Home महामुंबई महापालिका घडवणार ग्रँड मास्टर

महापालिका घडवणार ग्रँड मास्टर

0

बुद्धिबळाचे विशेष प्रशिक्षण यापुढे महापालिकेच्या शाळांमधून देऊन ग्रँड मास्टर घडवण्याचा संकल्प महापालिकेने केला असून प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची मदत घेणार आहे.

मुंबई- महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आता ६४ घरांची ओळख करून दिली जाणार आहे. बुद्धिबळाच्या या खेळात ज्यांना ६४ घरांचे ज्ञान आहे, तीच यामध्ये प्रावीण्य मिळवू शकते. त्यामुळे या बुद्धिबळाचे विशेष प्रशिक्षण यापुढे महापालिकेच्या शाळांमधून देऊन ग्रँड मास्टर घडवण्याचा संकल्प महापालिकेने केला असून प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची मदत घेणार आहे.

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती आणि वर्षानुवर्षे कमी होणारी पटसंख्या यावर उपाय म्हणून २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप, व्हर्च्युअल क्लासरूम, मोफत शालेय पोषण आहार यासह विविध वस्तूंचे वाटप केले जाते. महापालिका विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावतानाच शालेय अभ्यासक्रमाप्रमाणेच बौद्धिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न महापालिका शिक्षण विभागाकडून सुरू आहे. यासाठी महापालिकेच्या १७ शाळा संकुलातील निवडक विद्यार्थ्यांना बुद्धिबळ या खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून हे महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे समजते. महापालिकेच्या एका शाळेतून सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांची निवड करून वर्षभरात ३२ प्रशिक्षण या असोसिएशनचे पदाधिकारी देणार आहेत. शिवाय तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून व्याख्यानेही दिली जाणार आहेत. यासाठी सुमारे पावणेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे समजते.

महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महापालिकेच्या १७ शाळा संकुलांमधून हे बुद्धिबळ प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनने याबाबत आपला प्रस्ताव सादर केला होता, त्यानुसार हा निर्णय घेण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक वाढीतून ग्रँड मास्टर तयार करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. या माध्यमातून गणिती व सांख्यिकी क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, समस्यांचे निराकरण करण्याच्या क्षमतेत वाढ, वाचनप्रिय, एकाग्रता यातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासास पोषक स्वयंशिस्त, स्वयं आत्मविश्वास, सहनशीलता, सर्जनशीलता, चिकाटी, स्पर्धात्मकता आणि खिलाडूवृत्ती आदींचा गुणात्मक विकास होता. त्यामुळे या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version