Home महामुंबई ठाणे पाणीबाणी सुरू!

पाणीबाणी सुरू!

0

ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी पाडयात उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाणीटंचाई भीषण स्वरुप धारण करू लागली आहे. सरकारकडून पुरेशा पाणीयोजनांच्या अंमलबजावणीची गरज आहे. मात्र, अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या मात्र, त्या अर्धवट ठेवण्यात आल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेची घोषणा झाली आहे. मात्र, ही योजना जर वेळीच अमलात आली नाही तर रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई आणखी भीषण होण्याची चिन्हे आहेत. अनेक आदिवसी गावपाडय़ांत तलाव, नदीला पाणी असताना केवळ पाणीयोजना राबवण्यातील उदासीनतेमुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नेरळ- नेरळ ग्रामपंचायतीमधील कोंबलवाडीमध्ये नळयोजनेचे पाणी अद्याप पोहोचलेले नाही. वाडीकडे जाणारी जलवाहिनी ऑक्टोबर महिन्यात तुटली होती. ती अजून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

मोहाचीवाडम् येथून आनंदवाडीकडे जाणा-या  रस्त्यावर कोंबलवाडी ही ४० घरांची आदिवासी वस्ती आहे. नेरळ ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणा-या योजनेचे पाणी पूर्वी या भागातील आदिवासी वाडय़ांना मिळत होते.

मात्र उन्हाळ्यात काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न होताच. मात्र, आतातर पाणीच मिळेनासे झाले आहे. येथील इतर वाडय़ांना पाणी मिळते मात्र, कोंबलवाडीच्या घशाला कोरड आहे.  येथील सार्वजनिक नळावर मागील सहा महिन्यांपासून पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही.

केवळ दोन सार्वजनिक स्टँडपोस्ट असून कुणाच्या घरात नळ पोहोचलेले नाहीत. इतर ठिकाणी नळयोजना राबवण्यात आल्याने पाणी आहे. मात्र, कोंबलवाडीतील गोरगरीब आदिवसींपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. पाणी नसल्यामुळे महिलांना ओहोळाच्या पलीकडील विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

ही विहीरही कोरडीठाक पडल्याने थेंबथेंब पाण्यासाठी आदिवासींना वणवण करावी लागते. विहिरीतील झ-याला पाणी येण्याची वाट पाहत हंडाभर पाण्यासाठी दिवसभर विहिरीजवळ थांबावे लागते. त्यामुळे आदिवासी मुलांना शाळा सोडून विहिरीजवळ थांबून थेंबथेंब पाणी गोळा करण्याची वेळ आली आहे.

दुस-या दिवशी पाणी मिळवण्यासाठी रात्रीच विहिरीवर जाऊन नंबर लावावे लागतात. पाण्याच्या प्रश्नावरून कोंबलवाडीतील ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांनी दखल घेतलेली नाही. पाणीटंचाईची भीषण स्थिती समजून घेऊन निदान विहिरीत तरी ग्रामपंचायतीने पाणी सोडावे, अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांची आहे.

कुडूस- वैतरणा, तानसा, िपंजाळ, देहेर्जे, गारगावी या पाच नद्यांचे मुबलक पाणी वाडा तालुक्यात असताना पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे १५ गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामस्थांना हंडभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

डोंगरीपाडा, फणसपाडा, (तुसे) गावठाण नं १, कारंजे, सालकर पाडा, (पोशेरी) बोरीपाडा, (पलाटपाडा), पाली, वरसाले, मांगलुरपाडा, मंदारपाडा, कातकरीवाडी, भोपीवली, असनस, वारणावाडी, तळ्याचापाडा, अवचितपाडा, पिंगेमान, काचरेपाडा, चंदोळी, डोंगरपाडा, अंभरभुई आदी गावपाडयात पाणीटंचाई आहे.

या बाबत सरकारी पातळीवर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या वतीने ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तालुक्यातील १६८ गावे आणि त्याहून अधिक पाडे आहेत. या ठिकाणी पाणीटंचाईची सुरुवात होऊ लागली आहे. येथील जलस्रेतातून पाण्याचा बेकायदा उपसा थांबवण्याची गरज आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version