Home विदेश मलेशियाच्या बेपत्ता विमानाचे गूढ वाढले

मलेशियाच्या बेपत्ता विमानाचे गूढ वाढले

0

हे विमान ज्या परिस्थितीत बेपत्ता झाले, त्यामुळे मलेशियासहित या विमानाचा शोध घेणारे इतर देशही चक्रावून गेले आहेत. 

क्वालालंपूर/ बीजिंग- व्हिएतनामजवळ समुद्रात कोसळल्याची शक्यता वर्तवली जात असलेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाचा थांगपत्ता सलग दुस-या दिवशीही लागू शकला नव्हता. हे विमान ज्या परिस्थितीत बेपत्ता झाले, त्यामुळे मलेशियासहित या विमानाचा शोध घेणारे इतर देशही चक्रावून गेले.

ज्या वेळी हे विमान बेपत्ता झाले त्या वेळी या विमानाने कोणताही आपत्कालीन संदेश पाठवला नव्हता. तसेच ते ज्या भागातून उडत होते, त्या भागातील हवामानही खराब नव्हते. असे असतानाही अचानक हे विमान रडारवरून दिसेनासे झाल्यामुळे या विमानाच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातच या विमानातील दोन प्रवासी चोरलेल्या पासपोर्टवर प्रवास करत असल्याचे आढळल्यामुळे या विमानाच्या बेपत्ता होण्यामागे काही घातपात असल्याची शक्यता वाढली आहे.

या विमानात प्रवास करणा-या दोघा जणांनी ज्या पासपोर्टवर प्रवास केला ते दोन पासपोर्ट इटालियन आणि ऑस्ट्रियन नागरिकांचे होते. या धक्कादायक माहितीनंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अमेरिकेची गुप्तहेर संघटना एफबीआयने त्यांचे पथक मलेशियामध्ये पाठवले. त्या पाठोपाठ मलेशियानेही त्यांच्या गुप्तचरांना आणि दहशतवाद विरोधी पथकांना या तपासकामासाठी पाचारण केले.

विचित्र वस्तूची माहिती

सिंगापूरच्या विमानाला समुद्रात कोणती तरी विचित्र वस्तू दिसल्यानंतर त्या वस्तूचा शोध घेण्यासाठी व्हिएतनामने त्यांची बोट त्या भागात पाठवली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

सर्वात मोठे शोधकार्य

विविध देशांची शोधपथके या विमानाचा शोध घेत होती. तब्बल ७५ हेलिकॉप्टर्स, अनेक जहाजे या कामी तैनात करण्यात आली. व्हिएतनामच्या ताफ्याशिवाय मलेशिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, चीन आणि अमेरिकेने २२ विमाने आणि ४० जहाजे या कामी पाठवली. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेले शोधकार्य रविवारीही सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या विमानाचा शोध लागू शकला नव्हता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version