Home कोलाज पडद्यामागचे रंजक नाटयानुभव!

पडद्यामागचे रंजक नाटयानुभव!

0

अरुण घाडीगावकरांच्या ‘रंगप्रसंग’मधील निखळ सत्यता, कलावंतांची कलानिष्ट महनियता रसिक मनांमध्ये अधोरेखित करणारी आहे.

अरुण घाडीगावकरांच्या ‘रंगप्रसंग’मधील निखळ सत्यता, कलावंतांची कलानिष्ट महनियता रसिक मनांमध्ये अधोरेखित करणारी आहे. माणूसपण जपणारे, सत्य आणि सौहार्द जाणवत ठेवणारे हे ‘रंगप्रसंग’ सशक्त, जिवंत कलामाध्यमाचे दर्शन घडवणा-या विविध अनुभवांनी नटलेले आहे.

नोकरी-व्यवसायाने बँकेत असले तरी अरुण घाडीगावकर आहेत मनोमनी मराठी रंगभूमी प्रेमिक. नाटयकलाकार, नाटयप्रयोग संयोजकापासून मराठी रंगभूमीची शान-प्रतिष्ठा जपणारे, सांभाळणा-या प्रत्येकाच्या कुशलतेला, चतुराईला, प्रसंगावधानाला दाद देत गौरवरणारे.

रंगभूमीचे तंत्रमंत्र-लेखक-दिग्दर्शन, संगीतसाथ, प्रॉम्प्टिंगच नव्हे तर बॅकस्टेज धुरा कसोशीने जपणा-यांच्या कुशलतेचाही ते गौरव करीत आले आहेत. त्यांची निष्ठा आणि त्यासाठीचे कष्ट यांचे नाटयप्रयोग यशस्वीतेसाठीचे महत्त्व त्यांनी जोपासले आहे.

नाटयप्रयोग दौरे, त्या दौ-यातील देखरेख, दरारा, आत्मीयता, त्याचबरोबर प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी सज्ज झालेल्या पडद्यासमोर येणा-या व पडद्यामागून झटणा-या सर्व कलाकारांच्या बद्दलची गुणग्राहकता आणि आत्मीयता जपत असलेले व्यवस्थापक यांच्याही कुशलतेला त्यांनी दाद दिली आहे. या मराठी रंगभूमी प्रेमाच्या ओढीतून त्यांनी संबंधितांकडून ख-या-खोटयाची बिनचूक माहितीची खात्री करून घेऊनच ‘रंगप्रसंग’ वाचकांच्या हाती ठेवले.

मुंबईतच नव्हे तर मुंबई बाहेरही नाटक वेडय़ांच्या तालमीत, गर्दीत, प्रेक्षकांच्या समोर आयत्यावेळी अनेक अडचणी येतात. त्या अफलातून, अकल्पित, गोंधळून-बावचळून जावे अशा असतात. त्या अडचणींतून कलावंत प्रसंगावधान दाखवीत उत्स्फूर्त बुद्धिचातुर्याने, अप्रतिम कलाचातुर्याने, हजरजबाबी वेधकतेने बाहेर पडत असतात. त्या रंगतदार प्रसंगांची आगळीवेगळी रंजक मांडणी ‘रंगप्रसंग’मध्ये मांडली आहे.

रंगभूमीवरील प्रत्येक कलावंतांपुढे अनेक आव्हाने येत असतात. मग तो पडद्यामागचा कलावंत असो प्रेक्षकांसमोर नाटयाविष्कारासाठी आलेला कलाकार असो, नाटयप्रयोगामध्ये आयत्यावेळी येणारे ‘रंगप्रसंग’ कलावंतांसाठी जबरदस्त आव्हानच असते!

अभिनय, प्रॉम्टिंग, प्रकाशसंयोजन, रंगभूषा, संगीत, वेषभूषा इतकेच नाही तर आजच्या जमान्यात पडदा उघडण्यापासून तो त्या पूर्वीच्या काळात पडदा बिनचूक वर गुंडाळणे, बाजूला सरकवणे आणि हे सारे साधताना वेळेचे बिनचूक गणित जमवणे-जपणे म्हणजे सत्त्वपरीक्षाच! अशा या घडून आलेल्या, घडून गेलेल्या सत्त्वपरीक्षांचा आगळा वेगळा ‘आँखो देखा हाल’ ‘रंगप्रसंग’मधून घाडीगावकरांनी मांडला आहे.

प्रत्येक घटना-प्रसंगाचे वेगळेपण, उत्स्फूर्तता जपतानाच कलावंतांचे कलावंतपण ठसठशीत करतानाच त्यातले माणूसपण, मनाचे मोठेपण जाणवत ठेवणारे रंगप्रसंग अरुण घाडीगावकर यांनी ‘रंगप्रसंग’ या आपल्या अप्रतिम एकमेवाद्वितीय पुस्तकाद्वारे वाचकांपुढे ठेवले आहेत. निवडक पन्नास खुमासदार रंगप्रसंग वाचताना उत्कंठा वाढते. गंमत वाटते. हसायला येते.

‘रंगप्रसंग’मधील विविध रंगतरंगी हे प्रसंग कलावंतांचे, परस्परांतील स्वभाव विशेषानुसारचे राग, लोभ, प्रेम, आदर, याबरोबरच मनाचे मोठेपण, प्रत्येक घटना प्रसंगाचे वेगळेपण आणि कलावंत विशेषत्व ठळक करणारे आहेत. कलावंतांची कलानिष्ठ महनीयता रसिक मनांमध्ये नितांत प्रेम व आदर निर्माण करणारी आहे. त्याचबरोबर गॉसिपिंग यात जराही नाही.

यातील निखळ सत्यता, कलावंतांची कलानिष्ठ महनीयता रसिक मनांमध्ये अधोरेखित करणारी आहे. माणूसपण जपणारी, सत्य आणि सौहार्द जाणवत ठेवणा-या या रंगप्रसंगांतून सशक्त, जिवंत कलामाध्यमाचे दर्शन घडवताना विविधरंगी, विविध अनुभवांनी नटलेले आहे.

कलामाध्यम आणि यातले हे रंगप्रसंग सर्वसामान्य वाचकांपासून रंगमंचवेडया, नाटकवेडया, नाटयरसिकांनाही नक्कीच पुन्हा पुन्हा वाचायलाही आवडेल. यातल्या प्रत्येक घटना-प्रसंगातील अकल्पिततेबरोबरच कलाकारांची रंगभूमी निष्ठा अधोरेखित केली आहे.

साधीसरळ, सत्यता जाणवत ठेवणारी, अचूक लेखन शैली, प्रसंगमांडणी, कुठल्याही रंगप्रसंगात चुकीची माहिती, संदर्भ राहू नयेत अशा कसोशीने त्या त्या किश्श्यांसंदर्भातील ज्येष्ठ-श्रेष्ठ संबंधितांचे सहकार्य मिळवण्याची तत्परताही अभिनंदनीयच! वाजवी मूल्य, निर्दोष छपाई, इंद्रधनूच्या रंगांची आठवण यावी असे कलात्मक मुखपृष्ठ रंगप्रसंगांमधील मनोवेधक, विविधरंगी, आल्हाददायकताच!

रंगप्रसंग : अरुण घाडीगावकर
डिंपल प्रकाशन

पाने : १५२

किंमत : १६० रुपये

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version