Home महाराष्ट्र कोकण पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

0
संग्रहीत छायाचित्र

गेल्या काही दशकात राज्यातील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात सध्या गुन्हय़ांचे प्रमाण कमालीचे वाढत आहे.

संग्रहीत छायाचित्र

सावंतवाडी- गेल्या काही दशकात राज्यातील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात सध्या गुन्हय़ांचे प्रमाण कमालीचे वाढत आहे. दारू, मटका, जुगार फोफावलेला असतानाच गेल्या काही दिवसांत खून, मारामा-या याचबरोबरच मुलींची व महिलांची छेडछाड असे प्रकारही वाढीस लागल्याने कायदा – सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणेवर पालकमंत्र्यांचा अंकुश न राहिल्याचेच यातून सिद्ध होत आहे. नारायणराव राणे पालकमंत्री असताना या जिल्हय़ाचा क्राईम रेशो राज्यातील इतर जिल्हय़ांच्या तुलनेत सर्वात खाली होता. मात्र, अलीकडील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हाही गुन्हेगारीचे केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही.

कथित दहशतवादाचे स्तोम माजवून सत्तेवर आलेल्या पालकमंत्री केसरकरांना जिल्हय़ाचे पालकत्व स्वीकारून काही कालावधी उलटला. या कालावधीत शांत, संयमी म्हणून ओळखल्या जाणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कायदा – सुव्यवस्था पुरती कोलमडली आहे. चोरी व घरफोडय़ांनी अर्धशतक गाठले आहे. शांत व संयमी सावंतवाडी शहरातही गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरी, घरफोडय़ा वाढत असतानाच शहरातील काही महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे दारूच्या पाटर्य़ाही झडू लागल्या आहेत. शहरातील भाजीमार्केट, मच्छीमार्केट, विकास संकुले, शासकीय कार्यालये एवढेच नव्हे तर रुग्णालयानजीकही मटका व जुगाराची केंद्रे खुले आमपणे सुरू आहेत. रुग्णालयाच्या लगत तर धुम्रपानाचा अड्डाही राजरोसपणे सुरू आहे. एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणा-या सावंतवाडी शहरात सध्या महाविद्यालयीन मुलींसह महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढीस लागले आहेत.

केसरकर समर्थक युवा कार्यकर्त्यांकडूनच एका दुकानातील सेल्सगर्लची छेडछाड केल्याचे काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. हा प्रकार नंतर पोलीस ठाण्यात राजकीय दबावापोटी मिटविण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात केसरकर समर्थक महिला लोकप्रतिनिधीच्या मुलाकडून शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महाविद्यालयीन युवतीची छेड काढण्यात आली होती. चौकुळ – नेनेवाडी येथे जुगार अड्डय़ावर टाकलेल्या धाडीत सेना नगरसेविकेच्या पुत्राला व त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. कथित दहशतवादाचा डंका पिटणा-या केसरकरांचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरही अंकुश नसल्याचेच यातून सिद्ध झाले आहे. सावंतवाडीत मटका, जुगाराबरोबरच व्हीडिओ पार्लरच्या नावाखाली ऑनलाईन कसिनोंचे जाळे पसरले आहे. विशेष म्हणजे यातही पालकमंत्र्यांचेच कार्यकर्ते आघाडीवर आहेत. ग्रामीण भागातही जुगारांचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. जुगार, मटका यावर पैसा लावण्यासाठी पैशांची कमतरता भासल्याने धाडसी चो-यांचे प्रमाणही वाढले आहे. यातूनच वाढत्या गुन्हेगारीतून मारामा-या व खुनांपर्यंत युवकांची मजल गेली आहे. राजकीय राडा, दहशतवाद यावर जाहीर वक्तव्य करणारे पालकमंत्री केसरकर त्यांच्याच शहरात व जिल्हय़ातही वाढलेला हा सामाजिक दहशतवाद थोपवू शकत नसतील तर त्यांनी पालकमंत्री पदावर राहणे कितपत योग्य ठरेल, असा सवाल आता जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्हय़ातील वाढत्या चो-यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आता जिल्हय़ातील काही विशेष भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणाही हवेत विरली. पदावर आल्यापासून आश्वासनांचा पाऊस पाडणा-या पालकमंत्र्यांनी आपण काहीतरी मोठे दिवे लावत आहे अशा रितीने याबाबत जाहीरपणे डंका पिटला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळेही चोरींच्या प्रकारांना फारसा आळा बसणे कठीणच आहे. जिल्हय़ातील वाढलेल्या या गुन्हेगारीचा विचार करता या सर्वाला पोलीस प्रशासनाची नव्हे तर पालकमंत्र्यांचीच अकार्यक्षमता जबाबदार आहे. पोलीस यंत्रणेवर अंकुश ठेवण्याइतपत पालकमंत्र्यांचा दराराच राहिला नाही. त्यामुळेच गुन्हेगारीचे स्तोम वाढत आहे. त्यातही त्यांचेच कार्यकर्ते यात आघाडीवर असतील तर ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशीच काहीशी अवस्था सध्या कायदा-सुव्यवस्थेबाबत झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version