Home महामुंबई माथेरानच्या राणीचा शिरस्ता मोडला

माथेरानच्या राणीचा शिरस्ता मोडला

0

माथेरानची राणी कधीही सूर्यास्तानंतर धावत नाही. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून हा शिरस्ता जपण्यात आला होता. मात्र, बुधवारी मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या उपस्थितीत हा शिरस्ता मोडला.

माथेरान – माथेरानची राणी कधीही सूर्यास्तानंतर धावत नाही. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून हा शिरस्ता जपण्यात आला होता. मात्र, बुधवारी मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या उपस्थितीत हा शिरस्ता मोडला. सूर्यास्तानंतर निघालेली मिनी ट्रेन रात्री साडेनऊ वाजता नेरळला पोहोचली. त्यामुळे साडेचारपासून ट्रेनमध्ये बसलेल्या पर्यटकांचे अतोनात हाल झाले.

माथेरानमध्ये १९०७ पासून नॅरोगेजवर मिनी ट्रेन चालवली जाते. वेडयावाकडया वळणांमुळे ही ट्रेन सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत बंद ठेवली जाते. रुळांवर एखादा मोठा दगड पडला असेल आणि अंधारामुळे तो मोटरमनला दिसला नाही तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ब्रिटिशांनीच हा पायंडा पाडला होता. आजवर केवळ दोनदा अपवादात्मक स्थितीत मिनी ट्रेन सूर्यास्तानंतर धावली.

रेल्वेने हा शिरस्ता मोडण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. मात्र, माथेरानला भेट देण्यासाठी आलेल्या मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत २१ नोव्हेंबरला हा शिरस्ता मोडण्यात आला. सामान्यपणे ४.४०ला मिनी ट्रेन माथेरानहून नेरळकडे निघते. मात्र महाव्यवस्थापकांना आणि त्यांच्या मित्रांना मिनी ट्रेनने जाता यावे, यासाठी ट्रेन थांबवून ठेवण्यात आली.

सहापैकी तीन डबे पर्यटकांनी भरून गेले होते. कुटुंबीयांसोबत आलेल्यांनी दुपारपासूनच तिकीट काढून ट्रेनमध्ये जागा पकडून ठेवली होती. मात्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन आणि मुंबई विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांना आपल्या मित्रांबरोबर नेरळला पोहोचता यावे म्हणून मिनी ट्रेन माथेरान स्थानकातच अडवून ठेवण्यात आली. ४.४०ला सुटणारी मिनी ट्रेन ७.१५ ला सोडण्यात आली.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांमुळे ९० पर्यटकांना तब्बल सहा तास आपल्या कुटुंबीयांसह ट्रेनमध्ये ताटकळावे लागले. मध्य रेल्वेच्या अधिका-यांबरोबर असलेल्या त्यांच्या मित्रांसाठी मिनी ट्रेनमध्ये भोजनाची सोय करण्यात आली होती. मात्र, अन्य प्रवाशांना नाहकच गैरसोय सहन करावी लागली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version