Home महामुंबई पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचाच आग्रह धरा

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचाच आग्रह धरा

0

पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी फक्त पर्यावरणपूरक गणेशमुर्तींचा आग्रह धरावा असे आवाहन पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी केले आहे.

मुंबई – ‘पर्यावरणाचा होत असलेला -हास ही जागतिक समस्या झाली असून पर्यावरणाचा समतोल राखणे, हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. गणेशोत्सवाच्या आधुनिक स्वरूपाचा पर्यावरणावर, आरोग्यावर होणारा परिणाम, विसर्जनाच्या वेळी समुद्राचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचाच आग्रह धरा,’ असे आवाहन पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी नुकतेच केले.

राज्य सरकारचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयाच्या आवारात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना देवतळे बोलत होते. या वेळी पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंह, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीवकुमार मित्तल उपस्थित होते.
भारतीय सण-उत्सवांच्या परंपरेत महत्त्वाचा असलेला गणेशोत्सव निसर्गाशी संवाद साधणारा आहे, याची प्रचिती आपल्याला गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपातही दिसते. गणेशमूर्तीसाठी लागणा-या शाडूच्या मातीपासून ते गणेशाला अर्पण करण्यात येणा-या 21 पत्रीपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाशी संवाद साधताना दिसतात. तेव्हा हा उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीबाबत जनजागृती करण्यासाठी पर्यावरण विभागाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे, असेही देवतळे म्हणाले.

या प्रदर्शनातील शाडूच्या मूर्ती अतिशय सुंदर असून सर्वानी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन सचिन अहिर यांनी केले. या स्टॉलवर श्री गणेश कला केंद्र, रायगड व निर्मल ज्योत, मुंबई या संस्थांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version