Home महामुंबई महसूलमंत्र्यांच्या उत्तरात कोकणला ठेंगा

महसूलमंत्र्यांच्या उत्तरात कोकणला ठेंगा

0

दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या आत्महत्येच्या कारणांची कोणतीही शहानिशा न करता त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची तातडीने मदत करणार असल्याची घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केली. 

मुंबई – दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या आत्महत्येच्या कारणांची कोणतीही शहानिशा न करता त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची तातडीने मदत करणार असल्याची घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केली. मात्र, कृषिमंत्र्यांच्या पाऊण तासाच्या उत्तरात कोकणातील शेतक-यांबद्दल एक शब्दही उच्चारण्यात आलेला नाही.

विरोधी पक्षांनी २९३अन्वये या वर्षी राज्यात पडलेला कमी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर उपस्थित केलेल्या दीर्घ चर्चेवर उत्तर देताना खडसे यांनी ही घोषणा केली. यापूर्वी शेतकरी कोणकोणत्या कारणाने आत्महत्या करत होता याचे कारण स्पष्ट होत नाही तोपर्यंत आत्महत्याग्रस्त शेतक-याचे कुटुंबीय सरकारी मदतीसाठी पात्र ठरत नव्हते. मात्र या नव्या घोषणेमुळे दुष्काग्रस्त भागातील शेतक-यांच्या आत्महत्येची कोणतीही कारणमीमांसा न करता त्याला एक लाखाची सरकारी मदत थेट देण्यात येणार असल्याचे खडसे म्हणाले. मात्र ही मदत कशा प्रकारे आणि कोणत्या कागदपत्रांद्वारे देण्यात येईल या विरोधकांच्या प्रश्नावर खडसेंनी स्पष्ट उत्तर दिले नाही.

राज्यात यंदा १५ हजार ७४७ गावे अवर्षणग्रस्त बनली आहेत. खरिपासह रब्बी पिकांचा भागही प्रथमच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा लागला असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे वितरण करताना दरडोई प्रमाणाबरोबर अधिक २५ टक्के पाणी पुरवण्यात येणार आहे, तसेच मनरेगा आणि नरेगातील निष्कर्ष बदलून अधिकाअधिक भागात रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही खडसे म्हणाले.

नदी, नाल्यांचा गाळ काढून त्यांची खोली वाढवण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्यातून निघालेल्या गाळाला रॉयल्टीही आकारण्यात येणार नाही. तसेच गाळ वाहून नेण्यासाठी सरकारच खर्च करेल. याकरता १४ जिल्ह्यात पोकलेन आणि जेसीबी खरेदी करण्यात आले असल्याचे खडसे यांनी सांगितले.

कोकणातील गावेही वगळली कोणतीही नवी योजना किंवा सरकारी मदत कोकणातील शेतक-यांसाठी कृषिमंत्र्यांनी जाहीर केलेली नाही. उलट कमी पैसेवारीच्या गावामधून कोकणातील गावेही वगळण्यात आलेली आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version