Home महामुंबई ठाणे प्रेमविवाह करणा-या आदिवासी तरुणीचे मुंडण

प्रेमविवाह करणा-या आदिवासी तरुणीचे मुंडण

0

आदिवासी मुलीशी लग्न केल्यामुळे संतापलेले मुलाचे आई-वडिल आणि भाऊ या तिघांनी तिचे मुंडण केल्याचा घृणास्पद प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. 

भिवंडी- आदिवासी मुलीशी लग्न केल्यामुळे संतापलेले मुलाचे आई-वडिल आणि भाऊ या तिघांनी तिचे मुंडण केल्याचा घृणास्पद प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात तरुणाच्या आई-वडिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील पाली- दाभाड या गावातील कातकरी समाजातील दर्शना भास्कर वाघे या १८ वर्षीय युवतीचे येवई येथील गोदामात काम करत असताना योगेश मधुकर पाटील (२५) या युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. घरच्या विरोधाला न जुमानता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेवून २८ मे २०१३ रोजी लग्न केले. त्यानंतर पाली येथील दर्शनाच्या घरी दोघेजण एकत्र राहू लागले.

यानंतर सप्टेंबर महिन्यात योगेशचे आई-वडील पाली येथे गेले आणि गोड बोलून योगेशला आपल्या सोबत मैंदे येथील घरी घेवून आले.

पतीपासून वेगळे राहावयास लागल्याने चिंतेत असलेल्या दर्शनाने मैंदे या गावी येवून योगेशची भेट घेतली. त्यानंतर ते दोघे पुन्हा पाली येथे मोटार सायकलवरून जाण्यास निघाले असता, शनिवारी रात्री योगेशच्या कुटुंबीयांनी या दोघांना रस्त्यात पकडून मैंदे येथील घरी घेवून आले. घराबाहेर असलेल्या पायरीवरील लाकडाला त्या दोघांना बांधून योगेशचे वडील मधुकर पाटील, आई मालती मधुकर पाटील व भाऊ रोहिदास पाटील या तिघांनी दर्शना हि आदिवासी समाजातील कातकरी या जातीतील असल्याने तीला जातीवरून शिवीगाळ करून ब्लेड, कैची आणि कोयत्याच्या सहाय्याने दर्शनाच्या डोक्यावरील केस कापून तिचे मुंडण केले. सकाळी नऊवाजेपर्यंत दोघांना बांधून मारहाण करण्याचा हा घृणास्पद प्रकार सुरु होता. यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांना या विद्रूप मुलीस पाहण्यास बोलावले. यानंतर तिला येथून हाकलून लावले.

मात्र दर्शनाने घरी न जाता येथील श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांना भेटून आपली कैफ़ियत सांगितली. त्यानंतर त्यांनी तिला पडघा पोलिस ठाण्यात घेवून आले असता दर्शनाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मधुकर पाटील, मालती पाटील आणि रोहीदास पाटील या तिघांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version