Home ताज्या घडामोडी ‘भारत माता की जय’ म्हटल्याने फारुख अब्दुलांना धक्काबुक्की

‘भारत माता की जय’ म्हटल्याने फारुख अब्दुलांना धक्काबुक्की

0

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना धक्काबुक्की करण्यात आली.

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. अब्दुल्ला यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’चा नारा दिला होता. त्यानंतर, काश्मीरमध्ये त्यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला. बुधवारी बकरी ईदची नमाज पडण्यासाठी फारुख अब्दुल्ला गेले होते, त्यावेळी त्यांना विरोध करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली असून त्यांच्याकडे चप्पल फेकल्याचेही सांगण्यात येत आहे.

ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या निमित्ताने येथील हजरतबल मस्जीदमध्ये फारुक अब्दुल्ला नमाज पठण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेकडो स्थानिक नागरिक या मशिदीत नमाज पडण्यासाठी आले होते. येथील इमामांच्या नमाज पठणापूर्वीच अब्दुलांच्या नावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यावेळी ते काही वेळ गप्प राहिले, पण लोकांचा विरोध वाढतच गेल्याने त्यांनी मशिदीतून काढता पाय घेतला. मात्र, जर वेडसर लोकांना वाटत असेल की, त्यांच्या अशा वागण्यामुळे मी घाबरेल. पण, मला ‘भारत माता की जय’ म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

तसेच मी घाबरलो नाही, आंदोलकांच्या या वागणुकीचा माझ्यावर काहीही परिमाण होणार नाही. भारत देश पुढे जात असून काश्मीरलाही आपल्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांनी नमाजावेळी असे करणे चुकीचे आहे. यासाठी त्यांनी दुसरी वेळ निवडायला हवी होती, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तानचे झेंडे, दहशतवाद्यांकडून पोलीस, भाजप पदाधिका-याची हत्या; पोलिसांवर दगडफेक

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. अनंतनाग येथेही आंदोलकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनावर तुफान दगडफेक केली. कुलगाम येथे दहशतवाद्यांनी एका पोलिसाची हत्या केली आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटनाही बुधवारी उघडकीस आली.

देशभरात बकरी ईद उत्साहात साजरा केली जात असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात आली. काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडे फडकवले. जमावामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. हे युवक सुरक्षा दलावर दगडफेक करत होते. दरम्यान, अनंतनाग येथेही आंदोलकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनावर तुफान दगडफेक केली. अनंतनाग येथे अत्यंत तणावाचे वातावरण आहे. कुलगाम येथेही दहशतवाद्यांनी एका पोलिसाला ठार केले आहे.

श्रीनगर येथे बुधवारी सकाळी अनेक ठिकाणी बकरी ईदसाठी नमाज पठण केले गेले. त्याचवेळी काही आंदोलक येथे जमा झाले आणि त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या सुरक्षा दलावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यावेळी काही हुल्लडबाज युवकांनी आपल्या हातात आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे घेतले होते. ते सुरक्षा दलाला दाखवत त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कुलगाम येथील झाजरीपुरा येथे ईदगाहच्या बाहेर दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळीबार केला असून यात त्या पोलीस कर्मचा-याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.

दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात भाजप पदाधिका-याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली. शाबीर अहमद भट असे या पदाधिका-याचे नाव आहे. पुलवामामधील शाबीर अहमद भट यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. भाजपाच्या युवा मोर्चाचे ते पदाधिकारी होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version