Home महामुंबई ठाणे भिवपुरी तलावाच्या सुशोभीकरणात घोळ

भिवपुरी तलावाच्या सुशोभीकरणात घोळ

0

ब्रिटिशांच्या काळात कोकण विभागातून पुण्याच्या घाटमाथ्यावर जाणा-या वाटसरूंसाठीनिर्माण केलेला तलाव वादाच्या भोव-यात सापडला आहे.

नेरळ- ब्रिटिशांच्या काळात कोकण विभागातून पुण्याच्या घाटमाथ्यावर जाणा-या वाटसरूंसाठीनिर्माण केलेला तलाव वादाच्या भोव-यात सापडला आहे. राज्याच्या पर्यटन विकास कार्यक्रमात या तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र या तलावाच्या सुशोभीकरणाची कामे अर्धवट झाली असून ती निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायतीने केला आहे.

ब्रिटिश काळात कोकणातून अनेक रस्ते घाटमाथ्यावर जात. यापैकीच एक रस्ता कर्जतच्या भिवपुरी येथून असल्याचे बोलले जाते. या रस्त्याच्या पायथ्याशी भिवपुरी गावाच्या हद्दीत अहिल्याबाई होळकर यांच्या आर्थिक मदतीवर तलावाची निर्मिती झाली होती. तीन एकर जागेत हा पाण्याचा जलाशय असून आजूबाजूलाही मोठी जागा असलेल्या या तलावात मे महिन्यातही भरपूर पाणीसाठा असतो.

चि-याची तटबंदी असलेल्या या तलावाजवळ पाण्याची कुंडेही असून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी रुपयांचा निधी २०१४ मध्ये मंजूर केला होता. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेल्या या निधीतून या तलावाला संरक्षण भिंत बांधणे, दोन मंदिरे बांधणे, अ‍ॅम्पी थिएटर, चालण्यासाठी रस्ता, प्रवेशद्वार, बगीचा यांसह या तलावाचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे फलक अशी कामे प्रस्तावित होती.

कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ही सर्व कामे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत केली जात आहेत. दरम्यान, भिवपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश पवार यांनी ठेकेदार कंपनीकडे या कामांची माहिती मागितली असता आम्ही माहिती देण्यास बांधील नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. यानंतर भिवपुरी ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता बोडके यांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामाची लेखी माहिती माहिती मागितली.

गेल्या वर्षभरात येथे करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली असता हे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप आहे. येथील रस्त्याचे केलेले काँक्रिटीकरणही उखडले असून बाकडे मोडकळीस आले आहेत. शिवाय जे अ‍ॅम्पी थिएटरच्या भिंतीला तडे गेल्याची तक्रार सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्य स्वप्नील भोसले, हेमा वाघमारे, सारिका नवल यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीने माहिती मागूनही ती मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आमचा विकास कामांना विरोध नाही, मात्र ही कामे टेंडरप्रमाणे व्हावीत, असे सरपंच अनिता बोडके यांनी सांगितले. तसेच ठेकेदार येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी करत असलेली अरेरावी यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असून सध्या ते माझ्याकडे आहे; पण आत्तापर्यंत झालेली कामे मात्र पूर्वीच्या शाखा अभियंत्यांच्या कारकिर्दीत झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या तक्रारींची आम्ही दखल घेत असून सर्व प्रस्तावित कामे टेंडरप्रमाणेच करण्याचा प्रयत्न राहील.
– व्ही. टी. सूर्यवंशी, शाखा अभियंता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version