Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती ‘मदर इंडिया फेम’ कांकरेज गोवंश

‘मदर इंडिया फेम’ कांकरेज गोवंश

0
संग्रहीत छायाचित्र

भारतीय गोवंशातील बघता क्षणीच प्रेमात पडावे, असा लोभस गोवंश म्हणजे ‘कांकरेज गोवंश’ होय. या गोवंशाने त्याच्या अंगच्या गुणवत्तेने परदेशीयांनासुद्धा संशोधन करण्यास भाग पाडले आहे. आर्यानी ज्या वेळी आक्रमण केले त्या वेळी त्यांच्याबरोबर असलेला गोवंश म्हणून या गोवंशाची नोंद आहे. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट अन्नावर पोषण होऊनदेखील उत्तम गुणवत्ता सिद्ध करणं हे या गोवंशाचं प्रमुख वैश्ष्टय आहे.

आपल्या भारतामध्ये कच्छच्या रणाच्या दक्षिण भागात म्हणजेच पूर्वेकडील देशापासून ते पश्चिमेकडील राधानूपूर जिल्ह्यापर्यंत ‘कांकरेज गोवंश’ उत्तम पद्धतीने सांभाळला जातो. या गोवंशातील उत्तम जनावरे दरवर्षी माघ महिन्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असतात.

बानस आणि सरस्वती या दोन नद्यांच्या खो-यातील भागामध्येसुद्धा हा गोवंश चांगल्या पद्धतीने जोपासला जातो. हा प्रदेश या गोवंशाचं मूळ उगमस्थान आहे, असं जुने जाणकार सांगतात. त्याचप्रमाणे काठेवाड, वडोदरा (बडोदा), सुरत या भागातही हा गोवंश मोठय़ा प्रमाणावर व उत्तमरीत्या सांभाळला जात आहे. या गोवंशाला स्थानिक भाषेत वडीहार, वगाड, वगाडिया अशा उपनावांनीही संबोधलं जातं. 

भरदार छाती, सशक्त भक्कम व मोठी शरीरयष्टी, जाडसर व सलसर कातडी, अत्यंत देखण्या चंद्रकोरीप्रमाणे रेखीव व डौलदार शिंगं, रंग पांढरा, भुरकट ते जांभळट कोसापर्यंतच्या सर्व छटांमध्ये असतो. एकूण शरीराच्या मानानं चेहरा थोडा लहान असतो, पण जबडा रुंद असतो. नाकपुडी संपूर्णपणे काळी व किंचित उचलल्यासारखी दिसते. कान लांबट अरुंद व टोकदार असतात. शिंगाच्या मुळाशी जाड केसांचं घट्ट आवरण असतं, शिंगं बहुतांशी करडय़ा रंगाची असतात. क्वचित लालसर गुलाबी छटेची आढळतात.

जनावर थोराड व लांबरुंद असतं. त्यामुळे बैलांमध्ये ‘पावलावर पाऊल’ कधीच पडत नाही, मागचे चौक रुंद, सरळ तसेच कमी उताराचे असतात. शेपूट उंचीला मध्यम असते पण शेपूटगोंडा काळा, मोठा व झुपकेदार असतो. वशिंड एकूण शरीराच्या मानाने फार मोठं नसतं. गायींमधे कास मोठी व घोळदार असते, चारही सड (आचळ) लांबट, मोठे असून समान अंतरावर असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा अत्यंत स्पष्ट, नागमोडी व ठळक असतात.

या गोवंशाच्या कालवडीचं प्रथम माजावर येण्याचं वय साधारणत: ३० ते ३६ महिन्यांच्या दरम्यान असते. प्रथम वेतामध्ये या गायी दिवसाकाठी सर्वसाधारण मेहनतीवर ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. सलग २७० ते ३०० दिवस विनातक्रार जेवढं आहे, तेवढं दूध देणं, ही या गोवंशाची खासियत आहे. सर्वसाधारणपणे दुधातील स्निग्धतेचं प्रमाण ३.५ ते ४ च्या दरम्यान असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २२ महिन्यांदरम्यान असतं तर संपूर्णत: भाकडकाळ ४ ते ६ महिन्यांचा असतो. जन्मत: वासरांच्या अंगावर विविध रंगाच्या छटा असतात, पण वासरू जसजसं ६ ते ७ महिन्यांपेक्षा मोठं होऊ लागतं, तसा त्याला मूळ गोवंशाचा रंग येऊ लागतो.

या गोवंशाचे बैल वयाची चार र्वष पूर्ण झाल्यावर शेतीकामास योग्य होतात. बैल लांब पौंडी असल्यामुळे अंतर कमीत कमी श्रमात व झपाटय़ाने कापतात. बैल ओढकामात व शेतीकामात अंगची विलक्षण ताकद सिद्ध करून दाखवतात. या बैलांमध्ये मारकेपणा क्वचित आढळतो. ही जनावरे अत्यंत शांत व सुस्वभावी असतात. एका मालकाकडे उत्तम मेहनतीवर ही बैलजोडी २० ते २२ र्वष सहज काम करते तसंच गायीच्या ८ ते १० वेणी सहज होतात. या गोवंशाच्या उत्तम बैलजोडीची किंमत ७५ ते ८० हजारांदरम्यान असते, तर उत्तम गायीची किंमत २५ ते ३५ हजारांपर्यंत असते.

आपल्या सरकारने या गोवंशाचं महत्त्व जाणून पोस्टाचं ३ रुपयांचं तिकीटही काढलं आहे. ब्राझील देशाने हा गोवंश स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याकडे नेऊन अभ्यासपूर्ण संशोधन करून उत्तम गुणवत्तेचा परिपूर्ण असा ‘गुजेरात’ नामकरण केलेला गोवंश निर्माण केला. त्याचप्रमाणे अमेरिकेतही या गोवंशावर विशेष संशोधन झालं आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version