होती. मात्र याची कुणकुण लागताच माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली माथेरानकर रेल्वे स्थानकात जमले. यासाठी बाजारपेठही बंद करण्यात आली.

यानंतर मिनीट्रेन तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी माथेरान स्थानकात असलेली मिनीट्रेन सायंकाळपर्यंत रोखून धरण्यात आली. यावेळी रेल्वेने पोलिसांना बोलावल्याने तणाव वाढला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी १४ मे राजी नेरळ रेल्वे स्थानकात याबाबत आंदोलन करण्यात येईल, तसेच आपण यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करत असून १४ मेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वत: करणार असल्याचा संदेश पाठवला. यानंतर हे आंदोलन काहीसे थंडावले.

माथेरान पालिका प्रशासनही सरसावले

माथेरानचा सारा व्यवसाय मिनीट्रेनवरच अवलंबून असून त्यामुळे माथेरानचे नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांनी विशेष सभा बोलावत तेथे पोलीस आणि महसूल अधीक्षकांनाही निमंत्रित केले. यावेळी मिनीट्रेन सुरू करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी घोडा वाहतूक, हात रिक्षा वाहतूक आणि मालवाहतूक यांची प्रीपेड सेवा सुरू करण्याची मागणी केली. माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि सदस्य संतोष पवार यांनी प्रवासी माहिती केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

तसेच घोडा वाहतूक, रिक्षा वाहतूक यांच्या दरपत्रकाचे बॅनर बनवून लावण्याची सूचना केली. या दोन्ही बाबींची पूर्तता १२ मे पासून करणार असल्याची ग्वाही विशेष बैठकीत मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे आणि अधीक्षक कार्यालयाचे सहाय्यक लेखनिक राठोड यांनी सभागृहाला दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version