Home कोलाज महाभारतातील श्रीकृष्ण

महाभारतातील श्रीकृष्ण

0

कूटनीतीत कुणाला हार न जाणारा, कधीही हताश न होणारा, जीवनाकडे खेळकरपणे पाहणारा, तत्त्वासाठी आपल्याच देशवासियांचा घात न करणारा, व्यवहारपुरुषोत्तम धीरोदात्त नेता म्हणजे श्रीकृष्ण. अशा नेत्याची उणीव आज सर्वाना प्रकर्षाने जाणवते; पण याहून थोडी वेगळी, अशी श्रीकृष्णाची तिसरी एक ओळख आहे. ती म्हणजे विशिष्ट काळातील सत्तासंघर्षाच्या राजकारणामागील कूटनीतीचा सूत्रधार असलेला ऐतिहासिक पुरुष श्रीकृष्ण.

श्रीकृष्ण ही महाभारताची निर्मिती आहे. महाभारत एक महाकाव्य आहे, धर्मशास्त्र आहे, भारतीय जीवनाचा ज्ञानकोश आहे. त्याला इतिहासही म्हटले आहे. त्याकडे कादंबरी म्हणूनसुद्धा पाहता येते. कल्पित, अद्भुत आणि वास्तव यांचे अजब मिश्रण त्यात आढळते. दिव्यकथा व दंतकथा यांची रेलचेल आहे. महाभारत एक साहित्यशिल्प आहे. त्याची एक देणगी म्हणजे श्रीकृष्ण. मानवी प्रतिभेची ती अलौकिक निर्मिती होय. कुशाग्र बुद्धीचा, ज्ञानी, पराक्रमी, प्रेम या संकल्पनेचा आदर्श, विलास भोगून अनासक्त, सुजनांचा त्राता, दुर्जनांचा काळ, परमेश्वराचा पूर्णावतार योगेश्वर कृष्ण महाभारताने दिला. तो माणूस असून देव आहे; पण या कृष्णाची दुसरी एक ओळखसुद्धा लोकप्रिय आहे.

कूटनीतीत कुणाला हार न जाणारा, कधीही हताश न होणारा, जीवनाकडे खेळकरपणे पाहणारा, तत्त्वासाठी आपल्याच देशवासियांचा घात न करणारा, व्यवहारपुरुषोत्तम धीरोदात्त नेता म्हणजे श्रीकृष्ण. अशा नेत्याची उणीव आज सर्वाना प्रकर्षाने जाणवते; पण याहून थोडी वेगळी, अशी श्रीकृष्णाची तिसरी एक ओळख आहे. ती म्हणजे विशिष्ट काळातील सत्तासंघर्षाच्या राजकारणामागील कूटनीतीचा सूत्रधार असलेला ऐतिहासिक पुरुष श्रीकृष्ण. तो महाभारतातील चाणक्य पुरेसा परिचित नसल्यामुळे त्याचा शोध इथे घेऊ.

एखादी कहाणी ऐतिहासिक असेल तर तिचे स्थलकाल निर्णय पुराव्यानिशी सिद्ध व्हावे लागतात. ज्या भौगोलिक प्रदेशावर या घटना घडल्या त्यांचा भूगोल आणि त्या केव्हा घडल्या त्याचा काळ ठरवण्याचे प्रयत्न संशोधकांनी केलेले आहेत, ते थोडक्यात पाहू. महाभारताच्या बाबतीत मुख्य अडचण म्हणजे व्यासांच्या मूळ कथेत स्थलकालनुरूप भर पडत गेलेली आहे. ही प्रक्रिया दोन हजार वर्षे चालू होती. त्यामुळे महाभारतकाळ असा काळ नाही, तरी त्यात ऐतिहासिक तथ्य आहे.

पाली वाडमयानुसार गौतम बुद्धाचा वेळी म्हणजे इ.स.पू. सहाव्या शतकात, उत्तर भारतात जी छोटी-मोठी गणराज्ये- राज्ये पसरलेली होती त्या बहुतेक सर्वाचे राजे भारतकथेतील व्यक्तींना आपले पूर्वज मानीत. याचा अर्थ भारतीय युद्ध ही अविस्मरणीय घटना पूर्वी केव्हातरी घडून गेली असणार. शिवाय सूतकथांनी ही घटना लोकमानसात जिवंत ठेवली होती. एका असामान्य प्रतिभावंताला त्यावर महाकाव्य रचण्यासाठी स्फूर्ती मिळाली एवढी ती घटना महत्त्वाची होती. कल्पित उभे करण्यासाठीसुद्धा वास्तवाची बैठक लागते; पण त्याचा काळ कसा ठरवणार?
महाभारतानुसार गंगेच्या काठचे हस्तिनापूर सर्वात जुने नगर.

उत्खनानुसार तेथे इ.स.पू. ९व्या शतकापूर्वी मानवी वस्तीच झालेली नव्हती. जयद्रथाचा अर्जुनाकडून दिवसाढवळय़ा वध करवण्यासाठी श्रीकृष्णाने अंधार करविला. प्रत्यक्षात ते खग्रास सूर्यग्रहण असावे, असा तर्क केला जातो. कुरुक्षेत्रावर खग्रास सूर्यग्रहण अवश्य दिसले होते; पण खगोलशास्त्रज्ञांनुसार ते इ.स.पू. १०व्या शतकाच्या सुरुवातीला, ४ ऑक्टोबर ९९५ रोजी. म्हणजे ही तारीख आपोआप बाद होते. महाभारताच्या प्राचीनत्वावर मर्यादा पडते. याहून प्राचीन नाही, हे निर्विवाद सिद्ध होते. या काळात केव्हातरी कौरव – पांडव युद्ध झाले. त्याला मुळात टोळी समाजांतील द्वंद्वयुद्धाचे स्वरूप होते. अठरा दिवस चाललेल्या युद्धात रोजचे नायक वेगळे असतात. जय-पराजय त्यांच्यावर अवलंबून असतो. हे एका अर्थाने धर्मयुद्धच असते. तेव्हा लोखंडाचा वापर अत्यल्प होता. गंगेचे खोरे जंगलाने व्यापलेले होते. उत्खनातून एखाद्या साहित्यकृतीवर थेट प्रकाश पडत नाही. पण संशोधकांचा निष्कर्ष हा की, महाभारत कथेचा गाभा ख्रिस्तपूर्व ८०० ते ५०० आहे, त्याहून प्राचीन नाही.

पुढच्या चारशे वर्षात (इ.स.पू. ५०० ते इ.स.पू. १००) लोहयुगाचा परिणाम म्हणून जंगलतोड होऊन अधिकाधिक जमीन शेतीखाली आली. समृद्धीबरोबर लोकसंख्या वाढली. सदर काळातील जीवनाचे संस्कार महाभारताच्या कथानकावर होत गेले. त्यानंतरच्या पाचशे वर्षात (इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ४००) भारतात इराणी, ग्रीक, रोमन, शक, कुशाण वगैरेंचे आगमन झाले. रोमन साम्राज्याशी भारताचा व्यापार चालू होता. समृद्धी नांदत होती. भारतीय समाज जीवनात आमुलाग्र बदल झाले. त्या सर्वाचे प्रतिबिंब महाभारतकथेत उमरले. तसेच गीता महाभारताच्या चौकटीत बसवली गेली. इ.स.पू. ४०० नंतरच्या काळात महाभारतात भर पडत गेली ती साधारणत: धार्मिक स्वरूपाची आढळते.

पण केवळ पुरातत्त्व आणि चिकित्सक आवृत्ती यांजवर विसंबून महाभारताचे ऐतिहासिक रहस्य कळणार नाही. त्यासाठी काही अनुत्तरित प्रश्नांना समोरे जावे लागेल. कौरव, पांडव व यादव हे सर्व चंद्रवंशी आहेत, एकमेकांचे नातलग किंवा संबंधी आहेत, क्षत्रिय आहेत तरी त्यांच्यात हाडवैर निर्माण होण्याचे कारण काय व त्यात श्रीकृष्ण कोणती भूमिका का व कशी बजावतो याचे उत्तर राजकीय पातळीवर शोधावे लागते. महाभारताचे कथानक ययातीपासून सुरू होत असले तरी राजकीय इतिहासाचा आरंभ कृष्णापासून होतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. श्रीकृष्ण व पांडव यांची भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी होते. त्याचवेळी कृष्णाने आपला राजकीय मित्र व चेला पक्का केला. पुढील घटनाक्रम असा : सुभद्राहरण, रुक्मिणीहरण, जरासंधाचा वध, राजसूय यज्ञ, शिशुपालवध, भारतीययुद्ध, पांडवांकडून यादवांची मूळ भूमी मधुरा-गोकूळ परत मिळवणे. हे श्रीकृष्णाच्या डावपेचांचे प्रमुख टप्पे होत.

नरहर कुरुंदकरांनी ते दाखवून दिले आहेत. तरी त्यांचे लेखन वेगवेगळय़ा संदर्भात झालेले असल्यामुळे सलग हकीगत कळत नाही. ती उणीव येथे भरून काढली आहे. कुरुंदकरांनंतरचे अन्य संशोधनही विचारात घेतले आहे. मथुरेच्या परिसरात यमुनेच्या दोन्ही किना-यांवर यादवांची छोटी-छोटी गणराज्य होती. त्यांत राजा नसे; गणप्रमुखांनी निवडून दिलेला नेता असे. कृष्णाचा मामा, कंस तिथे स्वत:ची राजसत्ता स्थापण्याच्या प्रयत्नात होता. यादव प्रदेशांच्या पूर्वेकडे मगधाचे साम्राज्य होते. त्याचा प्रबळ राजा जरासंध. त्याने गणतंत्रे बुडवून स्वत:ची राजसत्ता स्थापन केली होती. कंसाचा प्रबळ राजा जरासंध. त्याने गणतंत्रे बुडवून स्वत:ची राजसत्ता स्थापन केली होती.

कंसाचा तो सासरा. या राजकीय युतीमुळे गणतंत्रवादी यादवांना कंसाला संपविणे अटळ होते. ते काम श्रीकृष्णाने पार पाडले. कसे, कितव्या वर्षी याला महत्त्व नाही; पण त्यामुळे जरासंध यादवावर सूड उगवणार हे नक्की झाले. मगधचे पहिले काही हल्ले यादवांनी यशस्वीपणे परतविले; पण एका बलाढय सम्राटाला आपण पुरून उरू शकणार नाही, हे कृष्णाने ओळखले. सर्वनाश टाळण्यासाठी त्यांनी कृष्णाच्या सल्ल्यानुसार मातृभूमीचा त्याग केला व द्वारकेला आपले नवे गणतंत्र स्थापन केले. तेथे जरासंधाचा हल्ला होण्याची शक्यता नव्हती; कारण त्यासाठी मगधाच्या सैन्याला हस्तिनापूरच्या कुरू राज्यातून पार व्हावे लागणार. कुरुंचा नेता भीष्म. त्याच्याशी लढवण्याची चूक जरासंध करणार नाही, हे कृष्णाने ताडले होते. त्यावेळी कौरव-पांडव एकत्र शिकत होते, वयाने लहान होते.

मथुरा -गोकूळातील यादव कलोपासक शांतताप्रिय लोक होते. गोधन हेच प्रमुख धन, शेती बेताची. गायी-बैलांची पैदास, दुग्धजन्य पदार्थाची विक्री हे उपजीविकेचे साधन. रात्रौ यमुनेकाठी सर्व स्त्री-पुरुष रास खेळत, एकटा कृष्ण नव्हे; पण द्वारकेला जाताच त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. ते सागरी संस्कृतीशी व व्यापाराशी जोडले गेले. इ.स. पहिल्या शतकात शकांना मोसमी वा-यांचा शोध लागल्यापासून रोमशी होणारा व्यापार वाढला. सुबत्ता आली, द्वारका सोन्याची झाली. आता इंद्रपस्थ येथे गंगेच्या काठी पांडवांचे राज्य स्थापन झाले; पण द्रौपदीच्या बाबतीत पाळावयाच्या नियमाचा भंग झाल्यामुळे बारा वर्षाची हद्दपारी भोगून अर्जुन प्रथम हजर झाला तो द्वारकेला. या वास्तव्यात सुभद्रा अर्जुनाच्या मनात भरली. हे श्रीकृष्णाने ओळखले. स्वत:च्या बहिणीचे हरण करण्याचा सल्ला श्रीकृष्णानेच अर्जुनाला दिला. हे कृत्य अनेक यादवांना आवडले नव्हते; पण ते अखेर आपल्याच फायद्याचे आहे, असा युक्तिवाद कृष्णाने केला. द्रौपदीमुळे पांचाळ व पांडव एक झाले होतेच. सुभद्रेमुळे पांडव-यादव युती बळकट झाली.

यादवांच्या प्रदेशापासून विदर्भाचे राज्य फार दूर नव्हते. त्याचा राजा भीष्मक जरासंधाचा चाहता होता. जरासंधाचा मित्र चेदी देशाचा राजा शिशुपाल याला भीष्मकाची कन्या देण्याचे रीतसर ठरले होते; पण त्यामुळे विदर्भ-चेदी-मगध यांची यादवविरोधी फळी उभी राहणार होती. ती मोडून काढणे श्रीकृष्णाला आवश्यक होते. शिशुपालाचा नातलग म्हणून कृष्ण विवाहाला हजर झाला. कुणालाही त्याच्या हेतूचा संशय आला नव्हता; पण अचानक वधूला रथात घालून सोने-नाणे, संपत्तीसह त्याने द्वारकेला पलायन केले. सुभुद्रा-अर्जुन यांच्याप्रमाणे हासुद्धा त्याकाळी शिष्टसंमत असलेला राक्षसविवाहच होता. कृष्णाने विदर्भाची कंबरच मोडली.

पण यामुळे चवताळलेल्या पराक्रमी जरासंधाचा काटा काढणे अटळ झाले. हे काम आपल्या हातून होणारे नाही, हे श्रीकृष्ण ओळखून होता. जरासंधाला आव्हान देऊ शकेल असा फक्त भीमच होता. जरासंधाचा वीक पॉईंट श्रीकृष्णाला माहीत होता. म्हणून जरासंधाला कसे मारावे, हे त्याने भीमाला शिकविले. रात्रीच्या वेळी वेश पालटून कृष्ण, अर्जुन व भीम शत्रूच्या राजवाडय़ात घुसले. त्यांनी जरासंधाकडे युद्धभिक्षा मागितली. मल्लयुद्धात भीमाने त्याला ठार केले. श्रीकृष्ण कौरवांशी युती करू शकत होता. त्याचे स्वागतच झाले असते; पण त्यात श्रीकृष्णाचे स्थान भीष्मापुढे दुय्यम राहिले असते. ‘‘मला सत्ता नको; पण नेहमी माझेच ऐका’’ हे धोरण तेथे चालले नसते. सत्पक्ष म्हणून त्याने पांडवांची निवड केली नव्हती. दोन्ही पक्षांतील नायक या ना त्या कारणाने विकारवश व रक्षणशील आहेत.

दोषी आहेत. कृष्णाने युक्त्या-प्रयुक्त्या योजून आपला राजकीय हेतू साध्य केला. त्यासाठी पांडवांना विजय मिळवून दिला.  जरासंधाला संपविल्यामुळे इंद्रप्रस्थचे राज्य बरेच प्रबळ झाले. त्यानंतर श्रीकृष्ण एक अत्यंत धूर्त खेळी खेळला. पांडवांना त्याने राजसूय यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सर्व राजांना आमंत्रण दिले गेले. जे हजर झाले त्यांनी नकळत पांडवांचे वर्चस्व मान्य केल्यासारखे होते. तत्त्वनिष्ठ भीष्माने आमंत्रण स्वीकारले. त्यामुळे दुर्योधन आदिंचा जळफळाट झाला, तरी त्यांना मूग गिळून स्वस्थ बसावे लागले. यज्ञात अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा असा प्रश्न उभा राहिला. बहुमताने त्यासाठी कृष्णाची निवड झाली. त्याला शिशुपालाने विरोध केला. आपली वाग्दत्त वधू रुक्मिणीला पळवून नेणा-या कृष्णावर त्याचा राग होताच. पण त्याने उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा नव्हता. त्याचे म्हणणे ‘‘हा मान राजाचा असतो, तो कोणत्याही राजाला द्या. पण कृष्णाला नको; कारण तो राजा नाही.’’ यावरून झालेल्या वादावादीत झटापट होऊन त्यात कृष्णाने शिशुपालाचा वध केला.

पुढे भारतीय युद्ध अटळ झाल्यावर श्रीकृष्णाने पांडवांना विजय मिळवून देण्यासाठी धर्मयुद्धाचे नियम बाजूला सारून काय काय केले ते सर्वश्रुत आहे. ते सर्व सत्पक्षाच्या विजयासाठी सीकारलेला आपद्धर्म म्हणून नैतिक ठरविले गेले. पांडव विजयी झाल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या देशवासियांसाठी एक मोठे काम केले. विजय मिळवून दिल्याच्या बदल्यात त्याने यादवांसाठी मथुरा-गोकूळची भूमी मागून घेतली. यादव आपसात लढून मेले असे सांगितले आहे. पण सर्व मेले नाहीत. छोटी गणराज्ये कालबाहय झालेली होती. त्यांच्या आपसात मारामा-या होत. शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रबळ साम्राज्य अटळ होते.

दुसरा मुद्दा द्वारका बुडण्याचा. किना-यावरील जमीन खचल्यामुळे समुद्राची सापेक्ष पातळीवर वाढली. द्वारका पाण्याखाली गेली. तेथील यादवांचे पुनर्वसन करणे अगत्याचे होते. आपल्या मृत्यूपूर्वी कृष्णाने जे काही केले ते मोठा नरसंहार व संपत्तीचा नाश टाळून आपल्या देशबांधवांचे भले व्हावे, म्हणूनच केले. ‘‘ऐतिहासिक श्रीकृष्ण धूर्त राजकारणी आहे, कर्तृत्ववान आहे, गुणांचा नेता आहे. पराक्रमाने आपले राज्य बिनधोक करणारा आहे, शत्रूंचा नाश करणारा आहे. या कृष्णाची पूजा भारताने कधीच केली नाही.’’ इति कुरुंदकर.राष्ट्राची राजनीती व युद्धनीती कशी असली पाहिजे, याचा तो वास्तुपाठ आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version