Home महामुंबई ठाणे माथेरान, नेरळ पाणी योजनेचे पंपहाऊस होणार सील!

माथेरान, नेरळ पाणी योजनेचे पंपहाऊस होणार सील!

0

कर्जत तालुक्यातील माथेरान, नेरळ तसेच तालुक्यातील अनेक नळ पाणीपुरवठा योजना उल्हास नदीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. 

नेरळ- कर्जत तालुक्यातील माथेरान, नेरळ तसेच तालुक्यातील अनेक नळ पाणीपुरवठा योजना उल्हास नदीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. अनेक पाणी योजनेच्या उद्भव विहिरींना उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो.

परंतु नदीतून पाणी उपसा करताना या ग्रामपंचायतींनी आजवर पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसे कराराही केले नाहीत. त्यामुळे आजवर उपसा केलेल्या पाण्याची वर्गवारीनुसार दंडनीय देयके तयार करण्यात आली आहेत.

ही देयके १३ मे पर्यंत भरावी अन्यथा १६ मे पासून या ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा खंडित करून पंपहाऊस सील करण्यात येईल. अशा नोटिसा संबंधित ग्रामपंचायतीना देण्यात आल्या असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील राजनाला, उल्हासनदी आणि पेजनदीतून पाणी उपसा करताना पाटबंधारे विभागाची परवानगी घेणे किंवा तसे करार करणे बंधनकारक आहे. परंतु माथेरानला सुरू असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना व नेरळ, देवपाडा, बोरीवली व उमरोली या ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या पाणी योजनांसाठी पाटबंधारे विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनधिकृतपणे पाणी उपसा केला जात आहे, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

तसेच नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेची पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीनुसार नेरळ ग्रामपंचायत १५० अश्वशक्तिच्या पंपाने सुमारे २४ तास पाणी उचलत असल्याचे आढळून आले आहे.

माथेरानच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेला २००४ मध्ये मुख्यअभियंता यांनी मंजुरी दिली होती. परंतु अद्याप याबाबत कोणताही करार केला नसून २००६ पासून बिले ही भरलेली नाहीत. त्यामुळे थकबाकी थकल्याने त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

ज्या ग्रामपंचायती १३ मे पर्यंत ही देयके भरणार नाहीत त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. व त्यामुळे उद्भवणा-या पाणी समस्यांना सर्वस्व ग्रामपंचायती जबाबदार राहणार असल्याचेही पाटबंधारे विभागाने या नोटीसीत म्हटले आहे.

नेरळ ग्रामपंचायतीची सुमारे ३ कोटींची थकबाकी असून माथेरान पाणी योजनेचे २८ लाख व देवपाडा, बोरीवली व उमरोली पाणी योजनेची लाखो रुपयांचे बिल थकले आहेत. परंतु पाटबंधारे विभागाने सुमारे दहा वर्षानंतर ही बिले ग्रामपंचायतींना पाठविली आहेत. त्यामुळे या मागचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उल्हासनदी, राजनाला व पेजनदीतून ज्या ग्रामपंचायती कोणतीही मंजुरी न घेता पाणी उपसा करत आहेत ते शासनाचा धोरणाप्रमाणे बेकायदेशीर आहे. अनेक वर्षे ज्या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची थकबाकी शासनाला भरली नाही. अशा ग्रामपंचायतींनी १३ मे पर्यंत थकबाकी भरली नाही. तर अशा ग्रामपंचायतींचे पंपहाऊस १६ मे पासून सील करण्यात येणार आहेत.

पंकज दाभिरे, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे उपविभाग कर्जत

माथेरानच्या पाणी योजनेची बिले पाटबंधारे विभागाने ९ वर्षानी दिली आहेत आणि तिही बिले चुकीची आहेत. आम्ही माथेरानला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी वापरत नाही. पावसाळ्यात आम्ही माथेरानमधील शार्लोट लेकचे पाणी वापरतो. त्यामुळे ही दिलेली बिले चुकीची आहेत. ही जर बिले प्रत्येकवर्षी दिली असती तर भरली गेली असती. तसेच हे बिल वर्षभराच्या रििडगनुसार देण्यात आली आहेत. ती चुकीची असून हे बिल योग्य करून दिल्यास भरण्यात येईल

ए. आर. थरकर, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कर्जत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version