Home महामुंबई ठाणे पाणी पेटले!

पाणी पेटले!

0

पाणीवाटपासाठी घेतलेल्या जमातीच्या बैठकीत झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याने आठजण जबर जखमी झाले आहेत.

महाड- पाणीवाटपासाठी घेतलेल्या जमातीच्या बैठकीत झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याने आठजण जबर जखमी झाले आहेत. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दोन्ही गटांनी केल्या.

महाड शहराजवळील केंबुर्ली मोहल्ल्यात बुधवारी रात्री जमातीची बैठक आयोजित केली होती. यावेळी अन्य विषयांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

पाणी सोडण्यावरून झालेल्या चर्चेचे पर्यावसन बाचाबाचीत व नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांकडून धारदार शस्त्रांचा वापर केल्याने आठ जण जबर जखमी झाले.

आदील घोले (५३), फजल घोले (२६), तौशीक घोले (२५) अमजद घोले, फैज घोले, जाकीर घोले, जब्बार पांगारकर, अब्दुल घोले आदी जखमी झाले. या दोन्ही गटांतील रहिवाशांच्या घरी पाणी सोडण्याचे काम जब्बार पांगारकर करत होते.

त्यास पाणी वाटप योग्य होत नसल्याच्या आरोपावरून सभेत दमदाटी झाली. त्याबाबत एका गटाने जाब विचारला असता वाद वाढून हाणामारी झाली.

कल्याण- कल्याण पूर्वेकडील विनायक चौकातील रहिवासी प्रकाश सावंत हे जवळच्या घरातून पाणी भरत असताना नळातून जिवंत किडा बाहेर पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या भागातील पाण्याच्या शुद्धतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अस्वच्छ पाण्याची ही बाब राष्ट्रवादीचे गटनेते निलेश शिंदे यांनी समोर आणली आहे. सावंत यांना पाणी भरताना सापडलेला किडा बाटलीत भरून ही बाटली पालिकेच्या कार्यकारी जल अभियंत्यांना पाठवली आहे.

पाटील यांनी ज्या घरातून पाणी भरले होते. तेथील पाण्याचे नमुने पाणीपुरवठा अधिका-यांनी घेतले व पाणी पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिला. हा किडा पुरवठयाच्या पाण्यातूनच आला का, याची तपासणी करण्यासाठी नवी मुंबईतील प्रयोगशाळेत ही बाटली नेण्यात आली आहे. अशी माहिती कनिष्ठ जल अभियंता लीलाधर नारखेडे यांनी दिली.

पूर्वेकडे जवळपास ६० एमएलडी पाणी पुरवठा प्रतिदिन केला जात असल्याचा पाणी पुरवठा विभागाचा दावा आहे. मात्र अपेक्षित पाणी पुरवठा होत नसल्याची पूर्वेतील नागरिकांची तक्रार आहे. त्याचे पडसाद मागील महासभेत उमटले.

पूर्वेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येवून जो पर्यंत पूर्वेतील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत महापालिकेची महासभा चालू न देण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता.

वित्त आयोगातून पाण्यासाठी निधीची मागणी

कल्याण- पूर्वेकडील पाणीटंचाईची प्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केडीएमसी आर्थिक दृष्टया सक्षम नाही. त्यामुळे तेराव्या वित्त आयोगातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विधान परिषदेतील आमदार जगन्नाथ शिंदे यांनी सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांना एक पत्र लिहिले आहे.

त्यातच येथील पाणीप्रश्न गंभीर होत आहे. या भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या जलवाहिन्या बदलण्याइतपतही महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम नाही. त्यामुळे तेराव्या वित्त आयोगातून त्यासाठी निधी उपलब्ध केल्यास कल्याण पूर्वेचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो, अशी मागणी आमदार शिंदे यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे केली आहे. महापालिकेकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसल्यामुळे पालिकेतील सत्ताधा-यांवर नामुष्की ओढावली आहे.

नेरळमध्ये पिण्याच्या पाण्याची चोरी

नेरळ- उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करून नेरळमध्ये मर्यादीत प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. पाणी वाचवण्याचे आवाहनही केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी पाणीवाहिन्यांना वीज मोटार लावून जादा पाणी खेचले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

अशी पाणीचोरी करताना आठ वीज मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या पुढे कुणीही मोटार लावून पाणी चोरी करताना आढळल्यास त्यावर फौजदारी कारवाईचा इशारा नेरळ ग्रामपंचायतीने दिला आहे.

नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच केतन पोतदार यांच्यासोबत कर्मचा-यांनी पाणीचोरांवर कारवाई केली. नेरळ खांदा, ममदापूर भागात मोटार जप्तीची कारवाई केली गेली.

जप्त केलेल्या मोटार नेरळ ग्रामपंचायतीत आणणण्यात आल्या. यापुढेही पाणीचोरी उघडकीस आल्यास फौजदारी कारवाईचा इशारा सरपंच राजश्री कोकाटे आणि उपसरपंच केतन पोतदार यांनी दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version