Home संपादकीय विशेष लेख बोलण्यात नम्रता, वागण्यात सभ्यता हवी

बोलण्यात नम्रता, वागण्यात सभ्यता हवी

0

गुजरातमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीच दर्जाचे गृहस्थ आहेत, अशी टीका केली. या टीकेने गुजरातमधीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील विचारी माणूस हादरून गेला.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जर मोठय़ा प्रमाणात पराभव झाला तर त्याला सर्वात मोठे कारण मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य असेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि ते गुजरातचे आहेत, त्यामुळे त्यांना नको त्या शब्दात कमी लेखणे हा गुजराती माणसाला आपला अपमान वाटला आणि त्यातून गुजरातमधील मते मोठय़ा संख्येने भाजपकडे वळली तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ब-याच वर्षापूर्वी आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री टी. अंजय्या यांचा तेथील विमानतळावर संजय गांधी यांनी अपमान केला आणि तो जिव्हारी लागल्याने आंध्र प्रदेशमधील जनतेने राज्याची सत्ता काँग्रेसच्या हातून काढून घेऊन तेलुगू देसम या पक्षाकडे सोपविली होती.

बोलण्यात नम्रता आणि वागण्यात सभ्यता हे सुसंस्कृतपणाचे पहिले व्यवच्छेदक लक्षण मानले जाते, पण अनेक नेत्यांना त्याचा विसर पडतो. सभासंमेलनात बोलताना समोर ब-यापैकी श्रोते आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला बरा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहिल्यावर अनेक नेत्यांच्या जिव्हालालित्याला बहर येतो आणि त्यातून नको ती वक्तव्ये केली जातात. १९८० साली ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सातारा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अंतुले यांनी अचानक यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका सुरू केली आणि यशवंतराव हे महाराष्ट्रावरचा कलंक आहेत असे वक्तव्य केली. त्यांच्या या उद्गारांनी उपस्थित कार्यकर्ते तर हादरून गेलेच, पण त्यावेळेच्या प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाणही स्तंभित झाल्या. अखेर न राहवून त्यांनी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत याचा विसर पडू देऊ नका, अशा शब्दात अंतुले यांना खडसावले तेव्हा अंतुले ओशाळले आणि त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल त्या मेळाव्यातच माफी मागितली.

खेळीमेळीच्या वातावरणात नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यात गैर काही नाही, अशा टीका विलासांची जुगलबंदी महाराष्ट्रातील जनतेने अनेकदा ऐकली आहे आणि त्यांचे भरपूर मनोरंजनही झाले आहे. अलीकडेच सांगली येथे काँग्रेस दिवंगत नेते मदन पाटील यांच्या जयंती सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी आपल्या भाषणाचा रोख तिथे उपस्थित असलेल्या प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे वळवला आणि आमचा अशोक चांगले काम करतो, पण अधूनमधून घोटाळेही करतो असा टोला मारला, तेव्हा चव्हाणांचा चेहरा गोरामोरा झाला. पण नंतर ‘पतंगराव असे बोलू शकतात त्याचे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही’ असे म्हणत चव्हाण यांनी वेळ मारून नेली. काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आमच्या मागून आलेले काही तरुण नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण आम्ही ६७ सालापासून घासतोच आहोत. दिल्लीचे पक्षश्रेष्ठी आमचा कधी विचार करीत नाहीत. खरे की नाही शरदराव, असे म्हणत पतंगरावांनी त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शरद पवार यांचीच थेट साक्ष काढली. तेव्हा पवार यांनीही दाद देत हो म्हणून टाकले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना जे वाटायचे ते बोलून मोकळे व्हायचे. १९९० साली झालेली विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकून राज्याची सत्ता ताब्यात घ्यायची असा ठाम निर्धार त्यांनी केला होता. समोर तशाच निर्धाराने शरद पवार उभे ठाकले होते. या निवडणुकीच्या प्रचाराला बाळासाहेब हे पवारांवर काय टीका करणार, याची उत्सुकता श्रोत्यांना असायची. मग कधी बारामतीचा म्हमद्या असा उल्लेख करून बाळासाहेब सभेला हसून सोडायचे, तर कधी चिरमु-याचे पोते असाही उल्लेख करायचे. शरद पवार अगदी पट्टीचे वक्ते नसले तरी तेही आपल्या सभातून बाळासाहेबांची टिंगलटवाळी करायचे. भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली लागतात की वर लागतात हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कुठल्याच नेत्याला माहीत नाही, या पवारांच्या टीकेलाही श्रोत्यांकडून भरपूर दाद मिळायची. ज्याच्या छातीच्या फासळ्या मोजता येतील असे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व आहे असे म्हणत चिरमु-याचे पोते या टीकेला पवार उत्तर देऊन हंशा मिळवायचे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत गलिच्छ शब्दात टीका केली असली तरी अनेक दिवस गुजरात पिंजून काढणा-या राहुल गांधी यांनी मात्र आपल्याकडून नरेंद्र मोदीच काय, भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यावर अनाठायी टीका होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतल्याचे जाणवते. पंतप्रधान या पदावर टीका करू नका पण नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने जे निर्णय घेतले त्यात चुकीचे काही आढळल्यास त्या चुकांवर बोट ठेवून टीका करा असा सल्ला राहुल गांधी यांनी अगदी जाहीरपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी व्यक्तिगत पातळीवर आपल्या टीकेने दुखावले जातील असे कोणतेही वक्तव्य कधीच केल्याचे आढळून आले नाही. विद्या ही जशी नम्रतेने शोभून दिसते अगदी त्याच पद्धतीने म्हणायचे झाल्यास विनयाने आणि सभ्यतापूर्ण वागण्याने नेते शोभून दिसतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे थोडय़ा बिनधास्त पद्धतीने बोलण्याची सवय आपल्याकडील नेत्यांना लागली आहे. पण म्हणून मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचे कुणीही समर्थन करणार नाही. अगदी काँग्रेस पक्षानेही अय्यर यांना पक्षातून निलंबित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. नेत्यांनी आपली जीभ घसरणार नाही याची काळजी घेऊन वक्तव्ये केली तर जे अय्यर यांच्या वाटय़ाला आले ते इतर कुणाच्याही येणार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version