Home महामुंबई माथाडी कामगारांची अभेद्य शक्ती जागृत राहिली पाहिजे : शरद पवार

माथाडी कामगारांची अभेद्य शक्ती जागृत राहिली पाहिजे : शरद पवार

0

बाजार समिती कायदा रद्दची किंमत मोजावी लागेल, माथाडी जनरल कामगार युनियन मेळावा उत्साहात

मुंबई – अलीकडच्या काळात सरकारची धोरणे बदलू लागली आहेत. बाजार समितीचा कायदा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जर बाजार समितीचा कायदा काढला तर सर्वात जास्त किंमत माथाडी कामगारांना मोजावी लागेल, अशी खंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईतील माथाडी कामगार मेळाव्यात व्यक्त केली.

माथाडींचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट, तुर्भे नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार तमाम माथाडी कामगारांच्या वतीने करण्यात आला. पवार पुढे म्हणाले, आपणास यापुढे जागरूक राहिले पाहिजे. शेतीमालाची कुणी लूट करू नये. तसेच कामगारांना योग्य वेतन मिळावे जुना बाजार कायदा टिकलाच पाहिजे, यामध्ये कोणतीही पळवाट काढता कामा नये. माथाडी कामगारांवर आत्तापर्यंत अनेक संकटे आली. प्रश्न निर्माण झाले पण त्या त्या वेळी माथाडी कामगार जोमाने संघटित झालेला दिसून आला.

आज माथाडी बोर्डाची अवस्था बिकट आहे. अनेक बोर्डाना अध्यक्षच नाहीत. त्याचा परिणाम माथाडी कामगारांवर होत आहे. त्यामुळे कामगारांनी संघटितपणे संघर्षाला तयार राहिले पाहिजे. राज्य सरकारने माथाडींच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. आज जरी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत तरी माथाडींच्या कोणत्याही प्रश्नासाठी आपण सर्वजण त्यांच्याकडे जाऊ. पण माथाडी कामगारांचे हित जपत राहू, नाशिकमधील कामगारांच्या प्रश्नासाठीही पुढील आठवडय़ात बैठक घेऊन प्रश्न तडीस लावू, असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यांनी माथाडी पतपेढीच्या कार्याचेही कौतुक यावेळी केले.

प्रास्ताविकामध्ये माथाडी नेते व आमदार नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटलांच्या कार्याचा गौरव केला. तसेच ज्या ज्यावेळी माथाडी कामगारांवर संकटे आली त्या-त्यावेळी शरद पवार हे आमचे नेते म्हणूनच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे जोपर्यंत माथाडी कामगार चळवळ जिवंत आहे तोपर्यंत हा माथाडी कामगार शरद पवार यांच्या पाठीशी असेल, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पावधीतच माथाडी कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचेही ते म्हणाले.

माथाडी युनियनचे कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात अण्णासाहेब पाटलांच्या कार्याची माहिती सांगताना शरद पवार यांचे कामगारांशी असलेले अतूट नाते विशद केले. माथाडी कामगारांतर्फे होणारा शरद पवार यांचा सत्कार हा त्यांच्या उपकाराची उतराई म्हणून नव्हे तर हे आमचे दायित्व म्हणून करत असल्याचा आवर्जून उल्लेख शिंदे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची बैठक लावावी असे आवाहन केले. यावेळी तटकरे यांनी शरद पवार यांच्यामुळे माथाडी कामगारांच्या सुटलेल्या अनेक प्रश्नांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री गणेश नाईक, मुंबई बँकेचे संचालक प्रसाद लाड यांचेही कै. अण्णासाहेब पाटील आणि शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन माथाडी युनियनचे सेक्रेटरी पोपटराव देशमुख यांनी केले तर आभार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version