Home महाराष्ट्र मध्य प्रदेशातून ७०० टन चारा पुण्यात

मध्य प्रदेशातून ७०० टन चारा पुण्यात

0
संग्रहित छायाचित्र

दुष्काळी भागातील लोकांसाठी श्रमदानाद्वारे ‘चार दिवस दुष्काळाचे’ या योजनेंतर्गत ५० तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) माध्यमातून आखण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केली.

पुणे- राज्यातील १६ जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. या दुष्काळी भागातील लोकांसाठी श्रमदानाद्वारे ‘चार दिवस दुष्काळाचे’ या योजनेंतर्गत ५० तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) माध्यमातून आखण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केली.

मध्य प्रदेशवरून खास दुष्काळी भागातील जनावरांसाठी चारा घेऊन येणा-या विशेष रेल्वेच्या स्वागत समारंभा वेळी ते बोलत होते. या वेळी क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे मेट्रोचे शांतीलाल कटारिया, कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, कामगार नेते बाबा आढाव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बीजेएस ही स्वयंसेवी संस्था असून, गेली २५ वर्षे आपत्तीग्रस्त लोकांसाठी काम करत आहे. पुणे, बीड, उस्मानाबाद, सोलापूर यांसह एकूण १६ जिल्ह्यांतील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासाठीच संघटनेतर्फे बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर या तीन तालुक्यांतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी येथील ५० पुनरुज्जीवन होणारे तलाव जाणकारांच्या मदतीने निश्चित करण्यात आले आहेत. अक्षय्य तृतीयेपासून या तलावातील आधुनिक यंत्रांचा वापर करून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. हे काम श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून, या कामामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही मुथ्था यांनी या वेळी केले.

राज्यात दुष्काळाच्या झळा खूपच वाढताना दिसत आहेत. फक्त जनावरेच नाहीतर त्या-त्या भागातील नागरिकांना, मुलांना अन्न-पाण्याची योग्य ती सोय उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही काम करू. तसेच दुष्काळाची तीव्रता लक्षात घेत प्रत्येकाचे आपापल्या परीने दुष्काळी भागातील लोकांना मदत केली पाहिजे, असे मगर म्हणाले.

भारतीय जैन संघटनेच्या मराठवाडा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील ३० छावण्यांमध्ये १० हजार जनावरांचे व्यवस्थापन केले जात आहे. यासाठी बीजेएसला अंदाजे एक कोटी किलो चारा आवश्यक आहे. यासाठीच मध्य प्रदेश येथून ७०० टन चारा मागवण्यात आला आहे. ही रेल्वे गुरुवारी पुण्यात आली. यापैकी ४०० टन चारा बीड जिल्ह्यासाठी, तर ३०० टन चारा पुणे, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांतील छावण्यासाठी दिला जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version