Home संपादकीय विशेष लेख बंड ते बंडाळी शिवसेनेची वाटचाल..

बंड ते बंडाळी शिवसेनेची वाटचाल..

0

मुंबई महापालिकेच्या राजकारणात शिवसेना हाच जिंकणारा घोडा आहे, हे आता सगळ्यांनाच माहीत झाले आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत या घोडय़ावर मांड ठोकायला मिळावी म्हणून प्रत्येक शिवसैनिक हातघाईवर आलेला असतो. या स्पर्धेचाच लाईव्ह शो ३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील रस्त्यारस्त्यांत पाहायला मिळाला. त्या दिवशी शिवसेना नेत्यांनी महापालिका उमेदवारांची यादी जाहीर केली आणि शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली. त्याला तिकीट दिले तर मला का नाही, त्यांच्या गटाला उमेदवारी दिली, आमच्या गटाला डावलले या भावनेतून हा संताप उसळत होता. ही नुसती बंडखोरी नव्हती तर बंडाळी होती.

एक काळ असा होता की, शिवसेनेला उमेदवार मिळण्याचीही वानवा होती, मग बंडखोरी आणि बंडाळी या खूप दूरच्या गोष्टी. शिवसेनेच्या स्थापनेपासून या पक्षात कित्येक वेळा बंड झाले. हा इतिहास मुळापासून जाणून घेणे महत्त्वाचे आणि मनोरंजकही ठरावे. १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हा पक्ष फारसा जमेत धरण्याच्या लायकीचा नाही असाच अन्य पक्षातील धुरिणाचा समज होता.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही घोषणा देत शिवसेना राजकारणात उतरली होती. २० टक्के का होईना पण राजकारणाची घोषणा दिली आहेच, तर तेही अजमावून पाहू असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेच्या स्थापनेनंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९६७ साली ठाणे नगरपालिकेच्या (महापालिकेच्या नव्हे) निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आणि तो भलताच लाभदायी ठरला. ठाणे नगरपालिकेची सत्ता शिवसेनेकडे आली. मराठे नावाचे गृहस्थ ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९६७ साली मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना सेनेने मुंबई महापालिकेत निवडून पाठविले. १९७३ साली छगन भुजबळ नगरसेवक म्हणून निवडून आले. मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला पहिले आणि मोठे यश मिळाले ते १९८५ साली झालेल्या निवडणुकीत. या निवडणुकीत महापालिकेची संपूर्ण सत्ता शिवसेनेकडे आली. छगन भुजबळ, दत्ता नलावडे, शरद आचार्य आदी ज्येष्ठ नगरसेवक लागोपाठ महापौर झाले. कुणी कितीही म्हटले तरी या महापालिका निवडणुकीत अनेक वॉर्डात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. बंडखोरीची लागण आणि नंतर तिचा प्रत्येक निवडणुकीदरम्यान फैलाव हा प्रकार शिवसेनेत सुरू झाला तो १९९० साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून. १९९० साली विधानसभा उमेदवारांची यादी सेना नेत्यांनी प्रसिद्ध केली आणि मोठा दंगा उसळला तो मराठवाडय़ात, ज्या तरुणाने मराठवाडय़ात शिवसेना बांधली त्या सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखालीच. शिवसेनेविरुद्ध मराठवाडय़ात बंडाचे निशाण फडकवण्यात आले. हे बंड शमवताना सेना नेत्यांच्या नाकीनऊ आले. पण खरे बंड तर विधानसभा निवडणुकीनंतरच झाले. या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि शिवसेनेला दुसरा क्रमांक मिळाला. विरोधी पक्षनेतेपद सेनेकडे आले आणि या पदाचा मान बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना दिला. त्यामुळे सेनेतील दुसरे ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते छगन भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शिवसेनेत बंड करणे म्हणजे सेना भवनाच्या भक्कम तटबंदीवर टकरा घेऊन कपाळमोक्ष करून घ्यायचा आणि रक्तबंबाळ व्हायचे असाच प्रकार होता. तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच अनेकांनी हे धाडस दाखविले. या पक्षातील पहिले मोठे बंड संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. अजूनही त्याची भीतिदायक आठवण राजकीय वर्तुळात अधूनमधून चर्चिली जाते. हे बंड झाले ते ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने. ठाणे महापालिकेचे पहिले महापौरपद भूषविण्याचा मान सतीश प्रधान यांना मिळाला. त्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर साळवी यांचा पराभव केला. प्रधानांचे हे यश १९८६ सालचे होते. महापौरपदांची पुढची निवडणूक १९८७ साली झाली आणि ती ठाण्याच्या शिवसेनेतील बंडखोरीला आमंत्रण देणारी ठरली. त्या निवडणुकीत राजकीय डावपेच करण्यात माहीर म्हणून ओळखल्या जाणा-या वसंत डावखरे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन मैदानात उतरविले होते. शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश परांजपे यांना उमेदवारी दिली होती. आधीच्या निवडणुकीत सतीश प्रधान सहजपणे निवडून आले होते, त्यामुळे प्रकाश परांजपे यांनाही विजयासाठी कष्ट घ्यावे लागणार नाहीत, असाच ठाणे शिवसेनेतील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अंदाज होता. पण हा गाफिलपणाच शिवसेनेच्या अंगाशी आला. समोर वसंत डावखरे उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. याचा सेनेने गांभीर्याने विचारच केला नाही आणि त्याचाच फायदा डावखरे यांनी घेतला. शिवसेनेच्या काही नगरसेवकांना त्यांनी आपले सगळे डाव पणाला लावून फोडले आणि चमत्कार घडला. प्रकाश परांजपे यांचा निसटता पराभव करून वसंत डावखरे निवडून आले. हा पराभव तेव्हा खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागला. ठाणे महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या फाटाफुटीची त्यांनी गंभीर दखल घेतली आणि सर्वच नगरसेवकांना राजीनामे द्यायला लावले. शिवसेनेच्या या पराभवाचा आणखी एक दु:खद अंक म्हणजे श्रीधर खोपकर या नगरसेवकांची त्यावेळी झालेली भीषण हत्या. शिवसेनेतील हे पहिले मोठे आणि दु:खद बंड म्हणावे लागेल. दुसरे बंड छगन भुजबळ यांनी केले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाताना त्यांनी सेनेच्या आणखी १८ आमदारांना आपल्याबरोबर काँग्रेसमध्ये नेले. भुजबळांनी केलेल्या या बंडाचा सर्वात मोठा फायदा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी उचलला. भुजबळ आणि १८ आमदार काँग्रेसमध्ये जाताच सेनेचे संख्याबळ भाजपापेक्षा कमी झाले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद भाजपाला द्या, असा दावा करीत मुंडे यांनी सेनेकडून विरोधी पक्षनेतेपद अक्षरश: हिसकावून घेतले.

भुजबळ यांच्यानंतर शिवसेनेत धक्कादायक बंड केले ते त्यावेळचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिका-यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नारायण राणे यांनी शिवसेनेत पैसे घेऊन तिकिटे विकली जातात असा सडेतोड आरोप केला आणि कष्ट करणा-या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे पैसे नाहीत, म्हणून तिकिटे नाकारणा-या वृत्तीचा निषेध करत शिवसेनेला रामराम ठोकला. शिवसेनेतील शेवटचे आणि सर्वाना अचंबित करणारे बंड खुद्द मातोश्रीमध्येच झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला विठ्ठलासमान आहेत, पण त्यांच्याभोवती जमा झालेले बडवे दर्शनही घेऊ देत नाहीत, असा जळजळीत आरोप करीत आपण शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याचे संकेत देत, ६ मार्च २००६ साली राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर अतिप्रचंड सभा घेऊन त्या सभेतच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास आता शिवसेनेत बंड करणे किंवा त्या पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षात जाणे हे कार्यकर्त्यांना पूर्वीसारखे भीतिदायक वाटत नाही. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेनेचे तिकीट न मिळाल्यामुळे अनेक जण दुखावले गेले. त्यांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरत बंडाची भाषा सुरू केली. पूर्वी सेनेत बंड हा शब्द उच्चारणेही पापासमान वाटायचे. आता कुणीही उठून सेनेच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देताना दिसतो. शिवसेनेची ही वाटचाल विचार करायला लावणारी आहे हे मात्र निश्चित.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version