Home संपादकीय तात्पर्य मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता हरपला!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता हरपला!

0

अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टी गाजवणारे व नेहमीच सर्वाना पोट धरून हसवणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजेच सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय चव्हाण. शाळेत असताना, एका नाटकात मुख्य कलाकार गैरहजर असल्यामुळे विजय चव्हाण यांना अभिनयाची संधी मिळाली होती. तेव्हापासून त्यांनी आपले जीवन रंगभूमीसाठी समर्पित केले. मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक अभिनेत्याची एक विशिष्ट विनोदी अभिनय शैली होती. पण, विजय चव्हाण यांनी आपली एक विशिष्ट अभिनय शैली चित्रपटात सादर केली. ‘मोरूची मावशी’ या नाटकाने विजय चव्हाण यांच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी अनेक अजरामर नाटकं रंगभूमीला दिली आहेत. कशात काय लफडय़ात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. ५, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टूरटूर, देखणी बायको दुस-याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदरपंत ही त्यांची लोकप्रिय नाटकं. पण, ‘मोरूची मावशी’ हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक ठरलं.

या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘मावशी’ या पात्राने प्रेक्षकांना खळखळून हसवले. इतक्या वर्षानंतर आजही हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याच नाटकाने विजय चव्हाण यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट विश्वात पदार्पण केले. रंगभूमीप्रमाणेच विजय चव्हाण यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीही गाजवली. त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमे चित्रपटसृष्टीला दिले आहेत. वहिनीची माया, घोळात घोळ, धुमाकूळ, शेम टू शेम, माहेरची साडी, बलिदान, शुभमंगल सावधान, एक होता विदूषक, चिकट नवरा, धांगडधिंगा, पछाडलेला, भरत आला परत, अगं बाई अरेच्चा, जत्रा, चष्मे बहाद्दूर, श्रीमंत दामोदर पंत, झपाटलेला हे विजय चव्हाण यांचे सर्वाधिक गाजलेले सिनेमे. रानफुलं, लाईफ मेंबर या त्यांच्या लोकप्रिय मालिका. विजय चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे चारशे चित्रपटांत अभिनय केला आहे. मराठी चित्रपट विश्वातील अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. चित्रपट विश्वात विजय चव्हाण यांना विजय‘मामा’ नावाने ओळखले जायचे. चित्रपटात विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या विजय चव्हाण यांनी विविध भूमिका साकारल्या. पण, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनही विजय चव्हाण हे सामान्य जीवन जगले. ते प्रत्येकाशी मनमोकळेपणे संवाद साधत. त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. विजय चव्हाण यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. त्यांना मोबाईल वापरणे अजिबात आवडत नव्हते. जर कुणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास, त्यांचा मुलगा वरद यांच्याशी संपर्क साधायचे. त्यांनी अखेपर्यंत पैसा व प्रसिद्धीपेक्षा अभिनयालाच सर्वाधिक महत्त्व दिले. चित्रपटसृष्टीला दिलेल्या विशेष योगदानाबद्दल विजय चव्हाण यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना २०१७ ला ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच २०१८ ला चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने विजय चव्हाण यांना गौरवण्यात आले. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे विजय चव्हाण यांचा रंगभूमीशी संपर्क तुटला. त्यांना पुन्हा रंगभूमीवर आगमन करण्याची इच्छा होती. पण, त्याआधी त्यांना आपल्या सुपुत्राचं लग्न पाहायचं होतं. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. विजय चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. पण, अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रुग्णालयात विजय चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेत, रंगभूमी व चाहत्यांना अखेरचा रामराम केला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी व मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता हरपल्याचे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. विजय चव्हाण जरी या विश्वात नसले, तरी त्यांचा अभिनय हा सदा चाहत्यांच्या मनात जिवंत राहील. विजय चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version