Home महामुंबई प्रहारचे नागपूर ब्युरो चीफ मोरेश्वर बडगे यांना गं. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार

प्रहारचे नागपूर ब्युरो चीफ मोरेश्वर बडगे यांना गं. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार

0

गडकरी रंगायतनात पार पडलेल्या राज्यस्तरीय पत्रकार दिन या सोहळ्यात राज्यातील अनेक पत्रकारांचा त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. 

ठाणे- मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ठाण्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गडकरी रंगायतनात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यातील अनेक पत्रकारांचा त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यात दैनिक ‘प्रहार’चे नागपूर ब्युरो चीफ मोरेश्वर बडगे यांना गं. त्र्यं. माडखोलकर पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘सामना’चे संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्या लेखणीने गाजवणारे ९१ वर्षाचे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा सपत्नीक जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

यावेळी एक नवीन पायंडा पाडत त्यांच्या पुरस्काराची ९१ हजारांची राशी थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली. या पुरस्काराला उत्तर देताना भावुक झालेल्या दिनू रणदिवे यांनी आपल्या तरुणपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या.

आपल्या लेखणीला बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी प्रचंड बळ मिळाले, मात्र यासाठी त्यांनी माझ्याकडून कधी एक पैसाही घेतला नाही, असे रणदिवे म्हणाले. त्या काळात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणि मला अटक झाल्यानंतर आम्ही तिघेही ठाण्याच्या कारागृहात एकत्रच होतो, अशी आठवणही रणदिवे यांनी सांगितली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पत्रकारांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर, लोकमतचे निवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी आणि मराठवाडय़ातील दुष्काळाचे अभ्यासक असलेले ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब सहभागी झाले होते. यावेळी दैनिक ‘प्रहार’चे वरिष्ठ राजकीय प्रतिनिधी व कवी श्यामसुंदर सोन्नर यांनी दुष्काळावरील कविता सादर केल्या.

यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रमोहन पुपाला यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, अरुण खोरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार, कमलेश सुतार यांना पा. वा. गाडगीळ पुरस्कार, प्रणाली कापसे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, तुषार खरात यांना स्व. प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार, सुनील ढेपे यांना नागोजीराव दुधगावकर पुरस्कार, वसंतराव कुलकर्णी यांना भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार आणि विकास महाडिक यांना दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सुधीर को-हाळे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघासाठी दिला जाणारा रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा भंडारा जिल्ह्याला मिळाला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version