Home महामुंबई ठाणे माळशेज घाट तीन दिवस बंद

माळशेज घाट तीन दिवस बंद

0

कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाटात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याने मंगळवारी पूर्ण दिवस माळशेज घाट बंद राहिला.

मुरबाड- कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाटात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याने मंगळवारी पूर्ण दिवस माळशेज घाट बंद राहिला. त्यामुळे कल्याणमार्गे जाणारी वाहतूक ठप्प झाली. रस्ता सफाईसाठी तीन दिवस घाटरस्ता बंद राहणार आहे.

घाटातील बोगद्याजवळ दरड एका ट्रकच्या पुढील भागावर दरड कोसळल्याने ट्रकचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला, तर ट्रकचा चक्काचूर झाला. अमोल दहिफळे यांच्यावर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी जुलै महिन्यात १३ व १४ जुलै या दोन दिवसात माळशेज घाटात २ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर मंगळवार (२१ ऑगस्ट) पहाटे अडीचच्या सुमारास तेथूनच ५०० मीटर अंतरावर दरड कोसळली. दरड कोसळण्याच्या घटनेने पर्यटक सुद्धा हादरून गेले आहेत. भविष्यात माळशेज घाट मृत्यूचा सापळा बनेल की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांचे कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. माळशेज पावसाचा जोर कायम असल्याने व धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता सफाईमध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे माळशेज रोड -राष्ट्रीय महामार्ग ६१ वाहतुकीसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. सदर रस्ता सफाईसाठी महामार्ग अधिकारी व त्यांचे कर्मचारी तसेच मसूल कर्मचारी, टोकावडे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली. मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधरी यांनी माळशेज घाटात कोसळलेल्या दरडीची पाहणी केली आहे. माळशेज घाट दिवसेंदिवस प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने घातक बनत चालला असल्याची प्रतिक्रिया प्रवासी आणि वाहनचालकांनी व्यक्त केली.

सततच्या पावसामुळे संपूर्ण घाट खिळखिळा झाला आहे. त्यामुळे भविष्यात घाट रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून नाणेघाट मार्गे वाहतूक वळवली जाऊ शकते. यावर पुणे व ठाणे जिल्हाधिका-यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी व पर्यटक आणि वाहतूकदार यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version