Home महामुंबई पायंडय़ांवर बसू नका.. सरकारला कोंडीत पकडा..

पायंडय़ांवर बसू नका.. सरकारला कोंडीत पकडा..

0

विधानसभेच्या पायंडय़ांवर बसू नका, सभागृहात बसा, अभ्यासपूर्ण भाषणे करून सरकारला कोंडीत पकडा. जर हे सरकार श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने खटले दाखल करीत आहे.

मुंबई – विधानसभेच्या पायंडय़ांवर बसू नका, सभागृहात बसा, अभ्यासपूर्ण भाषणे करून सरकारला कोंडीत पकडा. जर हे सरकार श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने खटले दाखल करीत आहे. तर भाजपा सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे तितक्याच आक्रमकपणे विधानसभेत उघड करा, म्हणजे यांची बोलती बंद होईल, अशा ठणठणीत शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळातील आमदारांच्या अभ्यास वर्गात आपली भूमिका मांडली.

विधानसभेत विरोधी पक्षनेता असताना सरकारला कोंडीत कसे पकडायचो, त्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. आक्रमक होऊन सभागृह चालू?देऊ नका.. कामकाज बंद पाडा. पण हा खेळ दहा मिनिटांचा असतो. त्यानंतर मुद्देसूद अभ्यास करून या सरकारमधील मंत्र्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करा, मग ते तुमची कामे करतात की नाही ते पाहा. सभागृहात पूर्णसंख्येने हजर राहा. वाचनालयाचा फायदा घ्या आणि सरकारातील मंत्र्यांशी काही नात्यागोत्यांतील संबंध असतील तर तीन वर्षे त्या संबंधांच्या मोहात पडू नका. या सरकारच्या विरोधात आपण आक्रमक होत नाही तिथपर्यंत आपली दखल घेतली जाणार नाही.

फडणवीस सरकारने गेल्या १६ महिन्यांत जनतेचे एकही काम केलेले नाही. उलट फसवणूक केलेली आहे. महागाई कमी झालेली नाही. ‘मेक इन इंडिया’मधील करार खोटे आहेत. कोणतीही गुंतवणूक आलेली नाही. काँग्रेसच्या आमदारांनी एक एक मुद्दा घेऊन सरकारला उत्तर द्यायला भाग पाडले पाहिजे. यांच्याजवळ उत्तरे नाहीत. त्यामुळे हे सरकार उघडे पडणार आहे. त्यासाठी एकत्रितपणे सभागृहात बसून विषय वाटून घ्या. काँग्रेसच्या बाकावर दोन-चार आमदार असतील तर तुमच्या आक्रमकतेचा परिणाम होणार नाही, म्हणून पूर्ण संख्येने हजर राहा, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version