Home महामुंबई भडवळ-दामत पाणी योजनेचा वाद मिटला

भडवळ-दामत पाणी योजनेचा वाद मिटला

0

भडवळ-दामत नळपाणीपुरवठा योजनेचे काम कुणी करावे, या मुद्दयावरून जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पाणी स्वच्छता समित्यांमध्ये वाद निर्माण झाला होता

नेरळ – भडवळ-दामत नळपाणीपुरवठा योजनेचे काम कुणी करावे, या मुद्दयावरून जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पाणी स्वच्छता समित्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र आता हा वाद मिटला असून दोन वर्षापूर्वी बंद पडलेल्या जल योजनेचे काम पुन्हा सुरू होणार आहे.  तालुक्यातील दामत-भडवळ आणि अन्य आदिवासी वाडयांसाठी २ कोटी ३३ लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना ‘भारत निर्मल’ कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामपंचायतीत वेगळ्या पक्षाची सत्ता होती. त्यांच्या कारकीर्दीत हे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले होते. त्या बदल्यात एकूण खर्चापैकी ५७ लाखांचे बिल पाणी स्वच्छता समितीकडून कंत्राटदार कंपनीला अदा करण्यात आले होते. दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अन्य पक्षाची सत्ता आली.

त्यावेळी सत्ताधारी आघाडीकडून नळपाणी योजनेचे काम पाहण्यासाठी नवीन पाणीस्वच्छता समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे जुन्या कमिटीने न्यायालयात धाव घेतली. याच काळात ग्रामपंचायतीकडे कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या अंदाजपत्रकानुसार ४९ लाखांचे बिल जिल्हा परिषदेने मंजूर करून त्याचा धनादेश दामत-भडवळ ग्रामपंचायतीकडे पाठवला. परंतु तो धनादेश कोणत्या कमिटीला द्यायचा, याबाबत न्यायालयात वाद गेल्यामुळे याबाबतचा निर्णय रखडला. त्यामुळे ही रक्कम ग्रामपंचायतीकडे पडून होती. शेवटी नळपाणीपुरवठा योजनेचे सुरू व्हावे यासाठी राजकीय पक्ष, स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्याचाही फायदा झाला नाही. काम पूर्ण झाले नसल्यामुळे या भागात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती.

शेवटी ग्रामस्थांनी समित्यांवरील दबाव वाढवल्यामुळे दोन्ही समित्यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरवले. दोन्ही कमिटयांची मिळून एक कमिटी तयार करून त्यातून पाणी योजनेचे काम करण्याचा निर्णय सामोपचाराने घेण्यात आला. त्यानुसार नवीन कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुनील पाटील यांची निवड झाली, तर जुन्या कमिटीचे सचिव माजी सरपंच सुभाष मिणमिणे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. जुन्या-नव्या दोन्ही कमिटयांनी न्यायालयात समोपचाराने निर्णय घेतल्यामुळे कर्जत पंचायत समितीत धनादेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. उर्वरित कामालाही लवकरच सुरुवात केली जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version