Home Uncategorized भारताचा सुधारित विकास दर आता ७.५ टक्के?

भारताचा सुधारित विकास दर आता ७.५ टक्के?

0

भारताच्या विकासदराबाबत अंदाजात सुधारणा करून विकास दर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क्यांवरून ७.५ टक्के केला आहे, असे मॉर्गनस्टॅनले या वित्तसंस्थेने म्हटले आहे.

नवी दिल्ली – भारताच्या विकासदराबाबत अंदाजात सुधारणा करून विकास दर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क्यांवरून ७.५ टक्के केला आहे, असे मॉर्गनस्टॅनले या वित्तसंस्थेने म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेची संथ गती बाह्य घटकांमुळे असल्याचे नमूद केले आहे.

देशांतर्गत आर्थिक व इतर घटकांत सातत्याने प्रगती होत असली तरीही प्रगतीचा वेग अंदाजापेक्षा कमी असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. संशोधन टिप्पणीत मॉर्गनस्टॅनलेने म्हटले आहे की, २०१६साठी विकासदराचा अंदाज ७.९ टक्क्यांवरून आम्ही ७.५ टक्क्यांवर आणला असून २०१७ साठी तो ८ टक्क्यांवरून ७.७ वर आणला आहे. विकासदराचा अंदाज उतरवला असला तरीही जागतिक ब्रोकरेज कंपनीने देशांतर्गत घटकांमुळे संथ गतीने प्रगती होत असल्याचे म्हटले आहे. नागरी भागातील उपभोग आणि सार्वजनिक भांडवली खर्चातील वाढ यामुळे विकासदरात सुधारणा होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. तसेच परकीय गुंतवणुकीच्या ओघामुळे भांडवली खर्चाच्या पुनरुज्जीवनाला समर्थन मिळेल, असेही टिप्पणीत म्हटले आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे देशांतर्गत प्रमुख घटक स्थिर राहणार असल्याने चालू खात्यातील तूट आणि महागाई माफक असेल, असेही म्हटले आहे.

भारताची आर्थिक आघाडीवरील अपेक्षेपेक्षा कमी गतीने होणारी प्रगती ही जागतिक स्तरावर मागणी घटल्याने आहे. दरम्यान, मालाची निर्यात गेल्या १४ महिन्यात घसरत असून कमोडिटी आणि नॉन कमोडिटी निर्यातही कमी होत आहे. सेवा क्षेत्रातील निर्यातीनेही तोच मार्ग स्वीकारला असून ही वाढ २०१४ मध्ये ५.१ टक्क्यांवरून ०.४ टक्क्यांवर आली आहे. खासगी क्षेत्रातील भांडवली खर्चात सुधारणा जास्तच संथ आहे आणि प्रकल्पांतील सुधारणा फारच मंद आहे, असे टिप्पणीत म्हटले आहे.

 फेब्रुवारीत डाळी, भाज्या, अंडी महागली

घाऊक महागाई निर्देशांक फेब्रुवारी महिन्यातही शून्याच्या खाली असून उणे ०.९१ वर स्थिरावला आहे. डाळी आणि भाजीपाल्याचे दर जानेवारीत स्वस्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे. फेब्रुवारीत मात्र अनेक खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाली आहे. जानेवारीत महागाई निर्देशांक ०.९०च्या खाली होता. तेव्हा खाद्यपदार्थाचे दर उतरले होते. डाळी, भाज्या आणि गव्हाच्या दरात खासकरून कपात झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीत तांदूळ, भाजीपाला, गहू, अंडी, मांस आणि मासळीच्या घाऊक किमतीत वाढ झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version