Home रविवार विशेष मनोरुग्णांचा डॉक्टर मित्र डॉ. भरत वाटवानी

मनोरुग्णांचा डॉक्टर मित्र डॉ. भरत वाटवानी

0

१९८९ मध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून एमडी झाल्यानंतर डॉ. भरत वाटवानी यांनी समाजाची रस्त्यावर फिरणा-या मनोरुग्णांविषयीची दृष्टी बदलून टाकली आहे. मुंबईमधील आपला व्यवसाय सांभाळत कर्जतसारख्या ग्रामीण भागात येऊन मनोरुग्णांवर उपचार करणारे केंद्र उभारावे आणि त्या केंद्रात मागील १३ वर्षात शेकडो रुग्णांना बरे करणारे आणि ते देखील रुग्णांच्या नातेवाइकांचा पत्ता नसताना. हा प्रवास थक्क करणारा असून डॉ. भरत वाटवानी यांच्या या माणुसकी देणा-या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून ३१ ऑगस्ट रोजी आशिया खंडातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सामाजिक कार्याची आवड असलेले डॉ. वाटवानी यांना थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याकडे जाऊन मनोपचार तज्ज्ञ झाल्यानंतर काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी गडचिरोलीचा प्रवास सुरू केला. जंगलातून बाबा आमटे यांना भेटायला जाण्यासाठी प्रवास करीत असताना डॉ. वाटवानी यांना एक मनोरुग्ण दिसला. लोखंडी साखळ्यांनी हातपाय बांधलेल्या त्या मनोरुग्णाची चौकशी केली आणि वाटवाणी यांची गाडी पुढे गेली. सायंकाळी काळोख पडू लागल्याने १५ किलोमीटर अंतर कापून गेल्यानंतर पुन्हा वाटवानी मागे आले. त्या रस्त्यावर पडून असलेल्या मनोरुग्णाच्या कपडय़ांना घाण वास येत होता. पण त्याचे कपडे काढून आपल्याजवळील चादरीमध्ये लपेटून त्यांनी त्या मनोरुग्णाला हेमलकसा येथे नेले. तेथे डॉ. प्रकाश आमटे यांनी दीड तासांच्या मेहनतीनंतर लोखंडी साखळ्या तोडल्या. हे सर्व बाबा आमटे पाहत होते. त्या मनोरुग्णाला घालायला कपडे देऊन रात्री एका ठिकाणी झोपायची सोय करून डॉ. वाटवानी झोपी गेले. सकाळी ट्रेन असल्याने लवकर उठून तयारी करीत असताना रात्रभर बाबा आमटे हे त्या मनोरुग्णाच्या लोखंडी साखळ्या घालून तेथे पडून होते. त्यावेळी बाबा आमटे यांना बघून डॉ. वाटवानीही स्तब्ध झाले. त्यावेळी बाबा आमटे यांनी भरत तू या क्षेत्रात काम करायला हवे असे सुचविले. नंतर काही दिवस तेथे थांबून बाबा आमटे यांचा शब्द प्रमाण मनात त्या साखळी बांधून ठेवलेल्या मनोरुग्णाला पुन्हा उभे केले. त्यावेळी तो विज्ञान शाखेचा पदवीधर असल्याचे नंतर कळले होते. ही सर्व घटना बाबा आमटे यांच्यासमोरची असल्याने त्यांचे आशीर्वाद घेऊन नंतर मुंबई गाठली आणि मनोपचार तज्ज्ञ म्हणून पैशाच्या मागे न जाता मनोरुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आणि झपाटून कामाला लागण्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॉ. भरत वाटवानी.

बाबा आमटे यांनी मनोरुग हा संसर्गजन्य रोग नाही. त्यांना आपलेसे करा असा सल्ला दिल्यानंतर १९८९ मध्ये कामाला सुरुवात करणारे डॉ. वाटवानी दाम्पत्य थांबलेच नाही. डॉ. वाटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता यांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. एके दिवशी मुंबईमध्ये एका हॉटेलात चहा प्यायला बसले होते. डॉ. भरत आणि स्मिता या वाटवानी दाम्पत्याला एक तरुण गटारातील पाणी पीत होता आणि रस्त्यांवरील लोकांवर नारळ फेकून मारत होता. हे पाहून आपला पेशंट समजून डॉ. वाटवानी दाम्पत्याने त्याला सोबत घेतले. त्याच्यावर आठ दिवस उपचार केल्यानंतर तो आंध्र प्रदेशातील असल्याचे समजले. त्यावेळी त्याच्या पालकांना बोलावून घेतले. त्यानंतर तो पॅथॉलॉजी शिक्षण पूर्ण करणारा तरुण असल्याचे तसेच तो तीन महिन्यांपूर्वी हरवला असल्याचे समजले. आपल्या त्या पहिला पेशंटवर, मनोरुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर या दाम्पत्याने आपल्या मुंबईमधील पाच बेडच्या रुग्णालयात जागा कमी पडते. म्हणून दहिसर येथे एक बंगला भाडय़ाने घेतला. तेथे उपचार सुरू असताना परिसरातील सुशिक्षित लोकांना मनोरुग्णांचा त्रास होऊ लागला. त्यांनी आमची मुले आणि बायका मनोरुग्ण होतील, अशी भीती व्यक्त केली. शेवटी डॉ. वाटवानी दाम्पत्याने दहिसरमधील दवाखाना बंद करून जागेचा शोध सुरू केला. त्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार केली. मात्र, मनोरुग्णांवर उपचार करून ते समाजाची सेवा करीत असल्याचे न्यायालयाने त्या उचभ्रू लोकांना फटकारले होते. मात्र, १३ मनोरुग्णांवर उपचार घेत असताना दहिसरमधील लोकांनी माणुसकीला काळिमा फासला. पण वाटवानी दाम्पत्य मागे सरले नाही.

पण स्वत:ला शहरी समजणा-यांनी त्यांना अक्षरश: हाकलून लावले. ही खंत मग २००५ मध्ये कर्जतच्या वेणगाव भागात प्रशस्त जागेत श्रद्धा फाऊंडेशन स्थापन झाले आणि त्यातून रि-हॅबीटेशन सेन्टर २००५ मध्ये आकाराला आले. पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सुरू झालेल्या श्रद्धा फाऊंडेशनने मग मागे वळून पाहिले नाही. दहिसरसारखा त्रास कर्जतमध्ये डॉ. वाटवानी यांना झाला नाही. कारण ग्रामीण भागातील लोकांना मनोरुग आजाराची थोडीशी माहिती होती. सुरुवातीला तर श्रद्धा फाऊंडेशनची रुग्णवाहिका मनोरुग शोधण्यासाठी कर्जत तालुक्याच्या रस्त्यांवर फिरू लागली. रस्त्यावर, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मनोरुग्ण दिसला की त्याला हाताला धरून, त्याच्या मनातील भीती दूर करून, त्याच्या आजारावर उपचार करायचे आहेत, असे सांगून त्याची तयारी झाल्यानंतर आणले जाऊ लागले. पहिल्या वर्षी जेमतेम ३३ मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात नेण्याचे काम श्रद्धा फाऊंडेशनमध्ये झाले.

मग ट्रस्टमध्ये डॉ. वाटवानी आणि त्यांना मदत करणारे सहकारी यांच्याकडून मनोरुग्णांवर उपचार सुरू झाले. नंतर श्रद्धा फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेला कर्जतबाहेर मनोरुग्ण शोधण्यासाठी जावे लागू लागले. आज परिसरातील दोन-तीन जिल्ह्यातील रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मनोरुग्ण शोधून सापडत नाहीत. असे कार्य  डॉ. वाटवानी यांनी कर्जतच्या श्रद्धा फाऊंडेशनमध्ये मागील १३ वर्षात केले आहे. या काळात देशातील २६ राज्यांतील आणि नेपाळ देशातील तब्बल ५४६३ मनोरुग्णांना श्रद्धा फाऊंडेशनमध्ये बरे करता आले आहे आणि पुन्हा मुख्य प्रवाहात जगण्याची उमेद निर्माण करण्यात डॉ. वाटवानी यशस्वी ठरले आहेत. त्याचवेळी नेपाळ या परराष्ट्रातील काही मनोरुग्ण देखील डॉ. वाटवानी यांच्यामुळे बरे झाले आहेत.

मनोरुग्णाला पुन्हा समाजात माणुसकी मिळवून देणारे डॉ. भरत वाटवानी यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आशिया खंडातील नोबेल समजल्या जाणा-या फिलिपाईन्समध्ये दिल्या जाणा-या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठेचा हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. वाटवानी  यांच्यामुळे कर्जतकरांची मान देखील अभिमानाने उंचावणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version