Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती प्राणशक्तीचा आविष्कार

प्राणशक्तीचा आविष्कार

0

प्राणिक हीलिंगमध्ये रोगी आणि उपचारक यांच्यामध्ये कुठलाही शारीरिक संपर्क नसतो. प्राणिक हीलिंगच्या मूळ सूत्रानुसार ऊर्जेचं वलय भौतिक शरीराशी बांधलेलं असतं. हीलिंग तंत्रामध्ये प्राण किंवा जीवनशक्तीच्या आधारे शरीराचं संतुलन, सुसंगतता आणि शक्तीचे वहन किंवा शक्तीचे हस्तांतरण केलं जातं.

पहाटे पहाटे दिवस सुरू होताना जेव्हा गुडघा फार ठणकतो तेव्हा हळुहळू चाळीशी जवळ आल्याचा विचार मनात डोकावतो. मग घरकाम, नंतर स्वत:चं आवरून झाल्यावर जेमतेम देवपूजा करेपर्यंत ऑफिसची गाडी जवळजवळ हुकलेली असते. ती कशीबशी धावतपळत मिळवल्यावर उरलीसुरली एनर्जीही ट्रेनमध्ये भांडणं करण्यात जाते. मस्टर साइन केल्यावर जीव भांड्यात पडतो, पण गुडघा दुखतच असतो. शहरात राहाणा-या बहुतेक पुरूष आणि स्त्रिया थोडय़ाफार फरकाने याच जीवनचक्रातून जात असतात.
यापेक्षा काही निराळं आयुष्यं समोर यावं असं वाटतं? पहाटे उठताना जर गुडघा दुखलाच नाही तर? किंवा हॅरी पॉटरसारखा ‘रे-पा-रो’ असा जादुई मंत्र वापरून जर आपल्याला तुटलेले किंवा इजा झालेले अवयव ठिक करता आले असते तर..!?

होय, खरोखरच अशी आपल्या शरीर आणि मनाची दुरूस्ती शक्य आहे. पण त्यासाठी फक्त हॅरी पॉटरसारखा ‘रे-पा-रो’ असा जादुई मंत्र पुरेसा नाही तर योगविद्या प्राणिक हीलिंग शिकायला हवं. हे प्राणिक हीलिंग आहे तरी काय?

प्राणिक हीलिंग हे अतिप्राचीन शास्त्र असून फिलीपाइन्समधील मास्टर चोआ कोक सुई यांनी या विद्येची पुनर्माडणी तसंच पुर्नसशोधन केलं. जीवनाचा मूलस्रेत किंवा प्राण किंवा प्राणशक्तीचा वापर करून रोगांचा उपचार करण्याची ही विद्या आहे. आजारातून किंवा कुठल्याही त्रासातून बाहेर पडण्याची, बरं होण्याची एक अंतर्गत यंत्रणा माणसाच्या शरीरामध्ये असते. या प्राथमिक तथ्याचा आधार घेऊन हीलिंग प्रकियेला फक्त गतीमान करण्याचं असं हे तंत्र आहे. जिथं दुखापत झाली आहे किंवा ज्या अवयवावर उपचार करायचा आहे तिथे आवश्यकतेनुरूप पाण ऊर्जा प्रक्षेपित केली जाते. प्राणिक हीलिंगमध्ये रोगी आणि उपचारक यांच्यामध्ये कुठलाही शारीरिक संपर्क नसतो. प्राणिक हीलिंगचं मूळ सूत्र असं आहे की प्रत्येक व्यक्तीला एनर्जी बॉडी किंवा ऑरा असतो. ऊर्जेचं हे वलय भौतिक शरीराशी बांधलेलं असतं. हे ऊर्जाशरीर पर्यावरणातून प्राण घेत असतं आणि संपूर्ण शरीराला तो प्राण पुरवत असतं. या कार्यासाठी ऊर्जाशरीरामध्ये शक्तीची केंद्रं असतात.

शरीराच्या या सूक्ष्म शक्तीचा अभ्यास निरनिराळ्या योग पद्धतींमध्ये, निरनिराळ्या संस्कृतीत आणि काळाच्या विविध टप्प्यांवर केला गेला आहे. हीलिंग तंत्रामध्ये प्राण किंवा जीवनशक्तीच्या आधारे शरीराचं संतुलन, सुसंगतता आणि शक्तीचे वहन किंवा शक्तीचे हस्तांतरण केलं जातं. प्राणिक हीलिंगमार्फत अनेक जुनाट आजार बरे करता येतात. पारंपरिक वैद्यकाचा प्राणिक हीलिंग हा काही पर्याय नाही, तर ते पूरक उपचार तंत्र आहे. पारंपरिक वैद्यक तसंच उपचारपद्धतींना बाजूला सारणं हा प्राणिक हीलिंग योगविद्येचा उद्देश नाही, तर याउलट पारंपरिक वैद्यक आणि उपचारांची ती साथ करते. आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा अ‍ॅलोपाथी या सर्वाना ती पूरक कार्य करते. प्राणिक हीलर्स हे मेडीकल डॉक्टर्स नव्हेत परंतु मेडीकल डॉक्टर्स हे प्राणिक हीलर्स असू शकतात.
प्राणिक हीलिंग विकसित करताना ग्रॅण्ड मास्टर चोआ कोक सुई यांनी अथकपणे 30 वर्षे संशोधन केलं आणि प्राणिक हीलिंगची उपचारपद्धती पुन:पुन्हा तपासून पाहिली. ते केमिकल इंजीनियर होते. एक उद्योजकही होते तसंच ते मानवतावादी असून करड्या शिस्तीचे एक सच्चे साधक व संशोधक होते. त्यांनी प्राणिक हीलिंग तंत्र केवळ विकसित केलं नाही तर त्यावर कित्येक पुस्तकं त्यांनी लिहीली. आज जगभर कित्येक प्राणिक हीलर्स त्यांचा क्रमिक पुस्तकांप्रमाणे वापर करत आहेत. फिलिपाइन्स, भारत, युरोपमधील अनेक देश आणि अमेरिकेतही अनेक र्व्ष प्राणिक हीलिंगचा प्रचार, प्रसार आणि वापर सुरू आहे. पाठदुखी, एपिलेप्सी, मधुमेह, संधीवात, रक्तदाब, श्वसनाचे आजार अशा अनेक आजारांवर हे प्रभावी उपचारतंत्र म्हणून सिद्ध झालं आहे.

प्राणिक हीलिंगमध्ये बेसिक कोर्स, अ‍ॅडव्हान्स कोर्स केल्यावर शारीरिक आजारांवर उपचार करता येतो, तर ‘सायकोथेरपी’ ही प्राणिक हीलिंगची तिसरी पायरी आहे. प्रामुख्याने मनाचे आजार उदा. आभास होणे, भीती वाटणे, उदास वाटणे, दारू, तंबाखू, सिगारेट यांची व्यसनं यावर प्राणिक हीलिंगद्वारा मात करता येते. भौतिक शरीरामध्ये जे व्यक्त होतं त्या सर्वाची कारणं आणि मूळ बीज हे ऊर्जाशरीरामध्ये असतं. ऊर्जाशरीर आणि भौतिक शरीर हे एकमेकांशी निगडित असल्याने आणि त्यांच्यामध्ये प्रगाढ असा दुवा असल्याने त्या जोरावरच ही उपचार पद्धती एक र्सवकष उपचार पद्धती म्हणून मास्टर चोआ यांनी विकसित केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version