Home देश माजी मंत्री जयंती नटराजन यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

माजी मंत्री जयंती नटराजन यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

0

माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह तामिळनाडू काँग्रेसच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. 

नवी दिल्ली – माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह तामिळनाडू काँग्रेसच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. बडय़ा कंपन्यांच्या प्रकल्पांना पर्यावरणविषयक परवानग्या देण्यासाठी राहुल गांधी यांच्या सूचना येत असत, असा आरोपही नटराजन यांनी यावेळी केला.

त्या म्हणाल्या,‘पर्यावरणविषयक मंजुरींबाबत राहुल गांधी यांच्याकडून ठरावीक सूचना मिळाली होती. पक्षात होणा-या घुसमटीमुळे मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा, तसेच तामिळनाडू काँग्रेसच्या विश्वस्त पदाचा राजीनामा देत आहे’.

बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाविषयी राहुल गांधी यांना दिलेल्या शिफारशी मला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मी निर्णय घेतले. त्यानंतर राहुल गांधी यांनी फिक्कीच्या परिषदेत उद्योजकांना पर्यावरणविषयक मंजुरींची अडचण येणार नाही, असे सांगितले. मला पंतप्रधानांकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आले, असेही त्या म्हणाल्या.

यूपीए सरकारमधील एका माजी मंत्र्याने राहुल गांधी यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात केलेले हे काँग्रेसमधील अलीकडच्या काळातील मोठे बंड असल्याची चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आता तामिळनाडूत काँग्रेस वाढेल
तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ई.व्ही.के.एस इलांगोवन यांनी जयंती नटराजन यांना पक्ष सोडल्याबद्दल धन्यवाद दिले. जयंती यांनी राजीनामा दिल्याने राज्यात पक्ष चांगला वाढेल. तसेच काँग्रेसला उज्ज्वल भवितव्य असेल, असा टोलाही लगावला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version