Home देश मोदी-पुतिन यांच्यामध्ये संरक्षण, उर्जेवर चर्चा

मोदी-पुतिन यांच्यामध्ये संरक्षण, उर्जेवर चर्चा

0

भारतात आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य भारतीय नेत्यांची भेट घेणार आहेत.

नवी दिल्ली – भारत आणि रशियामध्ये होणा-या वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबरोबरच व्यापारी संबंध अधिक बळकट करण्यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये ही पहिली वार्षिक शिखर बैठक झाली. याआधी जुलै महिन्यात ब्राझीलमध्ये ब्रिक्स देशांच्या परिषदेत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात जी-२० देशांच्या बैठीकत मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये चर्चा झाली होती.

२००० सालापासून भारत आणि रशियामध्ये शिखर बैठक होत आहे. वेळ बदलली आहे मात्र भारत आणि रशियाची मैत्री अजूनही तशीच आहे. दोन्ही देशांना हे संबंध नव्या उंचीवर घेऊन जायचे आहेत. पुतिन यांचा दौरा हा त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे मोदी यांनी टि्वट केले आहे.

पुतिन यांच्यासाठी हा भारत दौरा महत्वाचा आहे. कारण क्रिमियाच्या मुद्यावरुन अमेरिका आणि अन्य युरोपियन राष्ट्रांनी रशियावर विविध निर्बंध लादल्यानंतर अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पुतिन यांच्यासाठी भारताची साथ महत्वाची आहे.

पुतिन यांच्या भारत दौ-यात अवकाश संशोधन, संरक्षण सहकार्य आणि उर्जा क्षेत्राशी संबंधित जवळपास दोन डझन करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. रशियन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी भारता बरोबरचे व्यापारी संबंध अधिकाधिक बळकट करण्यावर पुतिन यांचा भर राहील.

सोव्हीत युनियनच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीदार देशांमध्ये भारत हा रशियाचा प्रमुख ग्राहक होता. काळाप्रमाणे भारताने रशियावरील आपले अवलंबित्व कमी करुन, अन्य देशांकडून शस्त्रास्त्र खरेदी सुरु केली.

भारत आता अमेरिकेच्या अधिक जवळ जात असला तरी, शीत युध्दाच्या काळात भारत आणि रशियाचे अत्यंत जवळचे संबंध होते. भारताने सध्या आपल्या सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. त्यामुळे शस्त्रास्त्रांची मोठी बाजारपेठे आपल्या हातून निसटू नये या दृष्टीनेही पुतिन यांच्यासाठी हा भारत दौरा महत्वाचा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version