Home संपादकीय विशेष लेख पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

0

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. पोलीस आयुक्तालय असलेल्या ठाणे शहरातही मागील वर्षभरातली गुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. यात सर्वाधिक संख्या चोरीच्या गुन्ह्यांची आहे. तर दरोडा, बलात्कार, खून यांसारखे गुन्हेही आयुक्तालयाच्या हद्दीत वाढू लागले आहेत. 

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. पोलीस आयुक्तालय असलेल्या ठाणे शहरातही मागील वर्षभरातली गुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. यात सर्वाधिक संख्या चोरीच्या गुन्ह्यांची आहे. तर दरोडा, बलात्कार, खून यांसारखे गुन्हेही आयुक्तालयाच्या हद्दीत वाढू लागले आहेत. एकीकडे पोलीस दल सक्षम होत असताना दुसरीकडे हे गुन्हे मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे यंत्रणा नेमकी कुठे कमी पडत आहे? याचा विचार होणे गरजेचे बनले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच परिमंडळे येतात. यात ठाण्यातील परिमंडळ १ उपायुक्तालयाच्या हद्दीत ठाणे नगर, नौपाडा, राबोडी, कळवा, मुंब्रा आणि डायघर ही पोलीस ठाणी तसेच गुन्हे शाखा-१ आणि विशेष शाखा ठाणे हे येतात. परिमंडळ-२ असलेल्या भिवंडी उपायुक्तालयाच्या हद्दीत नारपोली, शांतीनगर, निजामपुरा, भिवंडी शहर आणि भोईवाडा ही पोलीस ठाणी तसेच विशेष शाखा व गुन्हे शाखा कार्यरत आहेत.

परिमंडळ-३ असलेल्या कल्याण उपायुक्तालयाच्या हद्दीत डोंबिवलीतील विष्णुनगर, डोंबिवली, मानपाडा, तर कल्याणमधील महात्मा फुले चौक, बाजारपेठ आणि कोळसेवाडी ही पोलीस ठाणी तसेच विशेष शाखा व गुन्हे शाखा येतात. परिमंडळ-४ असलेल्या उल्हासनगर उपायुक्तालयाच्या हद्दीत उल्हासनगरातील मध्यवर्ती, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, हिललाईन, अंबरनाथमधील अंबरनाथ पश्चिम आणि शिवाजीनगर तसेच बदलापुरातील बदलापूर पश्चिम आणि बदलापूर पूर्व ही पोलीस ठाणी तसेच विशेष शाखा आणि उल्हासनगर गुन्हे शाखा कार्यरत आहेत. तर परिमंडळ-५ असलेल्या वागळे इस्टेट उपायुक्तालयाच्या हद्दीत वागळे इस्टेट, कोपरी, श्रीनगर, वर्तकनगर, कापुरबावडी आणि कासारवडवली ही पोलीस ठाणी येतात.

२०१५ या वर्षात संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १७ हजार ४३० गुन्हे घडले. त्यापैकी १०१९३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मागील वर्षी, म्हणजे २०१४ साली गुन्ह्यांचे प्रमाण १५ हजार ७३२ इतके होते. तर त्यापैकी ८८६३ गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली होती. म्हणजेच सरत्या वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्याचे आढळून येते. या गुन्ह्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

यंदा सर्वाधिक वाढ झाली ती चोरी आणि अपहरणाच्या घटनांमध्ये. दररोज ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करण्यात येते. यात किमान अध्रे गुन्हे तरी चोरीचेच असतात असे मागील काही दिवसांतील निरीक्षणावरून आढळून येते. हे गुन्हे मोठे नाहीत, एखाद्याची सोनसाखळी चोरून नेणे, एखाद्याचे पैसे हिसकावणे, एखाद्याचा मोबाईल लांबवणे असे हे किरकोळ गुन्हे आहेत.

मात्र किरकोळ असले, तरी ते दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नुसती इतर गुन्ह्यांची आकडेवारी कमी झाली किंवा वाढली यावर अभ्यास न करता पोलीस दलाने या किरकोळ घटना कशा कमी करता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांची गस्त, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांचा वचक बसवणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस दल योग्य त्या उपायोजना करतील अशी अपेक्षा आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१५ या वर्षात खुनाच्या १०६ घटना घडल्या, त्यापैकी पोलिसांनी ९८ प्रकरणांची उकल केली. २०१४ मध्ये ११७ खून झाले होते, त्यापैकी ९७ खुनांची उकल झाली होती. खुनाच्या प्रयत्नांचे २०१५ मध्ये १८१ गुन्हे घडले, त्यापैकी १७१ गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली. २०१४ मध्ये १२२ खुनाचे प्रयत्न झाले होते. त्यापैकी ११६ गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली होती. सदोष मनुष्यवधाचे यंदा ७ गुन्हे असून सर्वाची उकल झाली आहे.

मागील वर्षी हे प्रमाण ४ गुन्हे आणि ३ उकल असे होते. २०१४ सालात बलात्काराचे २१५ गुन्हे घडले होते, त्यापैकी २०४ गुन्ह्यांची उकल झाली होती. तर यंदा यात वाढ होऊन हे प्रमाण २५१ वर गेले आहे. त्यापैकी पोलिसांनी २३७ गुन्ह्यांची उकल केली आहे.

विनयभंगाच्या घटनाही काहीशा वाढल्या असून मागील वर्षी ५५९ असलेले या गुन्ह्यांचे प्रमाण यंदा ५६४ वर गेले आहे. त्यापैकी यंदा ४५९ गुन्ह्यांची उकल होऊ शकली असून मागील वर्षी ५०७ गुन्ह्यांची उकल झाली होती. अपहरणाच्या घटनांमध्येही यंदा जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी अपहरणाच्या ४३५ घटना घडल्या होत्या. त्यापैकी ३१२ गुन्हे पोलिसांनी मार्गी लावले होते. यंदा या घटनांचा आकडा ७९३ वर गेला आहे, तर त्यापैकी ६४१ गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे.

पोलिसांची डोकेदुखी ठरलेल्या दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यांची संख्या २०१४ साली ६ हजार १७८ होती. त्यापैकी अवघ्या १ हजार ७४५ गुन्ह्यांची पोलिसांना उकल करता आली होती. यंदा या गुन्ह्यांचा आकडा ६ हजार ३९७ वर गेला असून त्यापैकी १ हजार ८२१ गुन्ह्यांचीच पोलिसांकडून उकल होऊ शकली आहे.

दंगलीच्या गुन्ह्यातही वाढ झाली असून मागील वर्षी ३५० गुन्हे आणि ३०५ उकल असे असलेले प्रमाण यावर्षी ४२१ गुन्हे आणि ३५४ उकली असे आहे. विश्वासघात, फसवणूक, बनावट दस्तावेज अशाप्रकारचे यंदा १०५१ गुन्हे नोंद असून त्यापैकी ३९२ गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. मागील वर्षी अशाप्रकारचे १०९७ गुन्हे घडले होते, तर पोलिसांनी त्यापैकी ४३६ गुन्ह्यांची उकल केली होती. हाणामारी, दुखापतीविषयक गुन्ह्यांचे प्रमाण २०१४ मध्ये १६८२ होते. त्यापैकी पोलिसांनी १३९२ गुन्ह्यांची उकल केली होती.

२०१५ मध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण १६९१ वर गेले असून त्यापैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचा आकडा १३४३ इतका आहे. तपासाबाबत बोलायचे झाल्यास साधारण पोलीस ठाण्यांपेक्षा गुन्हे शाखेची कामगिरी उजवी ठरली आहे. मागील वर्षभराच्या काळात गुन्हे शाखेने अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. अर्थात गुन्हे शाखा त्यासाठीच असली, तरी अंबरनाथमधील नगरसेवक रमेश गुंजाळ यांचे मारेकरी शहाड येथे येतात आणि त्यांची खबर मिळाल्यानंतर त्यांना गुन्हे शाखा पकडते, आणि अंबरनाथ पोलिसांना त्यांची भनकही लागत नाही, हे काही चांगले लक्षण नाही.

सध्या वाढत असलेल्या पुजारी टोळीच्या कारवायाही गुन्हे शाखेनेच अनेकदा हाणून पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुजारी टोळीच्या चार हस्तकांना ठाणे गुन्हे शाखेने शस्त्रांसह अटक केली होती. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिलेला एक स्वतंत्र क्राईम स्क्वाड नेमून त्यांच्याकडे किचकट गुन्ह्यांचा तपास देणे गरजेचे आहे. याचा विचार झाल्यास ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे चुटकीसरशी कमी व्हायला मदत होईल. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकही बसेल, आणि नागरिकही निर्धास्तपणे जगू शकतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version