Home महामुंबई ‘प्रगती’च्या चालकांना ‘लर्निंग रोड’चे धडेच नाहीत

‘प्रगती’च्या चालकांना ‘लर्निंग रोड’चे धडेच नाहीत

0

सीएसटी-पुणे प्रगती एक्स्प्रेसच्या चालक आणि सहाय्यक चालकांना पनवेल ते कर्जतपर्यंतच्या मार्गावर ‘लर्निंग रोड’ अर्थात महत्त्वाच्या तांत्रिक बाबींची माहितीच देण्यात आलेली नाही. 

मुंबई- सीएसटी-पुणे प्रगती एक्स्प्रेसच्या चालक आणि सहाय्यक चालकांना पनवेल ते कर्जतपर्यंतच्या मार्गावर ‘लर्निंग रोड’ अर्थात महत्त्वाच्या तांत्रिक बाबींची माहितीच देण्यात आलेली नाही. यामुळे ते याविषयी ‘अज्ञानी’ असल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची भीती काही ज्येष्ठ चालकांनी ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केली.

सीएसटीहून पुण्याला जाणा-या प्रगती एक्स्प्रेसचा मार्ग पूर्वी कल्याण, कर्जत, लोणावळा, खंडाळा असा होता. पण गेल्या काही महिन्यांपासून या गाडीच्या मार्गात कायमचा बदल करण्यात आला आहे. आता ही गाडी दिवा-पनवेल-कर्जतमार्गे नेली जाते आणि तिचा परतीचा मार्गदेखील हाच आहे. लांब पल्ल्याची एक्स्प्रेस कोणत्याही नव्या मार्गावर चालवण्यापूर्वी चालक आणि सहाय्यक चालकांना ‘लर्निंग रोड’चे धडे दिले जातात. या प्रशिक्षणादरम्यान ज्येष्ठ चालक हे चालक (लोको पायलट) आणि सहाय्यक चालक (असिस्टंट लोको पायलट) यांना नवीन मार्ग कसा आहे, मार्गावर वळणे किती आहेत, किती सिग्नल आहेत, सिग्नल डावी की उजवीकडे आहेत, एसी विद्युतप्रवाह कोणत्या सेक्शनमध्ये आहे, मार्गावर फाटक कुठे आहेत, गाडीचा वेग कोणत्या मार्गावर किती असावा, मार्गावरील स्थानक कोणत्या दिशेला आहेत आदी तांत्रिक बाबींचे शिक्षण देतात. पण रेल्वे प्रशासनाला या नियमांचा विसर पडला असून, त्यांनी प्रगती एक्स्प्रेसच्या चालक आणि सहाय्यक चालकांना ‘लर्निंग रोड’चे धडेच दिलेले नाहीत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चालकांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस जितेंद्र पाटील आणि उपाध्यक्ष भाई आंग्रे यांनीही मध्य रेल्वेच्या विद्युत विभागाच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी चालक आणि सहाय्यक चालकांना हे प्रशिक्षण तत्काळ देण्याची मागणी पाटील यांनी या पत्रात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version