Home कोलाज बॉम्ब आणि बाप

बॉम्ब आणि बाप

0

आपल्या काळ्या कामगिरीला अंतिम अंजाम देताना एखाद्या दहशतवाद्याच्या मनात नेमकं कुठल्या प्रकारचं आक्रंदन सुरू असतं, त्याच्या मनात काय विचार येतात; हा अनेक लेखक-पटकथाकारांच्या हृदयातला विषय. दिल्ली स्टेशनवर एका ब्रीफकेसमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून गेलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मनातल्या खळबळीतून काय होऊ शकतं, याची ही एक काल्पनिक झलक.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. पहाटे साडेपाचची वेळ. पंधराच मिनिटात दिल्लीहून भोपाळकडे जाणारी शताब्दी एक्सप्रेस सुटणार होती. सारं स्टेशन इतक्या पहाटेही गजबजलेलं होतं. ध्वनिक्षेपकावरून सर्व प्रवाशांना गाडीत बसून घेण्याची घोषणा झालेली होती. गाडीनं जाणारे प्रवासी, त्यांना सोडायला आलेले सखेसोबती, लगबगीनं धावपळ करणारे पोर्टर्स, हमाल, इतक्या सकाळी स्टॉलवर उभे राहून तळकट, तेलकट पदार्थ खात असलेले लोक सगळं वातावरण कसं चैतन्यमय होतं.

दिल्लीच्या पोलिस मुख्यालयात याच वेळेस शताब्दी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आला. एका ब्रीफकेसमध्ये ठेवलेला हा बॉम्ब कुठल्या नंबरच्या बोगीत कुठे ठेवला आहे, याचीही सविस्तर माहिती फोन करणा-याने दिली. पहाटेच्या साखरझोपेत असलेलं दिल्लीचं पोलिस खातं खडबडून जागं झालं.

सर्वप्रथम ध्वनिक्षेपकावरून घोषणा करण्यात आली, ‘सर्व प्रवाशांनी ताबडतोब गाडीतून खाली उतरून स्टेशनच्या बाहेर जावं. जाताना आपल्या किंवा दुस-या कुठल्याही सामानाला हात लावू नये.’ निश्चित काय झालंय, हे मात्र सांगितलं गेलं नाही. ते जाहीर करणं शक्यच नव्हतं. कारण गोंधळ माजला असता, तर सावरणं कठीण गेलं असतं. अर्थात, जाहीर केलं गेलं नाही, तरी लोकांना कळायचं ते कळलंच. काही लोकांनी अंदाज लावले, त्यांनी इतरांच्या कानात काहीतरी कमीजास्त सांगितलं, त्या इतरांनी आणखी कुणा इतरांना त्यात आपली भर घालून आणखी काही सांगितलं. एकूण काही मिनिटांतच काहीतरी भयंकर घडतंय, याची कल्पना प्रवाशांना आली आणि स्टेशनवर एकच गोंधळ निर्माण झाला. आरडाओरडा पोलिसांच्या शिट्टय़ा, श्वानपथकाची धावपळ. सूचना पुन:पुन्हा दिली जात होती आणि प्रवासी जीव मुठीत धरून वाट फुटेल तिकडे धावत होते. दहाच मिनिटांत अख्खी गाडी आणि प्लॅटफॉर्म रिकामा झाला. गाडीत असलेल्या सामानाची काळजी करत, देवाचं नाव घेत प्रवासी स्टेशनबाहेर, आतून काय बातमी येत आहे याची वाट बघत उभे होते.

सूचना देणा-यानं सांगितल्याप्रमाणे डबा शोधण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे त्याने सांगितलेल्या जागेवर बरोबर एक ब्रीफकेस आणि त्यातला जिवंत बॉम्ब मिळाला. बॉम्ब ताबडतोब निकामी करण्यात आला. कुठलाही धोका नको म्हणून उर्वरीत गाडीची कसून तपासणी करण्यात आली. गाडी सुरू झाल्याबरोबर निर्माण झालेल्या धक्क्यामुळे तो बॉम्ब फुटणार होता. बॉम्ब फुटला असता तर गाडीतले व प्लॅटफॉर्मवरचे मिळून असंख्य लोक मारले गेले असते. गाडीत बॉम्ब ठेवल्याची सूचना देणा-या त्या कुणा अनोळखी देवदूताला मनस्वी धन्यवाद देत प्रवासी गाडीत बसले. पावणेसहाला सुटणारी नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस, या गोंधळामुळे साडेनऊला सुटली.

पोलिसी यंत्रणेच्या हालचालीला वेगाने सुरुवात झाली आणि दुस-या दिवशीच चांदनी चौकाच्या एका छोट्याशा बोळात राहणाऱ्या आणि पाकिस्तानी नागरिकत्व असणाऱ्या अब्दुल मसूद अहमदला सकाळी नऊ वाजता अटक करण्यात आली. अटक केली जात असताना, पंचेचाळीस वर्षाचा मसूद शांत होता…अत्यंत शांत. जणू काही हे सर्व घडणार आहे, याची जाणीव त्याला पूर्वीपासूनच असावी. दारात पोलिस उभे असताना, त्याने शांतपणे पोलिस इन्स्पेक्टरला, ‘माझी बायको आलं घालून फार उत्तम चहा करते. निघण्यापूर्वी मला तो चहा घ्यायची इच्छा आहे. तुम्ही घेणार का?’ असा प्रश्न विचारला नव्हे, बायकोला आग्रह करून चहा करायला लावला, पोलिसांना त्या दोघांनी तो चहा अत्यंत प्रेमाने देऊ केला.
मसूदच्या घराची कसून झडती घेण्यात आली. त्याच्या घरून जप्त करण्यात आलेली कागदपत्रं तपासण्यात आली. तो स्वत: आपण पाकिस्तानी नागरिक असल्याचं दहा-दहादा सांगत असतानाही चॅनल्सवाल्या मंडळींनी आपण फार मोठा शोध लावला आहे, अशा स्वरात त्याचं पाकिस्तानत्व सिद्ध केलं. मसूदने पोलिसांना बरीच माहिती दिली. बॉम्ब कुठून आणला, दिल्ली स्टेशनपर्यंत कुणालाही अंदाजही न येऊ देता तो कसा नेला, कसा ठेवला वगैरे. पोलिस ऑफिसरने त्याला विचारलं,
‘तुला हा बॉम्ब ठेवायला कुठून सूचना मिळाल्या?’
‘पाकिस्तानमधून मला सूचना मिळाल्या. माझ्या वतनकडून मिळालेला हा हुकूम म्हणजे मी अल्लाहचं फर्मान मानतो.’
‘तुला बॉम्ब कुणी दिला?’
‘सीमेपारहून आलेल्या माझ्या मित्राने. तो माझ्याबरोबर स्टेशनपर्यंत आला होता आणि गाडीत बॉम्ब ठेवल्याबरोबर दुस-या फलाटावरल्या गाडीने सीमेकडे निघून गेला. एव्हाना तो सीमा पार करून आपल्या छावणीत पोहोचलादेखील असेल.’
‘हा बॉम्ब फुटला असता तर किती लोक मेले असते, याची कल्पना आहे तुला?’
‘आहे तर, त्यासाठीच तर हे सगळं केलं गेलं होतं.’
‘मूर्ख माणसा,’ ऑफिसर चिडला त्याने खाडकन मसूदच्या कानफटात शिलगावली. आवाज टीपेला नेत तो ओरडला,‘ या .. या निरपराध नागरिकांनी तुझं, तुझ्या सरकारचं, तुझ्या देशाचं काय घोडं मारलं होतं?’
‘काहीच नाही. म्हणूनच मी तुम्हाला हे फोन करून कळवलं ना?’
‘कुणी फोन केला? तू?’ आता मात्र ऑफिसर चांगलाच गोंधळला. ‘तूच बॉम्ब ठेवला आणि तूच सूचना दिलीस पोलिसांना? इम्पॉसिबल.’
‘विश्वास ठेवा साहेब. समोरच ठेवली होती ना ब्रीफकेस, कुणालाही सहज दिसावी अशी बस् स्टेशपासून बाहेर आलो आणि लावला फोन तुम्हाला.’ ‘पण असं का केलंस?’ ऑफिसरचा स्वर खाली आला. हे प्रकरण वाटतं इतकं सरळ नाही, याची जाणीव त्याला झाली असावी.
‘साहेब, माझ्या वतनाकडून मिळालेला हुकूम होता म्हणून मी गाडीत बॉम्ब ठेवायला गेलो. ब्रीफकेस घेऊन गाडीत शिरलो आणि एक तरुण मुलगी आपल्या बापाला मिठी मारून रडताना मला दिसली. बाजूला तिची आई. चारदोन इतर नातेवाईक. पोरगी दुल्हनच्या वेषात होती. आश्चर्य म्हणजे, बापही टीपं गाळत होता.’
‘बरं, मग?’

‘ती मुलगी लग्न होऊन प्रथमच सासरी चालली असावी. मला त्या मुलीच्या ठिकाणी गेल्याच महिन्यात निकाह झालेली माझी मुलगी दिसू लागली. ‘मसूद एकदम गप्प झाला ‘आणि तू पोलिसांना फोन केलास?’ ऑफिसरचा गोंधळ कमी होत नव्हता. मसूदने सांगितलेलं हे सगळं या देशातल्या लोकांना सांगणं, पटवणं त्याला जमलं नसतं. लोकांना ते ऐकायला पचायला जड गेलं असतं. सीमेपार असणा-या, एका काल्पनिक रेषेच्या आधारे वेगळ्या झालेल्या शेजारी देशातही आपल्यासारख्या शरीरयष्टीची, आपल्याच रंगाची आणि आपल्यासारखंच मन असणारी माणसं राहतात, याची कल्पनाच या दोन्ही देशांची माणसं करू शकली नसती. लोकांनी हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न जरी केला असता तरी या देशातल्या राजकारणी लोकांनी त्यांना ते समजू दिलं नसतं. विचार करून ऑफिसरचं डोकं फिरायची वेळ आली, मसूदचा शांतपणा असह्य होऊन तो पुन्हा ओरडला.
‘अरे बोल ना पुढे, का केलास तू फोन?’

‘सांगतो ना साहेब माझ्या मनात विचार आला, ही पोरगी शे-दोनशे मैल लांब जातेय तर बापाचा जीव इतका कासावीस होतोय. जर ही पोरगी कायमची लांब गेली, तर त्या बापाची काय अवस्था होईल? त्या मुलीच्या जागी माझी सलमा असती तर? मी डोळे मिटले आणि मिटल्या डोळ्यांसमोर झालेल्या अंधारात माझी सलमा मला मिठी मारून रडताना दिसली. डोळे उघडले आणि कधी नव्हे ते माझे डोळे मला ओले झालेले जाणवले. मग मी जास्त विचार केलाच नाही. मी ती ब्रीफकेस, लपवून न ठेवता सहज दिसेल अशी ठेवली अन् पोलिसांना फोन केला. अल्लाहचा हुकूमही मानला मी आणि माझ्या मनातल्या बापाचा आवाजही ऐकला. आता मी पाक आहे.. एकदम पाक. तुमच्या देशाने मला काहीही शिक्षा करावी. ती भोगायला तयार आहे मी अल्लाहच्या नजरेला नजर मिळवू शकतो मी आता.’
मसूदने खिशातून कापड काढलं. ते जमिनीवर अंथरलं. गुडघे टेकून तो त्यावर बसला, दोन्ही हातांची ओंजळ केली आणि सा-या मानवजातीच्या सलामतीकरता दुआ मागण्यासाठी त्याने डोळे मिटले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version