Home कोलाज प्रवास नूतन बुद्धिबळ मंडळाचा

प्रवास नूतन बुद्धिबळ मंडळाचा

0

‘बुद्धिबळाचे विम्बल्डन’, ‘बुद्धिबळाची पंढरी,’ ‘बुद्धिबळाचे माहेरघर’ अशा अनेक विशेषणांनी ओळखल्या जाणा-या सांगलीला सध्या दरवर्षीप्रमाणे नूतन बुद्धिबळ मंडळाचा ‘सांगली बुद्धिबळ महोत्सव’ सुरू आहे.

दरवर्षी मे महिन्यात होणा-या या महोत्सवाचा प्रवास गेली ४७ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. दिवंगत भाऊसाहेब पडसलगीकर या बुद्धिबळातील भीष्माचार्याच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नूतन बुद्धिबळ मंडळाला विश्वनाथन आनंदसारख्यांची पावले लागली आहेत. भारतातून बुद्धिबळात नाव कमावलेला प्रत्येक बुद्धिबळपटू किमान एकदातरी सांगलीला खेळून गेला आहे. यंदा सुरू असलेल्या महोत्सवाच्या निमित्ताने  या मंडळाला भेट देण्याचा योग आला.

‘विकिपिडिया’वर जरी सांगलीची माहिती वाचायला गेलात तरी सुरुवातीच्याच दुस-या परिच्छेदात या शहरातील बुद्धिबळाचे वर्णन वाचायला मिळते. त्यात दरवर्षी होणारा हा महोत्सव आणि जगप्रसिद्ध ग्रॅँडमास्टरनी या शहराला दिलेली भेट याचे वर्णन दिसते. ज्याप्रमाणे पंढरपूरला दरवर्षी खरा वारकरी न चुकता जातो त्याचप्रमाणे सांगली बुद्धिबळ महोत्सवाला देशातील विविध वयोगटांतील बुद्धिबळपटू न चुकता आवर्जून येतात. या परंपरेला विश्वनाथन आनंदही अपवाद नव्हता. एक वर्ष सांगलीकरांना आनंदचा करिष्माही दिसला होता. त्यानंतर त्याचा सुरू असलेला यशस्वी प्रवास आजतागायत सुरू आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत परिमार्जन नेगी, पेंटाल्या हरिकृष्ण हे सध्याचे ग्रॅँडमास्टरही येथे येऊन खेळून गेले आहेत. नेगी तर येथील आठ वर्षाखालील स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. प्रवीण ठिपसे, चंद्रशेखर व जयंत गोखले, रघुनंदन गोखले, अभिजित कुंटे, एस. विजयालक्ष्मी आदी अनेक नामवंत बुद्धिबळपटूंनी येथील स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याशिवाय भाग्यश्री साठे-ठिपसे, स्वाती घाटे, पल्लवी शहा, अक्षयराज कोरे, समीर कठमाळे हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूही या मंडळातून घडले आहेत. संतोष सकपाळ, चिन्मय केळकर, अमेय लिमये, ओंकार लिमये, आशिष वाघ, पुष्कर पराडकर, जुईली कुलकर्णी आदी राष्ट्रीय स्तरावर चमकलेले बुद्धिबळपटूही नूतन बुद्धिबळ मंडळातूनच पुढे आले आहेत.

भाऊ आता नसले तरी त्यांचे कार्य नूतन बुद्धिबळ मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने चालवत आहेत. ‘‘पुढे चालवा हा वारसा’’ हे भाऊंचेच शब्द आहेत. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली चिंदबर कोटिभास्कर, डॉ. उल्हास माळी, चिंतामणी लिमये, स्मिता केळकर, माधुरी कात्रे, विजय आपटे, दीपक वायचळ आदी पदाधिकारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. फक्त स्पर्धाच नाही तर त्यांच्याकडे ४७ वर्षापासून स्पर्धेचा असलेला इतिहास छायाचित्रांसकट उपलब्ध आहे. पडसलगीकर भवन येथे हे सर्व माहिती अगदी सहज उपलब्ध होते. त्याशिवाय सांगलीत स्वातंत्र्यापूर्वीही मोठय़ा प्रमाणात खेळल्या जाणा-या बुद्धिबळाची माहिती दिसते. विशेष म्हणजे आनंद येथे खेळला होता तेव्हाची छायाचित्रेही उपलब्ध आहेत. ती छायाचित्रे जेव्हा आनंदला भाऊंनी दाखवली तेव्हा आनंदनेदेखील मंडळाच्या इतक्या नीटनेटक्या कामाचे कौतुक केले होते. स्पर्धेच्या ठिकाणी आनंद जेवताना, स्पर्धा खेळताना अशी या जगज्जेत्याची विविध छायाचित्रे मंडळाकडे तारखांनिशी उपलब्ध आहेत. फक्त छायाचित्रेच नाही तर आतापर्यंत झालेल्या प्रत्येक स्पर्धेचे निकालही तपशीलवार पद्धतीने मंडळाकडे आहेत. हे सर्व साहित्य इतक्या नीटपणे मांडणारे नूतन बुद्धिबळ मंडळ जगातील एकमेव असेल, असे येथील पदाधिकारी अभिमानाने सांगतात. बुद्धिबळावरील पुस्तकेही मोठय़ा संख्येने पडसलगीकर भवनात उपलब्ध आहेत. आता बुद्धिबळबटू पुस्तकांपेक्षा संगणकाचा आधार घेतात. ते पाहता सीडींचा खजिना वाढवण्यावरही मंडळाचा भर आहे. यंदाच्या महोत्सवात ५.५० लाख रुपयांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मंडळाला इतकी मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना अजूनही मंडळाकडे एकही मोठा उद्योगसमूह प्रायोजक म्हणून नाही. देणग्यांवर मंडळाचा कार्यभार सुरू असला तरी अजूनही मोठय़ा प्रायोजकाच्या प्रतीक्षेत मंडळ आहे. फक्त इतकेच नाही तर शक्य झाल्यास मंडळाकडे असलेल्या मोठय़ा साहित्यातून भाऊंचे एक स्मारकही उभारण्याचा मंडळाचा विचार आहे. जेणेकरून येथे येणा-या प्रत्येक युवा बुद्धिबळपटूंना मंडळाच्या कार्याची माहिती मिळू शकेल. मंडळ दरवर्षी त्यांचे उपक्रम अत्याधुनिक करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा सहभागी स्पर्धकांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.

महोत्सवाच्यावेळेस नवोदितांसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्यात येतात. एखादा ग्रॅँडमास्टर किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर यावेळेस नवोदितांना मार्गदर्शन करतो. फक्त स्पर्धाच नाही तर बुद्धिबळ खेळणा-यांची संख्या वाढावी म्हणून मंडळ हा प्रयत्न करत आहे. ८, १०, १२, १४, १६ वर्षाखालील मुलांसाठी दरवर्षी महोत्सवात स्पर्धा भरवण्यात येतात. रेटिंग स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. मंडळाचे सर्वेसर्वा भाऊ यांनी नेहमीच महिलांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्याच्यादृष्टीने मंडळ महोत्सवात महिलांसाठीही आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन स्पर्धा मोफत आयोजित करते. सव्वा लाख रुपये बक्षीस रकमेच्या, मीनाताई शिरगावकर यांच्या नावाने होणा-या स्पर्धेत महिलांना प्रवेश मोफत असतो. याशिवाय त्यांच्या राहण्याची, जेवण्याची आदी सोयही मंडळाकडून मोफत करण्यात येते. महिलांना अशाप्रकारे सवलत देणारी ही आमची एकमेव स्पर्धा आहे, याकडे पदाधिकारी लक्ष वेधतात. अर्थातच महिलांचाही स्पर्धेला मोठा प्रतिसाद असतो. ब्लिट्झ आणि रॅपिड प्रकारातील स्पर्धाचेही आयोजन करण्यात येते.
लहान मुलांसाठी आयोजित स्पर्धानाही उपस्थिती लक्षणीय आहे. मुलांपेक्षा येथे पालकांचे कौतुक करायला हवे. कारण फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, तामिळनाडू आदी विविध राज्यांतील मुले त्यांच्या आईसह किंवा घरातील एखाद्या मोठय़ा सदस्यासह येथे आले आहेत. त्यातून आदित्य कल्याणी आणि श्रेयस कुलकर्णी या सर्वाधिक रेटिंग असलेल्या मुलांची उदाहरणे बोलकी आहेत. आदित्य हा कर्नाटकचा असून श्रेयस बेळगावचा आहे. दोघेही विश्वनाथन आनंदला आदर्श मानतात. बुद्धिबळ खेळण्याचा फायदा आपल्याला अभ्यासात भरपूर होतो आणि खेळ व अभ्यास हे नियोजन उत्तम प्रकारे पार पडतो, असे या दोघांनी सांगितले. विशेष म्हणजे या दोघांच्या पालकांनीही मुलांना बुद्धिबळात कारकीर्द करायची असल्यास प्रोत्साहन देऊ असे म्हटले. या महोत्सवात सहभागी झालेले सर्व बुद्धिबळपटू हे येथील आदरातिथ्यावर भरभरून बोलताना दिसतात. येथील महोत्सवात बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी पंचही तत्परतेने उपस्थित असतात. मंडळाचे पदाधिकारीही चांगले पंच असून त्यांचा खेळाबद्दलचा अभ्यास दांडगा आहे. पदाधिका-यांना खेळाची चांगली जाण असल्याने ते सहभागी बुद्धिबळपटूंना उत्तम मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात.सहभागी लहान मुलेही दरवर्षी सांगलीत येऊन खेळायचे आहे हे आवर्जून सांगताना दिसतात. मंडळाचे यातच मोठे यश आहे.

भारताशी तुलना करता महाराष्ट्रात ग्रॅँडमास्टरची संख्या कमी असल्याचे बोलले जाते. त्याला कारणही तसेच आहे. तामिळनाडू, कर्नाटकसारख्या राज्यांतून ‘चेस इन स्कूल’ हा अभ्यासक्रम म्हणूनच राबवला जातो. ते पाहता तेथील मुले ज्यांना बुद्धिबळात कारकीर्द करायची आहे ते दिवसातील सर्वाधिक तास हा खेळ खेळतात. त्या राज्यांतून पुढे आलेले आंतरराष्ट्रीय मास्टर किंवा ग्रॅँडमास्टर हे शैक्षणिक स्तरावर कमी शिकलेले दिसतात त्यामागे तेच कारण आहे. नेमके हेच ध्यानात घेऊन मंडळाने सांगली जिल्ह्यात ‘शाळेत बुद्धिबळ’ ही योजना गेल्या काही वर्षामध्ये सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पदाधिकारी असतात. एक ग्रॅँडमास्टर घडण्यासाठी अनेकांचे परिश्रम असतात, ज्याला ग्रॅँडमास्टर व्हायचे आहे त्याचे पूर्ण लक्षही तेथेच असणे गरजेचे आहे, हे ध्यानात घेऊन हा उपक्रम सुरू केल्याचे डॉ. माळी सांगतात.

भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथे २००० साली राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतासह परदेशातील नामवंत बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता. इतक्या मोठय़ा स्पर्धेचे आयोजन करणा-या सांगलीला यापुढेही अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा भूषवण्याचा मान मिळावा अशी पदाधिका-यांची तीव्र इच्छा आहे. जोडीला प्रत्येकवेळी त्यांना सांगलीकरांचेही मोठे प्रोत्साहन मिळते. एकेकाळचा अव्वल ग्रॅँडमास्टर नायजेल शॉर्टही सांगलीच्या आठवणींनी भारावला होता. ‘‘क्रिकेट खेळांचा राजा मात्र राजांचा खेळ बुद्धिबळ’ असे नेहमी म्हणणा-या भाऊंची आठवण सतत काढत मंडळ यापुढेही त्यांचा ऐतिहासिक प्रवास आणि वाटचाल कायम ठेवेल यात शंका नाही.

आनंद आणि नूतन बुद्धिबळ मंडळ

लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आनंद सांगलीला येऊन खेळून गेला आहे. मात्र तेथेच त्याचे मंडळाशी असलेले नाते संपले नाही. आनंद जेव्हा जगज्जेता झाला तेव्हा भाऊंनी वयाच्या ८९व्या वर्षी सांगली-चेन्नई असा १४०० किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यावेळी त्यांनी आनंदला त्याची मंडळातील जुनी छायाचित्रे दाखवली होती. फक्त इतकेच नाही तर जगज्जेता झाल्यावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आनंदचा सत्कार केला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाऊंसमोर आनंदने एक गोड आठवण सांगितली. सांगलीत स्पर्धा खेळत असताना आनंदला गोड शिरा खाण्याची इच्छा झाली होती. तशी त्याने ती इच्छा ‘नानाजीं’जवळ म्हणजेच भाऊंजवळ बोलून दाखवली होती. लगेचच भाऊंनी त्याची इच्छा पूर्ण करत स्पर्धेत सहभागी सर्वाना गोड शि-याचा आस्वाद घेण्याची संधी दिली. फक्त इतकेच नाही भाऊंच्या निधनानंतर आनंदने भारतातील एका अग्रगण्य दैनिकात श्रद्धांजली देणारा लेख लिहिला होता. ‘‘सांगली येथे १९८६मध्ये मी राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धा खेळण्यासाठी माझ्या आईसोबत गेलो होतो. त्यावेळी भाऊंनी आणि त्यांच्या मंडळाने आमची खूप चांगली काळजी घेतली आणि काही कमी पडणार नाही याची दक्षता घेतली. फक्त इतकेच नाही तर चेन्नई येथे २००८मध्ये मी जगज्जेता झाल्यावरही माझे कौतुक करायला ते मोठा प्रवास करून आले होते. ते पाहून मी भारावून गेलो. भाऊ हे ख-या अर्थाने मोठे बुद्धिबळप्रेमी होते. ते आम्हा सर्वाचे त्यांच्या मुलांप्रमाणे लाड करत,’’ असे आनंदने लिहिले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version