Home मध्यंतर सुखदा ‘बुद्धि’बळाच्या माहेरवाशीणी

‘बुद्धि’बळाच्या माहेरवाशीणी

0

महाभारतातल्या सारीपाटात पांडवांनी द्रौपदीला डावावर लावलं व ते तिला हरले होते. तो काळ असा होता जेव्हा सोंगटयांच्या पटावर पुरुष खेळ जिंकत होते आणि आजचा आधुनिक काळ आहे, ज्यात महिला बुद्धिबळाच्या पटावर आपलं वर्चस्व गाजवत आहेत. दरवर्षी मे महिन्यात सांगलीमध्ये होणारी नूतन बुद्धिबळ मंडळाची स्पर्धा ही महिलांसाठी त्या दृष्टीने खूप विशेष असते. कारण या मंडळातर्फे आयोजित करण्यात येणा-या आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत स्त्रियांना मोफत प्रवेश असतो. यंदा महिलांसाठीची ही स्पर्धा २५ ते २९ मे अशी आयोजित करण्यात आली आहे.

नेहमीच असं म्हटलं जातं की, पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना नेहमी कमी लेखलं जातं. त्यांना काही कळत नाही, बुद्धी कमी असते असेच शेरे मारले जातात. पण असं मानण्याचं काहीच कारण आता उरलेलं नाही. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. अगदी आपल्या बुद्धीच्या जोरावर बुद्धिबळ खेळाच्या क्षेत्रातही त्यांनी पुरुषांवर मात केली आहे. साधारण चाळीस वर्षापूर्वी पुरुषी मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात सांगलीसारख्या ठिकाणी महिलांकरिता बुद्धिबळ स्पर्धा सुरू करण्यात आली. बुद्धिबळातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे दिवगंत भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या प्रेरणेनं सांगलीत नूतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीनं सांगलीत बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जात असत.

या स्पर्धामध्ये पडसलगीकरांनी नेहमीच महिलांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. फक्त बुद्धिबळपटूच नाही तर त्यांच्या मंडळातील स्पर्धेत खेळायला येणारी प्रत्येक महिला ही ‘माहेरवाशीण’ आहे, असे भाऊ म्हणायचे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेली ही स्पर्धा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमुळे अविरत सुरू आहे. मीनाताई शिरगावकर स्मृती या नावानं होणा-या या स्पर्धेचं यंदा १०वं वर्ष आहे. या स्पर्धेत ग्रॅँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर यासह विविध पातळयांवर बुद्धिबळ खेळणा-या महिला मोठय़ा संख्येने सहभागी होतात. स्पर्धेत मोफत प्रवेशासह मंडळाकडून महिलांची आणि त्यांच्यासोबत येणा-या व्यक्तींच्या राहण्याची, जेवणाची मोफत सोय करण्यात येते. इतकंच नाही तर या स्पर्धेची बक्षीस रक्कम सव्वा लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यात विजेतीला २५ हजार रुपये आणि चांदीचं शिल्ड बक्षीस म्हणून देण्यात येतं. फक्त विजेतीलाच नाही तर ३५व्या स्थानापर्यंत क्रमांक पटकावणा-या महिला किमान ७५० रुपये तरी घेऊन जातात. अर्थातच महिलांचाही या स्पर्धेला मोठा प्रतिसाद असतो.

कोल्हापूरची महिला फिडेमास्टर ऋचा पुजारी ही नामांकित महिला बुद्धिबळपटूही वयाच्या आठव्या वर्षापासून येथील विविध वयोगटांतील स्पर्धेत सहभागी होत आहे. तिच्यासह या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आदी राज्यांतील अनेक मुली स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. त्यात ऋचासह अनन्या सुरेश, हर्षिता गुंडती, साक्षी चितलांग, जान्हवी सोनजी, धनश्री पंडित, सलोनी सापळे, ए. हर्षिनी, एस. श्रीनिधी, समीक्षा पाटील, तन्मयी गणगे, अदिती प्रभुगावकर, श्रुती भोसले, इंद्रील वाणी, तन्वी भावे, प्रिया लोटलीकर, आशिना गजरीया, धनश्री राठी, रीया लाहोटी, खुशी सुराणा यांच्यासह ५१ मानांकित महिला बुद्धिबळपटू सहभागी झाल्या आहेत.

नूतन बुद्धिबळ मंडळाकडून खेळण्याचा अनुभव फार मोठा असल्याचं महिला फिडे मास्टर ऋचा पुजारी सांगते. ऋचानं मंडळाबाबत दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘‘नूतन बुद्धिबळ मंडळाकडून गेली बरीच र्वष मी सातत्यानं खेळत आहे आणि मी इथं अनेक बक्षीसंही पटकावली आहेत. त्यांच्या आठ वर्षाखालील स्पर्धेचंही मी जेतेपद पटकवलं आहे. कितीही व्यग्र वेळापत्रक असलं तरी या महोत्सवात सहभागी होण्याचा माझा प्रयत्न असतो. भाऊसाहेब पडसलगीकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी या खेळाकडे जास्त लक्ष दिलं. जेव्हा मी येथे पूर्वी यायचे तेव्हा भाऊंकडूनही खूप काही शिकायला मिळायचं त्याचा आता फायदा होतो. सध्या जी महिलांची स्पर्धा सुरू (मीनाताई शिरगावकर स्मृती) आहे त्यात मी आतापर्यंत चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे. यंदा सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची मला संधी आहे. या स्पर्धामध्ये खेळल्याचा फायदा अर्थातच मला रेटिंग वाढवण्यासाठीही होतो. येथे येणा-या अन्य महिला किंवा मुली यादेखील चांगल्या बुद्धिबळ खेळणा-या आहेत. ते पाहता मला शिकायलादेखील खूप काही मिळतं. मला या वर्षी २० वर्षाखालील आशिया बुद्धिबळ स्पर्धा आणि जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे,’’ असं १९ वर्षीय ऋचाने म्हटलं.

ऋचा आता लवकरच महिला आंतरराष्ट्रीय मास्टर होण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी तिला एकच नॉर्म पूर्ण करायचा आहे. महाराष्ट्रातून अजून महिला बुद्धिबळपटूला ग्रॅँडमास्टरचा मान मिळवता आलेला नाही. वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणा-या ऋचानं सातव्या वर्षीच पहिलंवहिलं राष्ट्रीय जेतेपद पटकावलं. लवकरच ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळवेल असं तिला व नूतन बुद्धिबळ मंडळालाही वाटतं आहे. मंडळाच्या पदाधिकारी स्मिता केळकर, माधुरी कात्रे, सीमा कठमाळे यादेखील सहभागी महिलांचा गेली काही र्वष सतत उत्साह वाढवत आहेत. विशेष म्हणजे, या तिघी जणी राष्ट्रीय पंचदेखील आहेत. सीमा कठमाळे यांचा मुलगा समीर कठमाळे हा आंतरराष्ट्रीय मास्टर आहे. स्मिता केळकर यांनी महिलांच्या या स्पर्धेबाबत माहिती दिली आहे.

१९७६ साली विशेषकरून महिलांसाठी सुरू झालेल्या स्पर्धेला सीताबाई भिडे ओपन हे नाव होते. मात्र तेव्हा आताप्रमाणे रेटिंग नव्हतं. त्यावेळी जवळपास दोन ते तीन र्वष विजेती भाग्यश्री साठे-ठिपसेच होत्या. त्या सांगलीच्याच असून नूतन बुद्धिबळ मंडळात भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बुद्धिबळाचे धडे गिरवले आहेत. आता गेली १० वर्ष मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांच्या पत्नी मीनाताई शिरगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांसाठी फिडे रेटिंग ही मानाची स्पर्धा भरवली जात आहे. ‘‘यंदाच्या या स्पर्धेचं वैशिष्टय़ म्हणजे २२००च्या वर फिडे रेटिंग असलेल्या पहिल्या २० महिलांकडून प्रवेश फी नाही तर उलट आम्हीच त्यांना तीन हजार रुपये सहभाग घेण्यासाठी देतो. त्यामागे आमचा उद्देश असा आहे की, चांगलं रेटिंग असलेल्या महिलांच्या सहभागामुळे अन्य महिलांनाही खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. यंदा या आमच्या नवीन उपक्रमाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे की, या वर्षी ५० टक्यांपेक्षा जास्त महिला या फिडे रेटिंग असलेल्या आहेत. हे आम्ही आमच्या मंडळाच्या कार्याचं यश समजतो. महिलांची मोफत स्पर्धा आयोजित करण्यामागे मंडळाचा कोणताच फायदा नसतो उलट आर्थिकदृष्टय़ा तोटाच असतो.’’ असं नूतन बुद्धिबळ मंडळाच्या खजिनदार स्मिता केळकर यांनी सांगितलं.

ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोठा खर्च असतो. मात्र तरीदेखील महिलांनी मोठय़ा संख्येने बुद्धिबळ खेळावं हाच एकमेव उद्देश ठेवून मंडळाचा प्रवास सुरू आहे. महिलांसाठीची ही स्पर्धा वातानुकूलित हॉलमध्ये आयोजित केली जाते, जेणेकरून मे महिन्यातील उन्हाळ्याचा त्यांना त्रास होणार नाही. महिला स्पर्धक जिथे वास्तव्यास असतात तिथे सुरक्षाव्यवस्थाही पुरवली जाते. सहभागी सर्व स्पर्धक नेहमीच मंडळाचं उत्तम सोयी उपलब्ध केल्याबद्दल कौतुक करतात. महिलांनी मोठय़ा संख्येने बुद्धिबळ खेळावं असं भाऊ नेहमीच सांगायचे. त्यांच्या प्रयत्नांना दरवर्षी मोठं यश मिळालेलं दिसून येतं याचा मंडळाच्या सा-याच पदाधिकाऱ्यांना अभिमान वाटतो, एकंदरीत ज्या महिलांना बुद्धिबळाची आवड आहे त्यांनी नूतन बुद्धिबळ मंडळाच्या या महिलांसाठीच्या स्पर्धेत सहभागी व्हायलाच हवं. कारण येथील स्पर्धेत ठसा उमटवलेले आज उच्चस्तरावर खेळत असल्याचं दिसतं. राज्यातील महिलांना कमी न लेखता त्यांना बुद्धिबळासारख्या वैशिष्टय़पूर्ण खेळासाठी सतत प्रोत्साहन देणारी नूतन बुद्धिबळ मंडळासारखी मंडळ विरळाच आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version