Home महामुंबई महायुतीतीलमित्र पक्ष अधांतरी

महायुतीतीलमित्र पक्ष अधांतरी

0

शिवसेनेने भाजपला जागावाटपाच्या दिलेल्या नव्या सूत्रानुसार मित्र पक्षांच्याच जागा लाटल्या गेल्या आहेत.

मुंबई – शिवसेनेने भाजपला जागावाटपाच्या दिलेल्या नव्या सूत्रानुसार मित्र पक्षांच्याच जागा लाटल्या गेल्या आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं आणि शिवसंग्राम यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शिवसेना आणि भाजप आपल्याला बळीचा बकरा बनवत असल्याची भावना या पक्षांची झाली असून त्यांनी आता वेगळा विचार करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय शिवसेनेने असा काही सुधारित प्रस्ताव भाजपला दिला आहे, त्यावर मंगळवारी सायंकाळी मित्र पक्षांबरोबर चर्चा केली जाणार आहे, याची साधी माहितीही त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे या सर्वानीच संताप व्यक्त केला आहे.

अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या घटक पक्षांच्या पदरी अखेर निराशाच आली आहे. नव्या सूत्रानुसार त्यांच्या वाटय़ाला ११ जागा येणार आहेत. त्यांच्या वाटय़ाच्या सात जागा कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणाला किती जागा मिळणार आणि त्यातून काय पदरी पडणार, या विचारानेच ते अस्वस्थ झाले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला जर बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे. त्याबाबत महादेव जानकर यांच्याशी चर्चा करून स्वतंत्रपणे उमेदवार उभे करू, असे खोत यांनी स्पष्ट केले. त्यातूनच त्यांनी एक दिवस वाट पाहून आपल्या संभावित उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचेही सांगितले.

जानकर यांनीही निवडून येणा-या जागा मिळाल्या नाहीत तर महायुतीत राहणार नसल्याचे स्पष्ट केले. रामदास आठवले यांनीही नवे सूत्र फेटाळून लावले असून रिपाइंला दोन आकडी जागा मिळाल्याच पाहिजेत ही मागणी लावून धरली आहे. महायुतीमध्ये नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनीही आम्हाला कोणी गृहीत धरू नये, असा इशारा देत ५० ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारीच सुरू केली आहे. त्यामुळे भाजप-सेनेच्या रुसव्या-फुगव्यानंतर घटक पक्षांनी कमी जागा मिळत असल्याने आक्रमक होण्याची भूमिका घेतली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version