Home महामुंबई भाऊबीज घेऊन डबेवाले मराठवाडयात जाणार

भाऊबीज घेऊन डबेवाले मराठवाडयात जाणार

0

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे संदेश पसरवत दिवाळीचा आनंद साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, फराळांची रेलचेल ही आलीच.

मुंबई- दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे संदेश पसरवत दिवाळीचा आनंद साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, फराळांची रेलचेल ही आलीच. पण राज्यावर ओढावलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक टंचाईच्या परिस्थितीत दोन वेळचे अन्न बनवण्यासाठी झगडावे लागत असताना फराळ बनवणे तर दूरची गोष्ट झाली आहे.

हे दु:ख लक्षात घेत मुंबईच्या डबेवाल्यांनी बळीराजाच्या आयुष्यात सुखाचे क्षण पसरवण्याचा निश्चय केला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी डबेवाले मराठवाडयात जाणार आहेत. शेतकरी कुटुंबीयांच्या घरी जात आपल्या बहिणींना दिवाळीचा फराळ आणि साडया देत भाऊबिजेची भेट दिली जाणार असल्याचे डबेवाले सुभाष तळेकर यांनी सांगितले.

डबेवाले औरंगाबादेतील करमळ या गावात जाणार आहेत. मुंबईचा डबेवाला कामगार वर्ग असून शेतकरीही कष्टाळू कामगार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना शेतक-यांच्या परिस्थितीची पुरेपूर जाण असल्याचे तळेकर यांनी सांगितले. खारीचा वाटा का होईना, पण आपापल्या परिने सर्व डबेवाले या वर्षीची दिवाळी शेतकरी बांधवांसोबत साजरी करणार असल्याचे ते पुढे म्हणाले. या मदतकार्यात फराळाचे ५०० पॅकेट आणि ५०० साडय़ांचे वाटप करण्यात येईल. डबेवाला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, विठ्ठल सावंत, दशरथ केदारी आदी अनेक डबेवाले जाणार आहेत.

दिवाळीनिमित्त डबेवाले सुट्टीवर

सोमवार ९ नोव्हेंबरपासून ते १४ नोव्हेंबर या कालावधीत डबेवाले सुट्टीवर जात आहेत. त्यामुळे या सहा दिवसांच्या कालवधीत डबेवाल्यांची सेवा बंद असेल. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतीपदा आणि भाऊबीज दरम्यान शाळा, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये बंद असतात. त्यामुळे या दरम्यान डबेवाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुभाष तळेकर यांनी सांगितले. सोमवार १६ नोव्हेंबरपासून डबेवाले सेवेवर रुजू होणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version