Home प्रतिबिंब माफी मिळालीच पाहिजे!!

माफी मिळालीच पाहिजे!!

0

संजय दत्तला कालच्या गुरुवारी मीडियासमोर अगदी भडभडून आलं.. सर्व वाहिन्यांनी त्याची ब्रेकिंग न्यूज केल्यामुळे अर्थातच देशभर काल दुपारनंतर वारंवार त्याची दृश्यं दाखवली गेली आणि प्रसारमाध्यमांच्या साक्षीनं कॅमे-यांच्या डोळ्यांना हात लावणारा, बहीण प्रिया दत्तच्या खांद्यावर डोकं ठेवणारा संजूबाबा अनेकांनी पाहिला..
संजय दत्तला कालच्या गुरुवारी मीडियासमोर अगदी भडभडून आलं.. सर्व वाहिन्यांनी त्याची ब्रेकिंग न्यूज केल्यामुळे अर्थातच देशभर काल दुपारनंतर वारंवार त्याची दृश्यं दाखवली गेली आणि प्रसारमाध्यमांच्या साक्षीनं कॅमे-यांच्या डोळ्यांना हात लावणारा, बहीण प्रिया दत्तच्या खांद्यावर डोकं ठेवणारा संजूबाबा अनेकांनी पाहिला..

त्याला भडभडून आलेलं पाहून अनेकांना गलबलून आलं. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मरकडेय काटजू यांना तर आधीपासूनच गलबलून आलंय.. २१ मार्चला बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल लागल्यापासून संजूबाबाविषयी काटजू यांच्यासह अनेकांना उमाळा आलाय.. त्याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यातले १८ महिने त्याने आधीच तुरुंगात काढले आहेत. आता त्याची उरलेली साडेतीन वर्षाची शिक्षा माफ व्हावी म्हणून काटजू यांची धावपळ सुरू आहे. बिच्चा-या संजूबाबावर कोसळलेल्या या घनघोर आपत्तीमुळे ते तेव्हापासूनच अस्वस्थ आहेत.

२१ मार्चला शिक्षा ठोठावली गेल्यापासून संजय दत्त घराबाहेर पडला नव्हता तो गुरुवारी चित्रीकरणाला जाण्यासाठी बाहेर आला. तेव्हा तो मीडियाशी बोलला- न्यायालयाचा मी आदर करतो, न्यायसंस्थेबद्दल मला अतिव आदर आहे, न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मी चार आठवडयांत न्यायालयासमोर हजर होणार आहे. मला माफी मिळावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत असले तरी मी व्यक्तिश: माफीसाठी प्रयत्न केलेले नाहीत, अर्जही केलेला नाही.. मी खूप भोगलंय, माझ्या देशावर माझं प्रेम आहे.. असं बरंच काही तो बोलला आणि मग त्याला गहिवरून आलं.

काटजू यांनी बहुधा ते पाहिलं असणार.. त्यांनाही गलबलून आलं आणि ते बोलते झाले – संजय दत्त नाही म्हणाला म्हणून काय झालं.. मी त्याच्या माफीसाठी राष्ट्रपतींनाही पत्राद्वारे आवाहन करणार आहे. त्याने १८ महिने तुरुंगवास भोगलाय, त्याने या दीर्घ कालावधीत खूप काही सोसलंय, एक प्रकारे शिक्षाच भोगलीय आणि तो काही दहशतवादी नाही. म्हणूनच मी त्याच्यासाठी आवाहन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवलेलं नाही केवळ, त्याच्याकडे विनापरवाना शस्त्रे सापडल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.. माफीसाठी तो नक्कीच पात्र आहे.

महेश भट, जयाप्रदा, अमरसिंह या सगळ्यांनाच संजूबाबाविषयी गलबलून आलं आणि त्यांनी त्याच्या माफीसाठी एकच गलबला सुरू केला हे एक वेळ समजू शकतं.. पण काटजू यांच्यासारखी न्यायप्रिय, समतोल व्यक्ती जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापेक्षा वेगळी भाषा करतेय तेव्हा संजय दत्त नक्कीच माफीला पात्र असणार यात शंका नाही. त्याला माफी मिळालीच पाहिजे.

भले या बॉम्बस्फोटांसंदर्भात पोलिसांनी दाखल केलेले साक्षीपुरावे, कागदपत्रे, दूरध्वनी संभाषणांचे ध्वनिमुद्रण भले संजयच्या या कटातील व्यापक सहभागाबद्दल थेट ठपका ठेवत असले तरी दहशतवादाच्या आरोपातून त्याला टाडा कोर्टाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केले होते हे कसे नाकारता येईल.. ‘सालेमने गुजरातहून आणलेला शस्त्रसाठा संजय दत्तच्या गॅरेजमध्येच गाडीतून उतरवला गेला होता आणि त्यातलेच हातबॉम्ब, पिस्तूल आदी संजयने ठेवून घेतले होते. नंतर दाऊदचा भाऊ अनिसशी बोलून संजयनेच हातबॉम्ब त्याच्याकडून घेऊन जायला सांगितले होते..’ अशा कितीतरी बाबींचा पोलिसांनी पुराव्यांच्या कागदपत्रांमध्ये उल्लेख केला होता. (अधिक माहिती – द इंडियन एक्स्प्रेस, २३ मार्च, २०१३) यासंदर्भात त्या वेळी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. काळाच्या ओघात त्याच्यावर बॉम्बस्फोट कटात सहभागी असल्याबद्दलही पुराव्यानिशी आरोप ठेवण्यात आले होते हे आता विस्मरणात गेले आहे.

त्यामुळे आता काटजू म्हणताहेत तेच बरोबर आहे. संजय दत्त केवळ विनापरवाना शस्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरला आहे. आता तो म्हणतोय त्याप्रमाणे त्याचा बॉम्बस्फोटांच्या कारस्थान्यांशी, दुबईतील डॉनच्या मुंबईतील बगलबच्च्यांशी, हनीफ कडावाला, समीर हिंगोरा यांच्याशी काहीही संबंध नव्हता, ओळखही नव्हती साधी. त्याच्याकडे विनापरवाना शस्त्रे सापडली इतकंच. कोणीतरी म्हणेल संजय दत्तला वेगळा न्याय लावला जातोय.. तुमच्या-आमच्यातल्या एखाद्याकडे एके-४७ नव्हे पिस्तूल नव्हे एखादी चाकू-सुरी जरी सापडली तरी त्याचे काय हाल झाले असते, तो आजवर तुरुंगात खितपत पडला असता, त्याला माफी द्यावी, असा कुणी गळा काढला असता का? कुणी अशा इसमाच्या मदतीला धावले असते का आणि समजा कुणी टाहो फोडलाही असता तरी त्याला माफी मिळाली असती का? असंही कोणी उद्वेगाने म्हणू शकतं.. पण, एके काळी न्यायव्यवस्थेचा भाग असलेल्या न्या. काटजू यांचं म्हणणं दुर्लक्षून कसं चालेल? संजय दत्तला केवळ विनापरवाना शस्त्रे सापडल्याबद्दल दोषी ठरवलं गेलं आहे.. त्याला माफी मिळालीच पाहिजे, असंच त्यांना वाटतंय..

सर्वसामान्यांना काय काहीही वाटू शकतं. संजय दत्तने मीडियासमोर उत्कृष्ट अभिनय केला असंही कुणाला वाटेल. त्याची पत्रकार परिषद पाहून कुणाला ‘शिकागो’ चित्रपटातील एका खुनी महिलेने मीडियाचे मन वळवण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा सीनही आठवला असेल, कुणा भावनाप्रधान व्यक्तींना या बॉम्बस्फोटांत बळी गेलेले मुंबईकर आठवतील, या स्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांतील मागे राहिलेल्यांनी दाऊद, टायगर मेमन, त्यांचे बगलबच्चे, पाकिस्तान, संजय दत्त यांच्या नावाने भलेही बोटे मोडली असतील. पोलिसांनी खटल्यादरम्यान प्रारंभी भले काहीही पुरावे सादर केलेले असोत. आजघटकेला काटजू यांच्यासारखी नामवंत मंडळी काय म्हणतात ते महत्त्वाचे आहे. बिच्चा-या संजय दत्तला माफी मिळायलाच हवी!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version