Home महाराष्ट्र कोकण पावसाअभावी कोकण सुकू लागले

पावसाअभावी कोकण सुकू लागले

0

जून महिना संपत आला तरी मान्सूनने म्हणावा तसा जोर न घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजापूर– जून महिना संपत आला तरी मान्सूनने म्हणावा तसा जोर न घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जूनच्या प्रारंभी पेरणी केलेली रोपे रुजून आली असून पाऊसच गायब झाल्याने ती सुकू लागली आहेत. तर गेला आठवडाभरात पावसाने सातत्य न राखल्याने अशीच परिस्थिती राहिल्यास राजापूर शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ४३० मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. गेल्या वर्षी १ जून ते २३ जून या कालावधीत एकूण सुमारे ७५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी या कालावधीत केवळ ३२१ मिलीमिटर पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी हा अंदाज पावसाने प्रारंभीपासूनच दाखवून दिला आहे.

जूनच्या पहिल्या आठवडयात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर काही प्रमाणात १० ते ११ जून रोजी पाऊस सुरू झाला. त्यामुळे आता मान्सून सक्रिय होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. ७ जून रोजी तालुक्यात सरासरी ३९ तर ११ जून रोजी ३१ मिलीमीटर पाऊस पडला. या २३ दिवसांच्या कालावधीत पावसाने ४० मिलीमीटरच्या वर पावसाची सरासरी पार केलेली नाही. गेल्या वर्षी पावसाचे हेच एकूण प्रमाण या कालावधीत ७५१ मिलीमीटर इतके होते. या वर्षी मात्र यापैकी निम्मी सरासरीही पावसाने गाठलेली नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे.

जूनच्या पहिल्या आठवडयात काही प्रमाणात पाऊस पडल्याने व आता मान्सून सक्रिय होईल, या आशेवर शेतक-यांनी भातरोपांची पेरणी केली. ती रुजूनही आली आहे. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने ही रुजून आलेली रोपे सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेल्यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवडयात रोपे लावणीचे काम हाती घेण्यात आले होते. या वर्षी मात्र परिस्थिती उलटी आहे.

या लांबलेल्या पावसामुळे राजापूर शहरासह ग्रामीण भागात जी टंचाईग्रस्त गावे आहेत त्यांनाही या गायब पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मान्सूनने जर का जोर घेतला नाही तर भविष्यात या ठिकाणी पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती होत आहे.

दापोली शहराला एक दिवसाआड पाणी

गेल्या तीन दिवसांपूर्वी दमदारपणे बरसलेल्या पावसामुळे दापोलीकरांना करण्यात येणारा पाणीपुरवठा आता एक दिवसाआड सुरू करण्यात आल्याची माहिती नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. शहराला पाणीपुरवठा करणारी कोडजाई नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर आटल्याने गेल्या महिन्यात येथून होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद झाला होता. यामुळे नारगोली धरणावरून शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. अपु-या पाणीपुरवठयामुळे दापोलीकरांना खाजगी पाणी विक्रेत्यांकडून १५० ते २०० रुपये ५०० लिटरप्रमाणे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली होती. यातून पोलिस वसाहतदेखील सुटली नव्हती. यामुळे पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, आता नारगोली आणि कोडजाई नळपाणी पुरवठा योजनेच्या स्रोतात पाणी वाढल्यामुळे दिवसाआड १ तास पाणीपुरवठा केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version