Home टॉप स्टोरी मतदार नोंदणी सोपी होणार

मतदार नोंदणी सोपी होणार

0

केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे यंदाच्या वर्षात मतदार नोंदणी अधिक सोपी करण्याचे ठरवले असून मतदारांसाठी शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा, निवडणूक आयुक्त नसीम झैदी आणि उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा.

नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे यंदाच्या वर्षात मतदार नोंदणी अधिक सोपी करण्याचे ठरवले आहे. यानिमित्त मतदारांसाठी शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन येथे केले होते. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी मतदार यादीत ‘सोपी नोंदणी, सोपी सुधारणा’ हा उपक्रम वर्षभरात राबवणार असल्याचे जाहीर केले. ५ जानेवारी रोजी भारतात ८४ कोटी मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

मतदारांच्या शिक्षणासाठी आणि जागरूकतेसाठी निवडणूक अधिकारी घेत असलेल्या परिश्रमाबाबत पंतप्रधानांनी सर्वाचे अभिनंदन केले. त्यामुळे मतदारांनी या योजनेचा अधिकाधिक फायदा घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

या वेळी निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत सर्वच पात्र नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रयत्न केले जातील. देशातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी. लोकशाही प्रक्रियेला भाग म्हणून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

मतदार यादीतील गोंधळ थांबवण्यासाठी ‘आधार’ची मदत घेणार         

मतदार यादीतील गोंधळ थांबवण्यासाठी आणि कमीतकमी तक्रारी येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘आधार’च्या डेटाबेसची मदत घेण्याचे ठरवले आहे. ‘आधार’ आणि ‘फोटो असलेले मतदार ओळखपत्र’ एकत्रित केल्यास मतदारयादीतील तक्रारी पूर्णपणे थांबतील, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी केली. २०१६ पासून या योजनेला प्रारंभ केला जाईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने ‘आधार’ कार्ड बनवणा-या युआयडीएआय संस्थेशी चर्चा सुरू केली आहे. हे काम २०१६ मध्ये निश्चितपणे पूर्ण होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘आधार’चा डेटा वापरण्याचे ठरवले आहे. देशातील प्रत्येक पात्र मतदाराला मतदार ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीतील सर्व चुका निश्चितपणे थांबतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘आधार’ व ‘मतदार’ यादीचा डेटा एकत्रित झाल्यास सर्व नावे व पत्ते अचूक असतील. तसेच प्रत्येक मतदाराची बायोमेट्रिक माहिती असेल. त्यामुळे राजकीय पक्षांकडून होणा-या तक्रारी पूर्णपणे थांबतील. येत्या ८ ते ९ महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात ८४ कोटी मतदार असून त्यापैकी ५५ कोटी नियमितपणे मतदान करतात. विविध कारणांनी ३० कोटी मतदार मतदानच करत नाहीत. त्यामुळे मतदान करणे ही प्रत्येक मतदाराची नैतिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version