Home महामुंबई पंधरा दिवसांत लातूरला रेल्वेने पाणी

पंधरा दिवसांत लातूरला रेल्वेने पाणी

0
संग्रहीत छायाचित्र

लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकार, रेल्वे प्रशासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून येत्या पंधरा दिवसांत हा पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन महसूल आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिले. 

संग्रहीत छायाचित्र

मुंबई- लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकार, रेल्वे प्रशासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून येत्या पंधरा दिवसांत हा पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन महसूल आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिले. खडसे यांनी विलासराव देशमुखांवर केलेल्या टिप्पणीमुळे विरोधी पक्षांचे आमदार संतप्त झाल्याने आपण उच्चालेले नाव मागे घेत असल्याचे त्यांना सांगावे लागले.

लातूरात पाणीटंचाईमुळे शाळा आणि क्लासेस लवकर बंद होणे, दुष्काळामुळे नागरिकांचे झालेले स्थलांतर याबाबत प्रश्न लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी विचारला होता. देशमुख म्हणाले की, ‘लातूर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे. पाण्याअभावी उद्योग बंद होत आहेत लातूर हे शैक्षणिक ‘हब’ म्हणून ओळखले जाते. केवळ शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येथे राहतात. मात्र पाण्याची टंचाई असल्याने शाळा आणि क्लासेस वेळेपूर्वी बंद करण्यात आले आहेत.

सरकार मागील चार महिन्यांपासून रेल्वेने पाणी आणणार असे सांगते. ते पाणी लातूरमध्ये कधी येणार, असा प्रश्न अमित देशमुख यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले की, लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे.

त्याला लागणा-या दोन रेल्वे तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत रेल्वेद्वारे पाणीपुरवठा सुरू होईल. एकही जनावर अथवा माणूस पाण्यावाचून मरणार नाही. केवळ पाणी नसल्यामुळे एकही माणूस स्थलांतरित झाल्याची आपल्याकडे माहिती नाही, असेही खडसे म्हणाले.

विलासरावांचे नाव घेतल्याने गोंधळ

लातूरच्या पाणी प्रश्नावर बोलत असताना महसूलमंत्री एकनाथ खडसे विलासराव देशमुखांवर विनाकारण घसरले. ते म्हणाले की, ‘लातूरचा प्रश्न गंभीर आहे. मी कालच तिकडे जाऊन आलो. मला खूप दु:ख वाटले विलासराव आठ वर्षे मुख्यमंत्री, पंचवीस वर्षे मंत्री असताना लातूरचा पाणीप्रश्न का सुटला नाही. खडसे यांच्या या विधानावर विरोधी पक्षांचे सदस्य संतप्त झाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणले, ‘मराठवाडय़ात दुष्काळ आहे. गेल्या चार वर्षात पाऊस पडलेला नाही. आता पाऊस पडणे न पडणे कुणाच्या हातात आहे का? परंतु महसूलमंत्र्यांनी या दुष्काळात लोकांना काय आधार देणार हे सांगण्याऐवजी राजकीय भाषण करत आहेत.

लोकांचे स्थलांतर झाले नाही, अशी माहिती अधिका-यांनी दिली असेल. परंतु महसूलमंत्र्यांनी जरा पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबईत दुष्काळग्रस्त भागातून अनेक लोक आले आहेत, त्यांची चौकशी करावी. वास्तव स्वीकारण्यापेक्षा मंत्री राजकारण करत आहेत. त्यामुळे विनाकारण विलासराव देशमुख यांचे जे नाव घेतले आहे ते कामकाजातून काढून टाकावे, असेही चव्हाण म्हणाले.

विलासरावांनी जो विकास लातूरचा केला आहे, तसा विकास खडसे यांनी जळगाव करून दाखवावा! असे आव्हान राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी दिले. यावेळी काँग्रेसचे-राष्ट्रवादीचे सदस्य आमदार वेलमध्ये उतरले. तेव्हा भाजपाचेही आमदार वेलमध्ये उतरले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दोन्ही सदस्यांना दुष्काळचे राजकारण न करण्याच्या सूचना देऊन या विषयावर पडदा पाडला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version